Tulsivivah2020: 'एक तुलसी विवाह ऐसा भी' अकोल्यात पार पडले आगळ्या वेगळ्या पद्धतीने तुळशीचे लग्न

            भारतीय सण-उत्सव

    ✍️ॲड.नीलिमा शिंगणे-जगड






भारतीय अलंकार

अकोला:हिंदू धर्मात तुळस या वनस्पतीला अनन्य साधारण महत्व आहे. प्रत्येक घराच्या परिसरात तुळशीचे रोप हे असतेच. औषधी गुणयुक्त तुळशी रोपांची आपल्या कन्ये प्रमाणे जोपासना करून तिचा विवाह भगवान श्रीविष्णूंच्या शाळीग्राम अवतार सोबत लावण्याची परंपरा आहे. या सोहळ्याला पौराणिक महत्त्व आहे. कारण  तुळसी विवाह नंतरच घरातील शुभकार्याला प्रारंभ होतो. तुळसी विवाह उत्सवाला धार्मिक महत्व असल्याने प्रत्येक घरात हा विधी पार पाडल्या जातो. परंतू अकोल्यातील शास्त्री नगर येथे या तुळशी विवाह धार्मिक विधीला सामाजिकतेची जोड देवून धूम धडाक्यात तुळशी विवाह करून खऱ्या अर्थाने उत्सव साजरा केला गेला.



अलिकडे उत्साह कमी

दिवाळी सणानंतर कार्तिक शुद्ध एकादशी पासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याचा प्रथा आहे. कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशी. या दिवशी श्रीविष्णू यांचा जागृतीचा उत्सव करतात. प्रबोध उत्सव आणि तुळशी विवाह हे दोन्ही उत्सव साजरा करण्याची रूढी आहे. अलीकडे ही प्रथा कमी होत चालली आहे. पूर्वी दिवाळी लक्ष्मीपूजन दिवसा सारखेच या दिवशी सुध्दा उत्साह दिसायचा.घरोघरी सनई चौघडाच्या निनादात तुळशी विवाह पार पडायचे.  काही हौशी आणि श्रीमंत लोक तर या दिवशी गाव जेवणच द्यायचे. मात्र, काही वर्षांपासून धकाधकीच्या जीवनशैली मुळे हा उत्साह कमी झालेला दिसतो. परंतू, अकोल्यातील शर्मा परिवाराने ही परंपरा जोपासली आहे. आणि या परंपरेला त्यांनी सामाजिक उपक्रमांचे तोरणही बांधले आहे.


शर्मा यांच्या घरी अनोखा तुलसी विवाह

शास्त्री नगर येथील रहिवासी असलेले व्यवसायिक पी. के. शर्मा यांच्या घरी  आगळ्या वेगळ्या पध्दतीने तुळशी विवाह पार पडतो. पाच वर्षांपासून त्यांच्या पत्नी नीता शर्मा हा सोहळा आयोजित करतात. या सोहळ्यात परिसरातील महिला मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. महिना भरा पासून या महिलांची तुळशी विवाह साठी लगबग सुरू असते. कारण हा विवाह  अगदी खऱ्या खुऱ्या उपवर-वधूच्या लग्ना सारखाच साजरा केला जातो.  वधू श्रीतुळसी देवीचा साज शृंगार करण्यात येतो. उपवर श्रीकृष्णाची वाजत गाजत परिसरातून वरात निघते. नाच गाणी बँडबाजा, फटाके, रुखवंत, वर पक्षाचे स्वागत, जेवणावळी, मंगलाष्टक असं सर्वकाही केल्या जाते.



सामाजिक संदेश


या विवाह सोहळ्याच्या माध्यमातून दरवर्षी  शर्मा परिवाराकडून एक सामाजिक संदेश देण्यात येतो. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता यावेळी या विवाह सोहळ्यात प्रत्येक उपस्थित वऱ्हाडी मंडळींना फेस मास्क देण्यात आला. सॅनिटायझरचा वापर करण्यात आला. तर कोरोना पासून सावध राहण्यासाठी विविध माहिती फलक लग्न मंडपात लावले होते. तर कोरोना योद्धांचा सन्मान म्हणून डॉक्टर,पोलीस,पत्रकार , नर्स, सफाई कामगार यांचे पुतळे उभारले  होते.  हा सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रशांत ताले विशेष परिश्रम घेतात.



तुळशी विवाह महत्व


हिंदू धर्मात तुळशीला पापनाशिनी म्हणतात. तुळस ही वनस्पती भारताच्या सर्व प्रांतांत व सर्व भागांत आढळते. बहुतांश हिंदू कुटुंबांच्या परसबागेत तुळशी वृंदावन असते. विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव कार्तिक द्वादशीपासून पौणिमेपर्यंतच्या एखाद दिवशी संध्याकाळी करतात, पण मुख्यत: द्वादशीला करतात. तुळसी विवाह हे एक व्रत मानले गेले आहे. हे व्रत केल्याने कर्त्याला कन्यादानाचे फळ प्राप्त होते, असे मानले जाते.



पूजा विधी व हेतू


घरातीलच कन्या मानून, घरातील तुळशी वृंदावनाची-तुळशीचे रोप असलेल्या कुंडी गेरू व चुन्याने रंगरंगोटी करून सजवितात. त्यावर बोर चिंच आवळा, कृष्णदेव सावळा असे लिहितात. बोर, चिंच, आवळा, सिताफळ  त्यात ठेवतात. कुटुंबातील कर्ता  स्नान करून तुळशीची आणि कृष्णाची पूजा करतो. नंतर त्यांना हळद व तेल लावून मंगल स्नान घालतो. तुळशीला नवीन वस्त्र पांघरतात व त्यावर मांडव म्हणून उसाची वा धांड्याची खोपटी ठेवतात. पूजेचे उपचार समर्पण करून विष्णूला जागे करतात व त्यानंतर बाळकृष्ण व तुळस या दोघांमध्ये अंतरपाट धरून मंगलाष्टके म्हणून त्यांचा विवाह लावला जातो. यानंतर तुळशीचे कन्यादान करतात. नंतर मंत्रपुष्प आणि आरती होते. घरच्या कन्येस श्रीकृष्णासारखा आदर्श वर मिळावा, असा त्यामागील हेतू असतो. या विधीच्या वेळी तुळशीभोवती दीप आराधना करण्याची पद्धती आहे. प्रत्येक प्रांतानुसार पूजा विधीत फरक असतो.


टिप्पण्या