Akola Police: स्तुत्य उपक्रम: महाराष्ट्र शासनाने केलेल्या आवाहनाला उस्फुर्त प्रतिसाद देत पोलीस अंमलदार व त्यांचे कुटुंबियांनी केले रक्तदान




भारतीय अलंकार

अकोला: कोविड -19 च्या प्रादुर्भावामुळे रक्त संकलन कमी झाल्याने महाराष्ट्रात अभूतपूर्व असा रक्ताचा तुटवडा पडला. अगदी दोन ते तीन दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा उपलब्ध असल्याचे आरोग्य मंत्र्यांनी जाहीर केले. यासाठी मुख्यमंत्री व आरोग्य मंत्री यांनी रक्तदान शिबिर आयोजित करून, रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. आवाहनाला उस्फुर्त प्रतिसाद देत शहर वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार व त्यांचे कुटुंबीयांनी आज शहर वाहतूक शाखेच्या प्रांगणात रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. कदाचित शासनाने आवाहन केल्यानंतर त्याला तातडीने प्रतिसाद देऊन पोलिसांनी आयोजित केलेले हे महाराष्ट्रातील पहिलेच रक्तदान शिबिर असावे.



रक्तदान शिबिराचे उदघाटन अकोला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांचे हस्ते झाले. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक  मोनिका राऊत  प्रामुख्याने उपस्थित होत्या. यावेळी शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी रक्तदान शिबिर आयोजित करण्या मागची भूमिका विशद केली. पोलीस हा घटक समाजा प्रति संवेदनशील असून, दिवसरात्र त्यासाठी  कार्यरत तर आहेच पण वेळ प्रसंगी रक्तदान सारखे श्रेष्ठ दान करण्यासाठी सुद्धा तत्पर आहे, असे यावेळी शेळके यांनी सांगितले.


पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांचे कौतूक करून, वाहतूक शाखा समाज उपयोगी व समाजाचे हिताचे उपक्रम नेहमी राबवित असते, त्यांनी राबविलेल्या नो मास्क नो सवारी या उपक्रमाचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांनी कौतूक करून, सर्व महाराष्ट्रात राबविले तसेच शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन त्यांनी सुरू केलेला रक्तदान शिबिराचा उपक्रम सुद्धा कौतुकास पात्र ठरतो, असा उपक्रम सर्व जिल्ह्यात राबविणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.


शिबिर दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत आयोजित केले होते व विशेष बाब म्हणजे आज शहरात बंदोबस्त असतानाही वाहतूक कर्मचाऱ्यांनी बंदोबस्तात कोणतीही कमतरता न ठेवता जवळपास ४० कर्मचारी व त्यांचे कुटुंबीयांनी उस्फुर्त  रक्तदान करून चांगला संदेश समाजाला दिला. रक्तदान शिबिरा मध्ये सर्वोपचार रुग्णालयाच्या रक्तपेढीच्या समन्वयक शिल्पा तायडे, डॉक्टर डोझी व त्यांची चमू सहभागी झाली होती.



टिप्पण्या