Nagpur crime: नागपूर येथे माजी सैनिकांच्या घरी सशस्त्र दरोडा; दागिने आणि रोकड लुटून पिस्तुल घेवून पसार


भारतीय अलंकार

नागपूर: दोन माजी सैनिकांच्या घरावर दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकून रोकड आणि दागिने लुटून पिस्तूल घेऊन पसार झाले. ही घटना बुधवारी पहाटे नवीन कामठीतील रनाळा येथील पुरूषोत्तम ले-आऊट येथे घडल्याचे उघडकीस आले.



या घटनेने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. पहाटे तीन वाजताच्या सुमाराला तोंडावर कापड बांधलेले पाच सशस्त्र दरोडेखोर माजी सैनिक सुनील डेव्हिड यांच्या घरात घुसले. हॉलमध्ये डेव्हिड यांचा मुलगा झोपला होता. दरोडेखोरांनी त्याला बंधक बनवून, आरडाओरड केल्यास ठार मारणार,अशी धमकी दिली. त्यानंतर दरोडेखोर डेव्हिड यांच्या खोलीत गेले. कपाटातील १० हजारांची रोकड घेतली. डेव्हिड यांच्या पत्नीच्या बोटातील सोन्याची अंगठी हिसकावली. नंतर डेव्हिड यांच्याकडील परवानाधारक पिस्तूल घेऊन दरोडेखोर पसार झाले.


यानंतर दरोडेखोर माजी सैनिक शरद सहारे यांच्या घराकडे गेले.कुलूप तोडून आत घुसले. मात्र दरोडेखोरांच्या हाती काहीच लागले नाही. दरोडेखोर तेथून पसार झाले. सहारे कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. 



घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त निलोत्पल, सहाय्यक पोलिस आयुक्त परशुराम कार्यकर्ते आणि गुन्हेशाखा पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. पोलिसांनी पंचनामा करून दरोड्याचा गुन्हा दाखल केला. दरोडेखोरांच्या शोधासाठी पाच पथके स्थापन करण्यात आली असून,पुढील तपास पोलीस यंत्रणा करीत आहे. दरम्यान,आज अकोला जिल्ह्यातील वाडेगावातही दरोडाची घटना घडली. यामध्ये दोन बँक, दोन ज्वेलरी आणि एक हार्डवेअर दुकान लुटुन दरोडेखोर पसार झाले.

टिप्पण्या