Short film festival:कोरोना सावटामुळे यंदाचा डॅडी देशमुख लघुचित्रपट महोत्सव रद्द; बच्चू कडू यांच्या उपस्थिती होणार जयंती समारोह व पुरस्कार वितरण

This year's Daddy Deshmukh Short Film Festival is canceled due to Corona;  Bachchu Kadu will be present at the Jayanti function and award distribution



भारतीय अलंकार

अकोला : विदर्भ चित्रपट सृष्टीसह विविध सामाजिक, सांस्कृतिक, राजकिय क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे, विदर्भ चित्रपट महर्षी, अकोला जिल्हयाचे सुपुत्र डॅडी देशमुख यांच्या स्मृती प्रित्यर्थ दरवर्षी डॅडी देशमुख स्मृती लघु चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असते. परंतु यावर्षी कोरोना संकटामुळे लघु चित्रपट महोत्सव रद्द करण्यात आला आहे. मात्र, जयंती समारोहात जीवन गौरव पुरस्कार वितरीत करण्यात येईल. यावर्षी जयंती समारोहात अकोल्याचे जेष्ठ रंगकर्मी  अरुण घाटोळे यांना डॅडी देशमुख जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती आयोजन समितीने आमंत्रित केलेल्या पत्रकार परिषदेत प्रा.तुकाराम बिडकर यांनी दिली.


शुक्रवारी सेंट्रल प्लाझा येथे पत्रकार परिषद झाली. प्रा.बिडकर यांनी यावेळी सांगितले की, विदर्भाच्या कला गुणांना या निमित्ताने वाव मिळावा व नवोदीत कलाकारांना स्फूर्ती व मार्गदर्शन मिळावे, या उद्देशासह संत गाडगेबाबांचे धगधगते वैराग्य चित्रपटाद्वारे ज्यांनी जगापुढे आणले त्या आभाळाला गवसणी घालणाऱ्या डॅडी देशमुख यांच्या आठवणीला उजाळा देण्याचा आयोजन समितीचा प्रयत्न आहे. 




यानिमित्त आयोजित जयंती समारोह व पुरस्कार वितरण कार्यक्रमाला पालकमंत्री  बच्चू कडू यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. महापौर अर्चना मसने अध्यक्षस्थानी राहतील. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर , आमदार अमोल मिटकरी उपस्थित राहतील. जयंती महोत्सव हॉटेल सेंटर प्लाझा येथे रविवार २७ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता होणार आहे. अकोलकरांनी कार्यक्रमाला कोवीड-१९  नियमांचे पालन व मास्क परिधान करून हजर राहतील. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॅडी देशमुख यांचा जीवनावर लघुपट दाखविण्यात येईल, अशी माहिती आयोजन समितीच्या वतीने प्रा. बिडकर यांनी दिली. 



पत्रकार परिषदेत डॉ, संतोष हुशे, प्रा. सदाशिव शेळके, पंकज देशमुख, प्रा. मधु जाधव, कुणाल देशमुख, प्रा. अनुराग मिश्रा, डॉ. राजेंद्र देशमुख आदीसह आयोजन समितीच्या सदस्यांची उपस्थिती होती.



टिप्पण्या