School education: विद्यार्थी व पालकांची चिंता दूर; दहावी - बारावी परीक्षेच्या तारखा जाहीर

                                       file photo



भारतीय अलंकार24

मुंबई: बारावीची लेखी परीक्षा २३ एप्रिल पासून सुरु होणार आहे आणि निकाल जुलैच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर केला जाईल. तर दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते ३१ मे दरम्यान घेतली जाईल आणि निकाल ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर केला जाईल अशी माहिती  शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी आज दिली आहे. 


ssc exam

एसएससी (इ. १० वी) बोर्डाची परीक्षा २९ एप्रिल ते ३१ मे २०२१ या कालावधीत घेण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. दहावी परीक्षेचा निकाल ऑगस्ट २०२१ च्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल. 


hsc exam


यंदा एचएससी (इ. १२ वी) बोर्डाची परीक्षा येत्या २३ एप्रिल ते २९ मे २०२१ दरम्यान घेण्यात येईल. या परीक्षेचा निकाल अंदाजे जुलै २०२१ च्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेची काळजी घेण्यात येईल,असे गायकवाड यांनी सांगितले.


बारावीची प्रॅक्टिकल परीक्षा १ एप्रिल ते २२ एप्रिल दरम्यान घेतली जाणार आहे. तर दहावीची प्रॅक्टिकल परीक्षा ९ एप्रिल ते २८ एप्रिल दरम्यान पार पडणार आहे.


विद्यार्थ्यांची उपस्थिती

राज्यात इ. ९ वी ते इ.१२ वी च्या शाळांमध्ये दिवसेंदिवस विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढत आहे. १८ जानेवारी रोजीच्या आकडेवारी नुसार २१,६६,०५६ विद्यार्थी शाळांमध्ये येत आहेत व २१२८७ शाळा सुरू आहेत. सुमारे ७६.८% विद्यार्थी शाळांमध्ये येत आहेत. हे उत्साहवर्धक चित्र असल्याचे गायकवाड यांनी सांगितले आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च २०२० पासून शाळा बंद होत्या. ऑनलाइन वर्गावर भिस्त ठेवून आता परीक्षांची तयारी विभागाने सुरू केली होती. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षांच्या तारखा नुकत्याच जाहीर केल्या. त्यानंतर आता राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या परीक्षा कधी होणार याबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता होती. कोरोनामुळे यंदा शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक कोलमडले आहे.तर पालक वर्गात आपल्या पाल्यांच्या भविष्याविषयी चिंता लागून आहे.आज वेळापत्रक जाहीर केल्याने ही चिंता काही प्रमाणात दूर होईल,अश्या प्रतिक्रिया पालक वर्गातून व्यक्त होत आहे.





टिप्पण्या