Crime news: अल्पवयीन मुलीसोबत विवाह करण्याचा युवकाचा हट्ट...अन पोलीस ठाण्यातच केलं त्याने विष प्राशन

                                     file photo


भारतीय अलंकार24

हिवरखेड: तळेगाव बाजार येथील एका युवकाने हिवरखेड पोलीस स्टेशनच्या प्रांगणात विष प्राशन केल्याची घटना घडली.  


हिवरखेड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील तळेगाव बाजार येथील विकास बाळकृष्ण घनबहादुर या २१ वर्षीय तरुणाचे गावातीलच एका अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध काही वर्षांपासून सुरू होते. दोघांचा प्रेमविवाह करण्याचा मानस असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली. मात्र, मुलगी अल्पवयीन असल्याने मुलीच्या पालकांचा त्यांच्या लग्नाला विरोध होता. परंतू हा युवक अल्पवयीन मुलीसोबत विवाह करण्याचा हट्ट धरून बसला होता. त्यामुळे हे प्रकरण पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचले. मुलगा मुलगी आणि दोघांचेही पालक पोलीस स्टेशन मध्ये हजर झाले होते. मुलगी अल्पवयीन असल्याने मुलगी सज्ञान होईपर्यंत कायद्यानुसार विवाह करता येत नाही, असे पोलिसांनी युवकाला समजावून सांगितले. परंतू प्रेमवेडा युवक कुणाचेही ऐकण्याच्या आणि  समजण्याच्या मनस्थितीत नव्हता. आणि त्याने शेवटी टोकाचे पाऊल उचलून पोलीस स्टेशनच्या प्रांगणातच विष प्राशन केले. या घटनेमुळे उपस्थितांची भांबेरी उडाली. पोलीस ठाणे परिसरात एकच खळबळ उडाली होती. 


हिवरखेड पोलिसांनी तात्काळ या युवकाला प्राथमिक आरोग्य केंद्र हिवरखेड येथे नेले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारार्थ अकोला सर्वोपचार रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. याप्रकरणी हिवरखेड पोलीस चौकशी करीत असून कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.


या प्रेमीयुगुलाने काही महिन्यांपूर्वी सुद्धा विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. परंतू दैव बलवत्तर म्हणून ते या मधून सहीसलामत बचावले, अशी माहिती  पोलीस चौकशीत समोर आल्याचे कळते.

टिप्पण्या