Akola Police: शहर वाहतूक पोलीस अजहर शेख यांची अशीही प्रामाणिकता ; पाच हजार रुपये असलेली पर्स केली महिलेला परत,गृहमंत्री यांनी घेतली दखल




भारतीय अलंकार24

अकोला: शहरातील बेशिस्त वाहतुकीला वळण लावण्यासाठी दिवसरात्र कार्यरत असलेल्या शहर वाहतूक पोलीसानी आपल्या धडाकेबाज कारवाई सोबत वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवून जनमानसात एक वेगळी प्रतिमा तयार केली आहे. शहर वाहतूक पोलीस शहरातील वेगवेगळ्या चौकात आपले कर्तव्य पार पाडतात. उन्ह, वारा,पावसाची पर्वा न करता, वाहतुकीला सांभाळण्याची महत्वाची जबाबदारी पार पाडीत असतांना; बऱ्याच वेळेस जेष्ठ नागरिकांना रस्ता ओलांडण्यास मदत करणे, रस्त्यावरील गरीब भुकेल्याना अन्न देणे, या बरोबरच घाई गर्दीत एखाद्या नागरिकाचा हरवलेला मोबाईल, महत्वाचे कागदपत्रे, पाकीट त्यांनी प्रामाणिक परत केलेली आहेत. प्रसंगी संबधितांचा परिश्रम पूर्वक शोध घेऊन वस्तू परत केली आहेत. 





असाच एक प्रसंग काल १ मार्च रोजी स्थानिक टॉवर चौकात घडला. तेथे कर्तव्य बजावित असलेले शहर वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार अजहर शेख यांना चौकात एक लेडीज पर्स पडलेली आढळून आली, ती उघडून बघितली असता, त्या मध्ये अतिशय महत्त्वाची कागदपत्रे जसे क्रेडिट कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना अशी महत्वाची कागदपत्रे व ५००० रुपये रोख आढळून आले. त्यांनी  कागदपत्रावरून माहिती घेतली असता, ही लेडीज पर्स  कोर्ट कॉलनी, मोठी उमरी येथील रहिवासी स्नेहल निकाते यांची असल्याचे निष्पन्न झाले.




अजहर शेख हे शोध घेत असतानाच १५ ते २० मिनिटानंतर एक महिला काही तरी शोधतांना दिसून आल्याने, वाहतूक पोलीस अजहर शेख यांनी त्यांचे कडे चौकशी केली असता, त्यांनी महत्वाचे कागदपत्रे व पैसे असलेली पर्स हरविल्याचे सांगितले.      त्यानंतर ओळख पटवून अजहर शेख यांनी महत्वाची कागदपत्रे व जवळपास ५००० रुपये असलेली पर्स त्या महिलेला परत केली. पर्स मिळाल्याने महिलेला  खूप आनंद झाला व त्यांनी अकोला पोलिसां प्रति आपली कृतज्ञता व्यक्त केली. शहर वाहतूक पोलीस अजहर शेख यांच्यातील प्रामाणिकपणा बद्दल पोलीस निरीक्षक गजानन शेळके व शहर वाहतूक शाखेच्या सर्व पोलीस अमलदारांनी त्यांचे अभिनंदन केले.


गृहमंत्री यांनी घेतली कार्याची दखल


शेख यांच्या कार्यची दखल घेवून, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी समाज माध्यमातून  कौतूक केले.


"दुचाकीवरून जाताना ५ हजार रुपये रोख असलेली पर्स  रस्त्यात पडल्यावर वाहनचालक तरूणीला ती पर्स परत देऊन वाहतूक पोलीस अंमलदार मोहम्मद अझहर यांनी दाखविलेली ही कर्तव्यतत्परता आणि प्रामाणिकपणा अत्यंत कौतुकास्पद आहे.",असं त्यांनी यात म्हंटल आहे.


तर जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी देखील अजहर शेख यांना एक हजार (1000) रुपये रिवार्ड देऊन कौतुक केले आहे.

टिप्पण्या