Political news: काँग्रेस नेते नाना पटोले यांचा राजीनामा अन राजकारणात हालचाली ; हे सर्व मुख्यमंत्री पदासाठी का?

       राजकारण गल्ली ते दिल्ली

     ✍️ॲड. नीलिमा शिंगणे-जगड


*विधानसभा अध्यक्षपदी आता कोणाची लागणार वर्णी? 

*काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावर पटोले यांच्या नावावर होणार का शिक्कामोर्तब! 

*पाटील यांचे स्वप्न पूर्ण होणार का?



काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे सादर केला आहे. राज्यातील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीमध्ये नाना पटोले यांचे नाव आघाडीवर आहे. त्यामुळेच नाना पटोले यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता नव्या विधानसभा अध्यक्षांची नेमणूक होईपर्यंत विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे विधानसभेचे हंगामी अध्यक्ष असतील.


नरहरी झिरवाळ हे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. आदिवासी बहुल भागातील जनतेचे ते प्रतिनिधित्व करतात. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जवळचे आणि हक्काचे कार्यकर्ते म्हणून नरहरी झिरवाळ यांची ओळख आहे


महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर काँग्रेस आमदार नाना पटोले यांच्यावर विधानसभेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. विधानसभेचे उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे देण्याचे जागा वाटपात ठरले होते. तर उपाध्यक्षपद झिरवाळ यांच्याकडे सोपविले आहे. आता पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर नव्या विधानसभा अध्यक्षांची नेमणूक होईपर्यंत झिरवाळ हेच विधानसभेचे हंगामी अध्यक्ष असतील.



महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष नाना पटोले देखील काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल सुरु आहेत. आता बाळासाहेब थोरात यांच्यानंतर प्रदेशाध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडीकरीता पक्षश्रेष्ठींकडे हालचाली सुरु आहेत. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद मिळवण्यास उत्सुक असल्याची माहिती समोर आली होती.


विधानसभा अध्यक्ष शर्यतीत कोण कोण


नाना पटोले यांच्या रिक्त जागेवर तीन काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची नावे चर्चेत आहेत. भोर विधानसभा आमदार संग्राम थोपटे यांचे नाव पुढे आले आहे. 


दुसरे नाव हे सुरेश वारपूडकर यांचे समोर आले आहे. सुरेश वारपूडकर हे पाथरी मतदारसंघामधून निवडून आले आहेत. 


अमीन पटेल हे मुंबईतील आमदार आहे. मुंबादेवी मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून काम केलं आहे. या तीन पैकी कोणतं नाव बाजी मारेल, की चौथाच चेहरा समोर येवून त्याच्या नावावर शिक्कामोर्तब होईल,हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.


शरद पवार यांचे सूचक वक्तव्य

नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे होतं ते खुलं झालं आहे. विधानसभेचा नवा अध्यक्ष निवडण्यासाठी आता पुन्हा चर्चा होईल”, असं शरद पवार यांनी सांगितले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून या पदासाठी आता जोर लावला जाणार, असे संकेत मिळत आहेत.



सत्तास्थापनेच्या सूत्रानुसार काँग्रेसकडे विधानसभा अध्यक्षपद गेले. ठरल्याप्रमाणे मुख्यमंत्रिपद शिवसेनेला तर उपमुख्यमंत्री, अर्थ, गृह ही महत्त्वाची खाती राष्ट्रवादीला मिळाली. २०१९ मधील विधानसभा निकालानुसार, भाजपला १०५ जागा मिळाल्या होत्या. शिवसेनेला ५६, राष्ट्रवादीला ५४ आणि काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या. राष्ट्रवादीला शिवसेनेपेक्षा केवळ दोन जागा कमी होत्या. मात्र अपक्षांसह शिवसेनेने आपलं संख्याबळ ६० पर्यंत वाढवले. तरीही महाविकास आघाडीत राष्ट्रवादीकडे सर्वाधिक १६ मंत्रिपदं आहेत. शिवसेनेकडे मुख्यमंत्रिपदासह १४ आणि काँग्रेसकडे विधानसभा अध्यक्षांसह १२ खाती आहेत.


जयंत पाटलांचे ते वक्तव्य

जयंत पाटील यांनी सांगलीत मुख्यमंत्री पदाबाबत भाष्य करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. “गेली २० वर्ष राजकारणात सक्रिय आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पाहणे हे नक्कीच ‘दिवास्वप्न’ नाही, तर राजकारणातील शक्तीने हे स्वप्न हस्तगत करणं हेच आपलं उद्दिष्ट आहे”, असं जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वक्तव्य केले होते. इस्लामपूर येथे एका कार्यक्रमासाठी जयंत पाटील आले होते. यावेळी त्यांनी स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना मुख्यमंत्री पदाबाबतची सुप्त इच्छा उघड केली होती. नाना पटोले यांच्या राजीनामामुळे जयंत पाटील यांच्या या वक्तव्याची परत एकदा चर्चा होत आहे.हे वक्तव्य आणि राजीनामा याचा काय संबंध याचे तर्क वितर्क राजकीय क्षेत्रात लावले जात आहेत.चर्चेला देखील उधाण आले आहे.





टिप्पण्या