Anti Tobacco Day 2021: तंबाखूविरोधी दिन :मुख कर्करोगाला तंबाखूच कारणीभूत; विदर्भ ही गुटख्याची राजधानी बनत आहे - डॉ. राजेश रांदड यांचे मत

                     दिन विशेष

          ॲड. नीलिमा शिंगणे-जगड


                                     File photo


अकोला: अलिकडच्या काळात कर्करोगाचे प्रमाण वाढले असून, 95 टक्के मुखकर्करोग हा तंबाखू, गुटखा सेवनाने आणि सिगारेटच्या धुम्रपानाने होत असल्याचा दावा विदर्भातील प्रख्यात मुखकर्करोग तज्ञ डॉ. राजेश रांदड यांनी केला आहे. 31 मे रोजी जगभर साजरा केल्या जात असलेल्या जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या पूर्वसंध्येला संवाद साधताना ते बोलत होते. विदर्भ ही गुटख्याची राजधानी बनत चालल्याचेही डॉ. रांदड यांनी यावेळी सांगितले.




वयाच्या आठ ते दहाव्या वर्षापासूनच मुलांचे पाय पानटपरीकडे

देशाच्या विविध भागांमध्ये तंबाखू सेवन करण्याच्या प्रकारांमध्ये विविधता आढळते, असे सांगून डॉ. रांदड म्हणाले, की वयाच्या आठ ते दहाव्या वर्षापासूनच मुलांचे पाय पानटपरी कडे वळत आहेत. लहान वयातच तंबाखू सेवन आणि धूम्रपानाचे व्यसन लागलेल्यांना भविष्यात मुख कर्करोगाचा हमखास त्रास होतो. त्यामुळे आपली मुले घराबाहेर असताना काय करीत असतात? याकडे पालकांनी वेळीच लक्ष देण्याची गरज असल्याचेही डॉ. रांदड म्हणाले. 



फॅशनच्या नावाखाली जीवघेण्या तंबाखू आणि गुटख्याचे सेवन


तंबाखूमुळे होणारा मुखकर्करोग हा समाज मनाचा थरकाप उडवणारा आणि रूग्णांसोबतच त्यांच्या कुटुंबाच्या सौख्याला सुरूंग लावणारा आजार असून, शरीरात होणाऱ्या विविध प्रकारच्या कर्करोगांमध्ये मुखकर्करोग हा सर्वात घातक आहे. त्यामुळे पाश्चात्य देशांप्रमाणे फॅशनच्या नावाखाली जीवघेण्या तंबाखू आणि गुटख्याच्या आहारी जाऊ नका, असे आवाहनही डॉ. रांदड यांनी युवापिढीला केले आहे.





धूम्रपान आणि तंबाखूजन्य पदार्थांचे अतिसेवन यामुळे मुख कर्करोगाला आयतेच आमंत्रण मिळते. आजची युवापिढी विविध व्यसनांच्या आहारी गेली असून, तंबाखू , पान, गुटखा, खर्रा यांची जीवनात कधी ना कधी संगत केलेल्यांपैकी 95 टक्के जणाना मुख कर्करोगाने ग्रासल्याचे एका पाहणीत आढळून आले आहे. धूम्रपान आणि तंबाखू वा तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणारे बहुतांशी वर्ग आर्थिक दुर्बल घटकातील व अशिक्षित असल्याने त्यांना या आजाराची प्राथमिक लक्षणे माहिती नसतात, आणि माहिती झाल्यावरही दुर्लक्ष करतात. मात्र लक्षणे दिसताच त्यांनी वेळीच दंतरोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. कारण तोच त्यांच्या आजाराचे योग्य निदान करू शकतो. 




कित्येकवेळा गरीबी सोबत सामाजिक परिस्थिती आणि सामाजिक भीती, मुख कर्करोग झाल्यास त्याला मिळणारा अपुरा आहार आदी बाबी त्यांच्यासाठी जीवघेण्या ठरतात.  तंबाखूमुळे होणाऱ्या या आजारावर प्राथमिक स्वरूपात असतानाच होणारा खर्च परवडणारा असतो आणि रूग्ण बरा होण्याची शक्यता बळावते परंतु या आजाराने रौद्र रूप धारण केल्यावर रूग्ण मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या पुरता खचून जातो आणि त्यातच त्यांचा अंत होतो. म्हणून शाळकरी मुले असोत की युवक कोणीही फॅशनच्या नावाखाली तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थ सेवन करण्याची सवय लावून घेऊ नये, असा मोलाचा सल्लाही डॉ. रांदड यांनी याप्रसंगी दिला.




शासनाने केलेली गुटखाबंदी केवळ कागदावरच


विदेशात सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान केल्यास जबरदस्त दंड आकारला जातो. भारतात मात्र केवळ घोषणांचा पाऊस पाडला जातो, अंमलबजावणी मात्र शून्य होते. आजही जिकडेतिकडे खुलेआम धूम्रपान करणारे पहावयास मिळतात. शासनाने केलेली गुटखाबंदी केवळ कागदावरच आहे. सध्याच्या कोरोना काळात तर गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणारे मालामाल झाले आहेत, यातूनच शासनाच्या योजनेचे कसे तीनतेरा वाजले आहेत याची प्रचिती येते. हा विषय केवळ घोषणा करून संपणारा नाही याची गंभीर दखल शासनाने घेण्याची वेळ आली असल्याचेही डॉ. रांदड म्हणाले.


टिप्पण्या