Big breaking: Akola: थरारक शोध मोहीम: अडीच महिन्यापासून बेपत्ता इसमाचा अखेर मृतदेह आढळला…

Big breaking: Akola: Thrilling search operation: body found after missing for two and a half months 




नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: निंबी मालोकार येथील एक इसम अडीच महिन्यापासून बेपत्ता होता.आज या इसमाचा मृतदेह अकोला ते पातुर रोडला लागून असलेल्या लाखनवाडा नजिकच्या एका विहीरीत आढळला. या मृतदेहाचा सांगाडा जीवरक्षक दीपक सदाफळे यांनी शर्थीचे प्रयत्न करुन बाहेर काढण्यासाठी यशस्वी कामगीरी पार पाडली. हा मृतदेह बाहेर काढताना उपस्थितांनी थरार अनुभवला.



विहिरीत गळ टाकून पहिले सांगाडा काढला. परंतू मुंडके मात्र काही केल्या निघत नव्हते. विहिरीत मिथेन गॅस असतांनाही दीपक सदाफळे यांनी आत  जाऊन मोठया शिताफीने प्रयत्न करुन एका हाताने शिडीवर चढत दुस-या हातात  मुंडके घेऊन वर आले. एखाद्या भयावह चित्रपटातील दृश्याप्रमाणे हा थरार उपस्थितांनी अनुभवला.



घटनाक्रम 

आज दुपारी बाळापुर पोलिस ठाण्याचे ठाणेदार दत्तात्र्य आव्हाड यांनी संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना फोन वरुन माहिती दिली की, एका विहीरीत असलेल्या मृतदेहाचे काही भाग व मुंडके काढुन देण्यासाठी पाचरण केले. यावेळी तात्काळ सर्च ऑपरेशन साहित्य घेऊन जिवरक्षक दीपक सदाफळे यांनी आपली सर्च ऑपरेशन टीम मयुर सळेदार, ऋषीकेश राखोंडे, अंकुश सदाफळे, ऋषीकेश तायडे, गोविंदा ढोके,गोकुळ तायडे, संकेत देशमुख,आकाश बगाडे यांना घेऊन घटनास्थळी पोहचले. तेव्हा ट्रेस केले असता, ही विहीर वापरात नसून या विहीरीत काही वर्षांपूर्वी दोनजण वायु गॅस मुळे गुदमरून मरण पावल्याची घटना घडल्याची माहिती मिळाली. 



तसेच निंबी मालोकार ता.जि.अकोला येथील रहिवासी शैलेश कैलास तायडे (वय अंदाजे ३०) नामक व्यक्ती अडीच महीन्यापासुन घरुन बेपत्ता असल्याची तक्रार दाखल होती. आज सकाळी काही लोकांना विहीरीत काहीतरी असल्याचे निदर्शनास आले. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. ही विहीर ५० फूट खोल असून त्यात तीन फुट घाण पाणी व गाळ आणि मोठया प्रमाणावर मिथेन गॅस तयार झाला असल्याने दीपक सदाफळे व पोलिसां समोर मोठे संकट उभे झाले होते. परंतू नातेवाईकांचा आक्रोश अन आरोप प्रत्यारोप यामुळे परीस्थिती गंभीर झाली होती. पडकी व खोल विहीर आणि त्यात मिथेन सारख्या प्रकारचा गॅस असल्याने अशावेळी १९ वर्षाच्या अनुभवाने परिपूर्ण असलेले जीवरक्षक दीपक सदाफळे यांनी शेवटी मोठे धाडस केले. 



थरारक मोहीम


सदाफळे यांनी आपल्या तोंडाला काॅटन रुमाल ओला करुन त्यावर पाणी टाकत टाकत जेसीबीच्या बकेट मध्ये जाऊन शिडी पर्यंत पोहचले. नंतर शिडीने खाली उतरुन सर्च ऑपरेशन सुरू केले. मात्र,  काही केल्या मुंडके सापडत नव्हते. शेवटी नेहमीप्रमाणे जिद्द आणि ते मी करणारच अश्या ध्येयवादी जीवक्षक सदाफळे यांनी घाण पाण्यात गाळाखाली दबलेले मुंडके शोधुन काढलेच. लगेच एका हातात मुंडके आणि दुस-या हाताने शिडी धरत चढाई करत, अश्या थरारक सर्च ऑपरेशनवर सदाफळे यांनी शेवटी सायंकाळी पाचच्या दरम्यान मात केलीच. मुंडके बाहेर काढताच मृतकाच्या नातेवाइकांनी आक्रोश केला. 


मोहीम यशस्वी

सदाफळे विहिरीतून वर बाहेर येताच त्यांचे कौतूक करतांना उपस्थितांच्या डोळ्यात अश्रु अनावर झाले.मृतकाचे नातेवाईकांनी देखील आपले दुःख थोडे बाजूला सारून सदाफळे यांचे आभार मानत कौतूकही करीत होते, हे विशेष. स्वतःचा जीव धोक्यात घालून सदाफळे यांनी ही कौतुकास्पद कामगिरी बजावली. यावेळी पोलीस टीम व गावातील नागरिकांनी तथा अग्निशमन टीमने मोलाचे सहकार्य लाभले. असे पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी सांगितले. तर या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

टिप्पण्या