Pratiksha Mehtre murder case: अमरावती: बहुचर्चित प्रतिक्षा मेहेत्रे हत्याकांडातील आरोपीला आजन्म कारावास

                                      file photo




अमरावती: बहुचर्चित प्रतिक्षा मेहेत्रे हत्याकांडातील आरोपी राहुल बबन भड याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उर्मिला जोशी (फलके) यांच्या न्यायालयाने आज बुधवारी आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली. या निकालामुळे पीडित कुटुंबाला न्याय मिळाल्याची जनभावना व्यक्त होत आहे.



न्यायालयात दाखल दोषारोप पत्रानुसार, २३ नोव्हेंबर २०१७ रोजी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास प्रतिक्षा मुरलीधर मेहेत्रे (वय २४, रा. छाबडा प्लॉट) ही मैत्रिणी सोबत दुचाकीने साईनगरातील वृंदावन कॉलनीतील ओंकार मंदिरात दर्शनाकरिता गेली होती. दोघीही घरी परत येत असताना मार्गात दुचाकीवर आलेल्या राहुल भड याने ओव्हरटेक करीत त्यांना अडविले. यावेळी प्रतीक्षा व राहुल यांच्यात संवाद सुरू होता. दरम्यान, राहुलने अचानक बॅगेतून चाकू काढून प्रतिक्षावर हल्ला चढविला.


प्रतिक्षा रक्तबंबाळ अवस्थेत कोसळली. तिच्या मैत्रिणीने मदतीसाठी आरडाओरड केली. तातडीने ओंकार मंदिर गाठून तिने घटनेची माहिती राजेंद्र येते यांना दिली. येते यांनी एका महिलेसह घटनास्थळ गाठून प्रतिक्षाला वाहनाने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी प्रतिक्षाला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच प्रतिक्षाचे वडील इर्विनमध्ये पोहोचले होते.


प्रतिक्षाच्या वडिलांनी राजापेठ पोलिस स्टेशनला तक्रार केली. त्यावरून पोलिसांनी आरोपी राहुल भड विरुध्द हत्येचा गुन्हा नोंदवून शोध सुरू केला. या घटनेनंतर राहुल हा दुचाकीने दिग्रसला गेला. तेथील एका लॉजवर १५ मिनिट थांबला. पार्किंगमध्ये दुचाकी उभी करून, त्याने विषारी औषध प्राशन केले. त्यानंतर तो मूर्तिजापूर रेल्वेस्थानक जवळील रुळावर जाऊन झोपला. दरम्यान, राजापेठ पोलीस राहुल भड याच्या शोधात मूर्तिजापूरला पोहोचले. पोलिसांनी पहाटे ४ वाजता राहुल याला रेल्वे रुळावरून अटक केली. याप्रकरणी तपास अधिकारी पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांनी तपास पूर्ण करून २० फेब्रुवारी २०१८ रोजी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले.



या प्रकरणात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उर्मिला जोशी (फलके) यांच्या न्यायालयात एकूण सात जणांची साक्ष नोंदविली. साक्षीदारांची साक्ष आणि सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायमूर्ती उर्मिला जोशी (फलके) यांच्या न्यायालयाने आरोपी राहुल भड याला आजन्म कारावास, ५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १ वर्ष अतिरिक्त सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात जिल्हा सरकारी वकील परीक्षित गणोरकर यांनी प्रभावी युक्तिवाद केला.

टिप्पण्या