land records: शेती मोजणीसाठी तारीख देऊनही शासकीय कर्मचारी न पोहोचल्याने भूमी अभिलेख कार्यालयास शेतकऱ्यांनी ठोकले कुलूप!

Farmers lock the land records office as government employees did not reach.



अकोला: पातूर मधील भंडारज बु येथील शेती मोजणीचे अतितातडीने मोजणीचे पैसे भरून दिलेल्या तारखेला आज कुणीही अधिकारी कर्मचारी न आल्याने संतप्त शेतकरी राजेंद्र पातोडे  व इतर शेतकरी यांनी भूमी अभिलेख पातूर कार्यालयास कुलूप ठोकले. ही घटना आज घडली.


राजेंद्र पातोडे यांचे भंडारज बु येथे शेत आहे. सर्व्हे क्र १२६/१ च्या शेतीची मोजणीचा अर्ज सादर केला असता, या शेतशिवारातील शेतीचे क्षेत्रफळ आणि सर्व शेतकऱ्यांचे शेती क्षेत्रफळा मध्ये तफावत असल्याने मोजणी करता येत नाही, असे बेजबाबदार उत्तर भूमी अभिलेखच्या वतीने देण्यात आले होते. त्यावर कार्यालयाचे रेकोर्ड तपासले असता, नमूद क्षेत्रफळ आणि सातबारा वरिल क्षेत्रफळ यात कुठलीही तफावत नसल्याचे स्पष्ट झाले.


त्यानंतर अतितातडीने मोजणी करण्यासाठी १ डिसेंबर २०२० रोजी १२००० रुपये चालान भरून घेतले. पैसे भरल्यानंतर १२/१२/२०२० रोजी मोजणी नोटीस काढण्यात आली. त्यानुसार  भूमापक यांचेकडे मोजणी जबाबदारी दिली असून, आज १८/१/२०२१ रोजी मोजणी ठेवण्यात आल्याची नोटीस देण्यात आली. 


या नोटीस प्रमाणे सर्व आजूबाजूला असलेले शेतकरी आणि मोजणी करीता आलेली माणसे वाट पाहत होते. दुपारी ३ वाजे पर्यंत कुणीही फिरकले नाही. त्यामुळे पातूर भूमिअभिलेख कार्यालय गाठले असता, ड्रोन मोजणी करीता कर्मचारी पाठविले असल्याचे सांगण्यात आले. मात्र, मोजणी पुढे ढकलली याबाबत कुठलीही सूचना राजेंद्र पातोडे यांना देण्यात आले नाही. सोबतच उपअधीक्षक हे कार्यालयात हजर नव्हते, कुणाचाही फोन घेत नव्हते. म्हणून संतापलेल्या पातोडे यांनी कार्यालयास कुलूप ठोकले.


शेवटी कार्यालय प्रमुख आल्यानंतर त्यांनी  १ फेब्रुवारी ही मोजणी तारीख दिली त्यामुळे कार्यालयाचे कुलूप खोलून दिले. तफावत असल्याचे पत्र देणारे आणि मोजणी कमी गैरहजर राहणारे व सूचना न देणारे यांचे विरुद्ध कार्यवाही करण्याची मागणी राजेंद्र पातोडे यांनी केली आहे.

टिप्पण्या