Corona impact: कोरोनाला आटोक्यात आणायचे असेल तर पाऊले गांवभर न जावू देता घरात ठेवा…

                              file photo:neel





प्रवीण महाजन

देशात आज पर्यन्त  दोन कोटी १० लाख ७७ हजार ४१० वर रूग्ण संख्या पोहोचली, तर मृतांची संख्या २ लाख ३४ हजार ८३ झाली आहे. देशातील उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून ही संख्या ३६ लाख ४५ हजार १६४ वर पोहोचलेली आहे. 




महाराष्ट्रात कोरोनाचा विळखा  दिवसेंदिवस घट्ट होताना दिसत आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता राज्य सरकारने मिनी लॉकडाऊन जाहीर केला असला तरी राज्यातील बाधितांच्या संख्येत होणारी वाढ काही कमी होताना दिसत नाहीये. आज राज्यात ५६२८६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर राज्यात काल ८५३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात  ६४१२८१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. 




दोन दिवसापासून नागपूरात टेस्टिंगने🧪 जोर घेतला असून हळू हळू परिस्थिती रुळावर येताना दिसत आहे. परवा २१ हजार ६१२ टेस्ट करण्यात आल्याचे सांगितले गेले. त्यात मिळालेले रूग्ण  हे अत्यंत अल्प आहे. नागपूर मध्ये २५३४ रुग्ण तर जिल्ह्यामध्ये १८५३ रुग्ण आढळून आलेत, तर काल २१ हजार ८७८ टेस्ट झाल्या असून यात २७२०नागपूर व जिल्ह्यात २१६७ रूग्ण आढळून आहेत. ग्रामीण मध्ये मात्र शहाराच्या मानाने रूग्ण संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे, ही गंभीर बाब असून चिंता वाढविणारी असली तरी शहरात मात्र रूग्ण संख्या कमी होत आहे ही एक सकारात्मक बाब म्हणता येईल.   




नागपूरात मागील पंधरा दिवसापासून रुग्णाचे जे हाल होत होते. आपल्या आप्तांसाठी, नातेवाईकांसाठी, मित्रांसाठी भीर भीर फिरत होते. हॉस्पिटल, बेड, O2बेड, आयसीयू, व्हेंटिलेटर, रेमडेसिविर इंजेक्शन, प्लाज्मा साठी  दारोदार हात जोडून फिरत होते. विनवण्या करत होते.  अनेकांना योग्य उपचार न मिळाल्यामुळे आपले आप्त, नातेवाईक, मित्र, शेजारी, आई, वडिल, बहिण - भाऊ, मुले - मुली यापैकी कोणी ना कोणी गमविलेत. हे दु:ख कमी नाही. ज्याचे त्यालाच हे सर्व सहन करावे लागत असते. या सर्व दुःखावर जिवनभर औषधी नाही आणि नसणार. 




आर्थिक नुकसानही प्रत्येकाचे झाले आणि होत आहे. व्यावसायिकाचे तर कंबरडे मोडले आहे. बॅंका व्याज सोडायला तयार नाही. व्यावसायिक हा देशांचा कणा आहे. त्यांचेकडे पाहायला कोणी तयार नाही. गरीब रस्त्यावर आला आहे. हातावर पोट असणा-यांचे दोन टाईम पोट भरने कठीण झाले. सरकारी मदत कागदावरच दिसत आहे.  सरकारी कार्यालयात कामे होत नाही. काम करायला माणसे नाहीत. सर्वात मजेत आहे तो काही प्रमाणात सरकारी माणूसच. काम नाही तरी पूर्ण पगार. द्यायलाही पाहिजे, पण नंतर जेव्हा हा सरकारी माणूस परत कामावर येईल तेव्हा ही जाणिव ठेवून काम केले तर समाधान असेल पण ही जाणिव ठेवल्या गेली नाही तर मात्र दु:खच असेल. 




आज डॅाक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस, अत्यावश्यक सेवेतील अधिकारी-कर्मचारी हे मात्र कोरोना नियंत्रणात येण्यासाठी झटत आहे. स्व:ताची, परीवाराची पर्वा न करता लढत आहे. सेवाभाव हा प्रत्येका जवळ असायला पाहिजे, पण दिसत नाही. काही जण तर कोरोनात लुटत आहे. हि लूट जन्म मरणाचा प्रश्न निर्माण करत आहे. प्रत्येकालाच आरोग्य सेवा मिळाली पाहीजे, ती पण चांगली. हा हक्क प्रत्येकाचा आहे. प्रत्येकाचा जीव महत्वाचा आहे. जीव, जीव असतो. गरीब, श्रीमंत हा भेद भाव त्यात यायला नको, पण ज्याचे खिशात पैसे असता ते मोठ मोठ्या हॉस्पिटल कडे वळतात. ॲडमिट होतात. औषधोपचार घेतात आणि घरी परत येतात, पण ज्यांना आर्थिक व इतर परीस्थितीमुळे वैद्यकिय उपचार मिळत नाही, अशा रूग्णांना मरण यातना झेलाव्या लागतात. ते जगले, वाचले तर त्यांचे तकदिरावर असते,  असे चित्र आहे.  अशा रुग्णांना वाचविले पाहिजे. त्यांना मदत केली पाहिजे. कोरोनावर मात करण्यासाठी रूग्ण मिळेल त्या हॅास्पीटलला ॲडमिट होतात अन नंतर रूग्णालयाचे बील पाहून स्वत:ला दोष देत तब्येत खराब करून घेतात.  नातेवाईक बिल भरण्यासाठी हात पसरवत आहेत तर कोणी कर्ज काढत आहेत तर कोणी पैसे मिळावे म्हणून धावपळ करीत आहे,  असे चित्र दिसत आहे. ही परिस्थिती कोणावर येवू नये असे वाटते. 




मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार नागपूर महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासना तर्फे सेन्ट्रल २४ तास सुरु राहणारी कंट्रोल रुम मनपात सुरु करण्यात आली आहे ही चांगली गोष्ट आहे. मनपा आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वात तीन शिफ्टमध्ये तज्ज्ञांची चमू येथे उपलब्ध असेल हे पण चांगले केले. कन्ट्रोल रूम ही रूग्णाला आधार वाटला पाहिजे, पण नेहमी प्रमाणेच तेथे फोन उचलणारा हा कोणीतरी बसवून दिल्या जातो आणि मग बदनामी सुरवात होते. फोन घेणारी ही व्यक्ती चांगली बोलणारी असावी. नमस्कार कोरोना कन्ट्रोल रूम या शब्दांनी रूग्ण नातेवाईक यांचेशी बोलून त्यांचे दुःख हलके करणारी असावी. नेमका सल्ला देणारी व योग्य मार्गदर्शन करणारी असावी पण यारूम मधील अनुभव फार चांगला नाही.  सवलतीचा दुरुपयोग केल्याचे लक्षात आल्यास संबंधीत हॉस्पीटल आणि संबंधित डॉक्टरवर कारवाई केल्या जाईल असे प्रशासन म्हणत असले तरी पण तसे होताना  दिसणार नाही. या कंट्रोंलरूमचा काही ना काही प्रमाणात  रूग्णांना फायदा होईल हे मात्र नक्की. 




व्हॅकसिन केंद्रावर होणारी गर्दी कोरोनाला आमंत्रण देणारी ठरत आहे तर सकाळी बाजार, दुकाने ७ ते ११ चालू आहे तेथे पण गर्दीचा उच्चांक कायम आहे. जी दुकाने चालू आहेत.  ते व्यवसाय करण्यात गुंग असून त्यांना त्यांचे कडे येणारे गि-हाईक नियंमांचे पालन करते की नाही याचे काही घेणे देणे नाही. येथूनच चालू होते कोरोनाची रींग पण दुकानदार मस्त  प्रशासन सुस्त अशी काही विचित्र परिस्थिती आहे. 




१०-१५ दिवसांपूर्वी जी परिस्थिती होती ती आज सुदैवाने तशी  राहिलेली नाही. नागपूरातील रुग्णालय निहाय काल सायंकाळपर्यंत बेड व्यवस्था जी होती त्यामध्ये १८० रूग्णालय मिळून  O2 बेड १११२ शिल्लक होते. आयसीयू बेड ११२ होते तर व्हेंटिलेटर १ शिल्लक असल्याचे चार्ट मध्ये दिसते आहे. नागपूरातील सरकारी व सामाजिक आयसोलेशन सेंटर मध्ये शेकड्यांनी बेड खाली असल्याचे चित्र आहे. या कोरोना काळातील ही सर्वात सुखावह बाब जरी म्हणता येणार नसली तरी परिस्थिती सुधारत असल्याचे हे संकेत निश्चितच म्हणता येईल. 




देशात कोरोनाची तिसरी लाट हिवाळ्यात म्हणजे नोव्हेंबर अखेरीस किंवा डिसेंबर  प्रारंभी येण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे कोरोनावर औषध जरी नसले तरी  जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण झाल्यास कमी धोका राहील. याकरीता लोकांना व्हॅक्सीन घेणे आवश्यक आहे. तिसऱ्या लाटेत युवकांना मोठ्या प्रमाणावर कोरोनाची बाधा होण्याची शक्यता वर्तिविण्यात आली आहे.  




अजून काही दिवस आपण सर्वांनी नियमाचे तंतोतंत  पालन करणे आवश्यक आहे. परिस्थिती सुधारत असली तरी काळजी घ्यावी लागणार आहे. काळजी घेतली तर निश्चितच आज ज्या परिस्थितीतून आपण जात आहे ती परत येणार नाही. कोरोनाला आटोक्यात आणायचे असेल तर प्रत्येकाने आपली पाऊले गांवभर न जावू देता घरात ठेवले तर मात करने सोपे जाईल. प्रयत्न करा यश जवळ आहे.



                                  लेखन

                              प्रवीण महाजन, 

                              नागपूर, विदर्भ.

टिप्पण्या