Akola Police: crime news: अकोट ग्रामीण पोलिसांच्या चातुर्याने वाटमारीचा बनाव उघड; फिर्यादीच निघाला गुन्हेगार

 



भारतीय अलंकार 24

अकोला: अकोट शहरा लगत ताजनापूर  मार्गावर  एका कापूस व्यापाऱ्याला अडवून काही अज्ञात चोरांनी विळा दाखवून व मारण्याची धमकी देऊन त्याचे जवळील 646920 रुपये बळजबरीने लुटून नेल्याची फिर्याद  9 मार्च रोजी निलेश बापूराव सानप (रा.आसेगाव) यांनी दिल्यानंतर अकोट ग्रामीण ठाणेदार ज्ञानोबा फड यांनी त्यांचे सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन तातडीने सूत्र हलविली. ठाणेदारांचा दांडगा जनसंपर्क कामात आला. यानुसार   माहिती मिळाली की, फिर्यादीने दिलेली फिर्यादाच बनावट असून, असा कोणताही प्रकार त्या रात्री घडला नाही. हे सूत्र पकडून ठाणेदार ज्ञानोबा फड यांनी फिर्यादीची सखोल विचारपूस केली असता त्यांना फिर्यादीने सांगितलेल्या माहिती बाबत संशय आल्याने व अतिशय कल्पकतेने उलटसुलट विचारपूस व तपासणी केली असता, फिर्यादीचा बनाव उघड झाला. 





पुढे आलेली हकीकत अशी की, या प्रकरणातील  फिर्यादी हा  काही भागीदार मित्रा सह गावातील शेतकऱ्यांकडून त्यांचा शेतमाल घेऊन, त्याची तालुक्याचे ठिकाणी विक्री करून आलेला नफा सर्व मिळून वाटून घेत होते. ज्यांचे कडून शेतमाल घेतला त्यांना खरेदी किंमत देत होते. मागील 5 ते 6 वर्षा पासून हा व्यवसाय सुरू असल्याने आसेगावातील शेतकरी निलेश सानप याच्यावर विश्वास ठेवून आपला माल त्यांना विक्री साठी देत होते. परंतू, सानप याचे भागीदार मित्राने हिशोब न केल्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या फिर्यादीने आसेगाव मधील काही शेतकऱ्यां कडून कापूस घेऊन त्याची अकोट येथे विक्री करून मिळालेली नगदी  रक्कम 646920 ही रक्कम त्यांचे अडगाव येथील नातेवाईक यांना उमरा फाटा येथे बोलावून त्यांच्याकडे दिली. रात्री ही रक्कम आसेगाव येथे घेऊन जाणे धोक्याचे असल्याने उद्या सकाळी रक्कम घेऊन जाईल, असे सांगितले. मोटारसायकलने ताजनापूर- वडगाव रस्त्यावरील हमीद मास्टर यांच्या शेताजवळ आल्यानंतर त्याचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल बाजूचे कांद्याचे शेतात फेकून दिला. स्वतःच्या हाताने स्वतःच्या शर्टाचे बटन तोडून  आरडाओरडा केला. आरडाओरडा ऐकून जवळ आलेल्या लोकांना काही अज्ञात लोकांनी मोटारसायकल अडवून विळा दाखवून व मारण्याची धमकी देऊन जवळील 6 लाख रुपये बळजबरीने घेऊन गेल्याचे सांगितले. यानंतर पोलीस स्टेशनला जावून रितसर तक्रार नोंदवली. ही फिर्याद अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनला दिली. फिर्यादीने स्वतः खोटी फिर्याद दिल्याची कबुली देऊन 646920 रु काढून दिले. कांद्याचे शेतात फेकलेला  मोबाईल सुद्धा पोलिसांना दाखवला. घटनेतील रक्कम व मोबाइल पोलिसांनी जप्त केला आहे.




वाटमारी सारखा गुन्हा दाखल होण्याचे 24 तासाचे आत सदर गुन्हा उघड केल्याने अकोट ग्रामीणचे ठाणेदार ज्ञानोबा फड व त्यांचे सहकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. ही कार्यवाही  जिल्हा पोलीस अधिक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधिक्षक मोनिका राऊत, उपविभागीय पोलीस अधिकारी तुकाराम काटे व स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शैलेश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली अकोट ग्रामीण ठाणेदार ज्ञानोबा फड व त्याच्या सहकाऱ्यांनी केली.

टिप्पण्या