Corona test center: कोरोना चाचणी केंद्रावर 'टेस्टिंग किट' चा अभाव; व्यापारी वर्गाचे हाल, प्रत्येक केंद्रावर होताहेत छोटे-मोठे वाद




भारतीय अलंकार 24

अकाेला: दुकाने खुली करण्यासाठी व्यापारी व कामगारांना करोना चाचणी बंधनकारक केल्यानंतर जिल्हा व महापालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उचलण्याआधी चाचणी केंद्राचे नियोजन करणे भाग होते. मात्र, तसे नियोजन न करता केवळ दुकानांवर कारवाई करण्याला प्राधान्य देण्यात आले. या प्रकाराने व्यापारी व कामगारांमध्ये असंतोष पसरल्यावर जिल्हा व मनपा प्रशासनाने विविध भागात चाचणी केंद्र उघडले; मात्र टेस्टिंग किटचा तुटवडा निर्माण झाल्याने भर उन्हात रांगेत उभे असणाऱ्या शेकडो व्यापाऱ्यांचे हाल होऊन त्यांना आल्या पावली माघारी फिरावे लागल्याचे चित्र आज रविवारी देखील पुन्हा दिसून आल्याने प्रशासनात ताळमेळ नसल्याचे स्पष्ट झाले.




अकाेलेकरांच्या बेफिकिरीमुळे काेराेनाच्या प्रादूर्भावात झपाट्याने वाढ झाल्यामुळे जिल्हाप्रशासनाने २३ फेब्रुवारी पासून जिल्ह्यासह शहरात लाॅकडाऊनचा निर्णय घेतला. व्यापार ठप्प होण्याच्या धास्तीने व्यापाऱ्यांनी दुकाने खुली करण्याची परवानगी मागितली असता जिल्हा प्रशासनाने कोरोना चाचणी बंधनकारक केली.



अर्थात व्यापारी व कामगारांची संख्या लक्षात घेता चाचणीसाठी जिल्हा व महापालिका प्रशासनाने चाचणी केंद्रांची संख्या वाढवून टेस्टिंग किट उपलब्ध करून देणे अपेक्षित होते. तसे न करता व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा उगारला.



व्यापारी व कामगारांना कोविड चाचणी बंधनकारक केल्यामुळे चाचणी केंद्रासमोर शुक्रवारी व शनिवारी व्यापाऱ्यांनी लांबच लांब रांगा लावल्या. मनपाच्या चाचणी केंद्रांवर टेस्टिंग किट संपल्याने अवघ्या काही तासात गाशा गुंडाळल्याचे  समाेर आले. अनेक चाचणी केंद्रांवर किमान १०० व त्यापेक्षा अधिक किट उपलब्ध असताना त्याठिकाणी किमान ७०० ते ८०० व्यापाऱी व कामगारांनी गर्दी केल्याचे चित्र होते. भर उन्हात व्यापारी,कामगार तासन् तास ताटकळत उभे होते. काहीनी चक्क बार्शिटाकळी गाठले पण तेथे ही किट नव्हत्या.




आज कस्तुरबा रुग्णालयात वाद 

जुने शहरातील डाबकी रोडवरील      कस्तुरबा रुग्णालयातही किट संपल्याने संतप्त व्यापारी नागरिकांनी आरोग्य कमर्चाऱ्यां साेबत वाद घातला. जवळपास सर्वच ठिकाणी अशीच परिस्थिती आहे. काल शनिवारी जवाहर नगर येथील एका केंद्रात किट संपल्यामुळे व्यापारी नागरिक व कर्मचाऱ्यांचा वाद विकोपाला गेला होता. कपडा बाजार, गीता नगर येथील केंद्रावर सुद्धा फारशी वेगळी परिस्थिती नव्हती.



केंद्रावर अपुऱ्या सुविधा

जिल्हा व मनपा प्रशासनाने सुरु केलेल्या चाचणी केंद्रांवर स्वॅब घेण्यासाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा अभाव हाेता. संगणक  नोंदणी करण्यासाठी नागरी आरोग्य केंद्रांकडून मनपाला डाटा एन्ट्री ऑपरेटरची मागणी केली जात असताना मनपाकडून दुर्लक्ष केले जात आहे. रॅपिड अन्टिजेन टेस्ट केल्यानंतर अनेकांना अहवाल प्राप्त हाेत नसल्याची परिस्थिती आहे. अशास्थितीत व्यापाऱ्यांवर दबावतंत्र कशासाठी, असा सवाल उपस्थित केला जात आहे.




जिल्हा प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी डाॅ.निलेश अपार, मनपातर्फे प्रभारी आयुक्त डाॅ.पंकज जावळे यासंपूर्ण कामकाजावर लक्ष ठेवून आहेत. परंतु प्रत्यक्षात चाचणी केंद्र सुरू केल्यानंतर या दाेन्ही यंत्रणांची धांदल उडाल्याची परिस्थिती असून यामध्ये व्यापारी वर्ग नाहक भरडल्या जात असल्याचे चित्र समाेर आले आहे.


video: जवाहर नगर चौक: अकोल्यातील अकराही कोविड चाचणी केंद्रावर गर्दी;जवाहर नगर सेंटरवर शनिवारी व्यापारी नागरिक आक्रमक झाले

टिप्पण्या