lockdown: पोलीस कारवाईच्या धास्तीने नागरिक बसले घरात: सुजाण नागरिकांनी पाळला टाळेबंदीचा पहिला दिवस; कुठे चढ्या भावात दूध विक्री, तर साहेबांचा वाढदिवस साजरा केला धुमधडाक्यात

                       Photo:BA news24





नीलिमा शिंगणे -जगड

अकोला: कोरोना विषाणूने राज्यासह अकोल्यातही थैमान घातले आहे. राज्यशासनाने याआधीच 15 दिवसाचा lockdown घोषित केला होता.मात्र, बेजबाबदार नागरिकांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखले नाही.परिणामी रस्त्यावर नागरिक गर्दी करू लागले. यामुळे कोरोनाला खुले आमंत्रण मिळाले असल्याने रुग्ण संख्येत व मृत्यू वाढ झाली. यावर अटकाव आणण्यासाठी शेवटी जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंधासह lockdown घोषित केला. 9 मेच्या रात्री पासून लॉकडाउन सुरवात झाली असून 15 मे पर्यंत राहणार आहे. Lockdown च्या पहिल्या दिवशी (10 मे) अकोलेकरांनी lockdown ला चांगला प्रतिसाद दिला. पोलीस कारवाईची धास्तीने लोकांनी घराबाहेर पाऊल टाकले नाही. अत्यावश्यक सेवा सुरू असल्याने तेवढी तुरळक ये-जा रस्त्याने दिसली. मात्र,याच सोबत काही जणांनी कायद्याचे उल्लंघनही केले.




विनाकारण फिरू नये


                       Photo:BA news24

शहरातील मुख्य 22 ठिकाणी पोलीस प्रशासनाने बॅरिकेट्स लावून नागरिकांची अडवणूक करून तपासणी करण्यात आली. यात विनाकारण बाहेर पडणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. अत्यावश्यक काम असल्यास नागरिकांनी आवश्यक कागदपत्र व ओळखपत्र सोबत ठेवावी,असे आवाहन  यावेळी पोलिसांनी केले.



ररस्त्याने शुकशुकाट


शहरातील नेहमी वर्दळीच्या असलेले रस्ते व चौक सुनसान झाले होते. बसस्थानक परिसर, रेल्वे स्टेशन चौक,टिळक रोड,गांधी रोड,जयहिंद चौक, कस्तुरबा गांधी रुग्णालय, सिटी कोतवाली चौक, गांधी रोड, किल्ला चौक, हरिहर पेठ,वाशिम बायपास, डाबकी रोड, पोळा चौक, बाळापूर रोड, कौलखेड,नेहरू पार्क चौक, गोरक्षण रोड,मलकापूर रोड,उमरी रोड, अकोटफाईल आदी मार्गाने शुकशुकाट पसरला होता. दरम्यान प्रशासकीय व पोलीस अधिकारी यांनी मार्गाची पाहणी केली.




वाढते तापमान

अकोल्यात सध्या 42 डिग्री वर तापमान गेले असल्याने दुपारच्या वेळी नागरिक घराबाहेर पडले नाहीत. त्यामुळे दुपारी रस्त्याने चिटपाखरूही दिसत नव्हते.




गल्ली बोळातून ये-जा सुरू

                        Photo:BA news24


पोलिसांचा कडक बंदोबस्त असूनही काही रिकामटेकडे गल्ली बोळातून इकडे तिकडे फिरत होती. पोलिसांनी केवळ मुख्य रस्त्यांवर बंदोबस्त लावल्याने गल्ली बोळात काही नागरिक बिनधास्त फिरताना दिसत होते. मात्र, पोलिसांनी बॅरिकेट्स लावले असल्याने पलीकडे जावू शकत नव्हते.





चढ्या भावाने दुधाची खुली विक्री


                       Photo:BA news24

सकाळी डेअरी बंद असल्यामुळे काही दूध विक्रेत्यांनी चौकाचौकात गाड्या उभ्या करून दुधाची चढ्या भावाने खुली विक्री केली. तर सकाळच्या वेळी भाजी विक्रेते आतील रोडवर भाजी विक्री करताना दिसत होते. 





दारू घुटका चोरी छुपे 


दारूची घरपोच पार्सल सुविधांची सोय असूनही चिल्लर विक्रेते सुनसान गल्लीचा फायदा घेत खुलेआम दारू विक्री करत होते. त्यासोबतच सर्वश्रुत बंदी असलेल्या घुटक्याची विक्री सर्रास करत होते. स्थानिक नागरिकांनी या विक्रेत्यांना हटकले असता,थोडा वेळ तेथून निघून जावून परत त्याच ठिकाणी येत ज्यांना दारू बॉटल पाहिजे,त्यांना फोन कॉल करून बोलावून विक्री करत होते, याकडे देखील पोलिसांनी थोडे लक्ष द्यावे,अशी मागणी सामान्य नागरिकांनी केली आहे.



साहेबांचा वाढदिवस धुमधडाक्यात 


एका राजकीय पक्षाचे सुप्रीमो यांचा वाढदिवस कडक lockdown मध्ये देखील नियमांचे उल्लंघन करीत धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. डाबकी रोड परिसरातील भीमनगर येथे कार्यकर्त्यांनी सायंकाळी मोठा केक कापून आतिषबाजी केली. अर्धा पाऊण तास या फटाक्यांच्या आवाजाने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला, शिवाय आकाशात फटाक्याच्या धुव्व्याने वातावरण देखील प्रदूषित केले गेले. ध्वनी प्रदूषण देखील झाले. सोशल मीडियावर याचे थेट प्रसारणही या उत्साही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले होते. अनेकांनी हा व्हिडिओ पाहून नाराजी व्यक्त केली. नंतर मात्र हा व्हिडिओ दिसेनासा झाला.पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या भागात हा प्रकार घडला. अनेक नागरिकांनी या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली. जे नियम पाळतात फक्त त्यांच्याच साठी lockdown आहे का,असा संतप्त सवाल डाबकी रोड,जुने शहरातील सुजाण नागरिकांनी उपस्थित केला.



टिप्पण्या