- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
10th board exam: दहावीची परीक्षा रद्द झाल्याचे अधिकृत जाहीर; विदर्भ मुख्यध्यापक संघाने केले शासन निर्णयाचे स्वागत तर गुणवंत विद्यार्थ्यांनी केली नाराजी व्यक्त
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
file photo
नीलिमा शिंगणे-जगड
अकोला: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची इयत्ता दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने बुधवारी शासन निर्णयाद्वारे अधिकृत जाहीर केला. दहावीची परीक्षा रद्द केल्यामुळे गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र देण्याबाबत अकरावी प्रवेश प्रक्रियेबाबत स्वतंत्रपणे आदेश देण्यात येतील, असे या निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. हा निर्णय जाहीर झाल्याने संभ्रमात असलेल्या विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांना दिलासा मिळाला असल्याने विदर्भ मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य शत्रुघ्न बिरकड यांनी निर्णयाचे स्वागत केले आहे.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द केल्याची घोषणा शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली होती. परीक्षा रद्द करण्याचा निर्णय कागदोपत्री अधिकृत जाहीर न झाल्याने विद्यार्थी, पालक, शिक्षक संभ्रमावस्थेत होते. शिक्षणमंत्री गायकवाड यांच्या घोषणेनंतर तब्बल बावीस दिवसांनी परीक्षा रद्द करण्याबाबतचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने प्रसिद्ध केला. यामुळे आता विद्यार्थी, पालक तसेच शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २०२०-२१ शैक्षणिक वर्षासाठी होणारी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता दहावी) रद्द करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, विनियम १९७७ मध्ये आवश्यक ते बदल करण्याबाबत मंडळाने यथोचित कार्यवाही करावी, अशी माहिती या निर्णयाद्वारे उपसचिव राजेंद्र पवार यांनी दिली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण मंत्रालयाने मध्यंतरी दहावीची परीक्षा रद्द करण्याचे ठरविले होते. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने देखील परीक्षा रद्द होण्याबाबत ठराव घेतला होता .परंतु या निर्णयानंतर महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रातून व पालकांकडून परीक्षा रद्द झाल्या म्हणून ओरड झाली होती. तसेच शासनाच्या अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी देखील याबाबत निवेदन दिले होते. मात्र,आता कोरोनाची भीषण परिस्थिती पाहता परीक्षा घेणे शक्य नव्हते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बुधवारी नवीन जीआर काढून दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द केल्याने ही ओरड थांबली आहे.
गुणवंत विद्यार्थ्यांचे नुकसान
"बोर्डाने परीक्षा घेणे आवश्यक होते .मी खूप अभ्यास केला. परंतू, परीक्षा झालीच नाही. आमची गुणवत्ता शासन कशी ठरविणार, हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. परीक्षा रद्द झाल्याने आता हुशार व गुणवंत विद्यार्थ्यांचे तर अतोनात नुकसान होणार आहे. शाळेचे मुख्याध्यापक आमच्या गुणांचे कसे मूल्यमापन करतील. गुणपत्रिका कशी दिली जाईल, असा प्रश्न आता आम्हा विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे. आम्हा विद्यार्थ्यांचे नुकसान होवू देवू नये याची दक्षता शासनाने घ्यावी."
वैदही मोहन धवणे
वर्ग १० वा
विद्यार्थी
आता परीक्षेची प्रतीक्षा संपली
"महाराष्ट्र शासनाने १० वी बोर्डाची परीक्षा रद्द बाबत आदेश काढला आहे. हा शासनाने योग्य निर्णय घेतला आहे त्यामुळे आता विद्यार्थ्यांची परीक्षा कधी होईल ही प्रतीक्षा संपली आहे."
बळीराम झांबरे
अध्यक्ष,
अकोला जिल्हा मुख्याध्यापक संघ.
शासनाचा निर्णय स्वागतार्ह
"आज रोजी महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे .त्यामुळे सध्या दहावीची बोर्डाची परीक्षा घेणे योग्य नव्हते. बोर्डाने दहावीची परीक्षा रद्द करण्याचा जो निर्णय घेतला आहे तो स्वागतार्ह आहे."
प्राचार्य शत्रुघ्न बिरकड
अध्यक्ष,
विदर्भ मुख्याध्यापक संघ
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा