Sheetal Amte: बाबा आमटे यांच्या नात शीतल आमटेची आत्महत्या

Baba Amte's granddaughter Sheetal Amte commits suicide




भारतीय अलंकार

चंद्रपूर: जेष्ठ समाजसेवक बाबा आमटे  यांची नात डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याचे आज उघडकीस आले. डॉ. शीतल आमटे-करजगी या आनंदवनातील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक मंडळाच्या सदस्य होत्या. डॉ. शीतल आमटे काही दिवसांपासून मानसिक तणावात होत्या त्यातूनच त्यांनी आत्महत्या केली असावी, अशी शक्यता व्यक्त होत आहे.



डॉ. शीतल आमटे या बाबा आमटे यांच्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करीत होत्या. मागील काही महिन्यांपासून आमटे परिवारात अंतर्गत संघर्ष पेटला होता. हा वाद अनेकदा चव्हाट्यावर आला होता. शीतल आमटे या सर्व वादाच्या केंद्रस्थानी होत्या, हा अंतर्गत गृहकलह सुरू असतानाच आज त्यांच्या आत्महत्येचे वृत्त आले आहे. त्या मानसिक तणावात असल्याचे काही दिवसांपूर्वीच त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले होते.




डॉ. शीतल आमटे यांनी विषाचे इंजेक्शन घेतल्याची माहिती समोर येत असून, हे विष घेतल्यावर त्यांना तातडीने वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले होते, मात्र तिथे उपस्थित वैद्यकिय अधिकार्‍यांनी डॉ. शितल यांचा मृत्यु झाल्याचे घोषित केले.


डॉ. शीतल आमटे यांनी काही दिवसांपूर्वी फेसबुक लाइव्हच्या माध्यमांतून आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या कामाबद्दल, विश्वस्तांबद्दल आणि कार्यकर्त्यांबद्दल गंभीर आरोप केले होते. त्यानंतर दोन तासातच हे फेसबुक लाइव्ह डिलीट केल्या गेले. डॉ. शीतल आमटे यांच्या या फेसबुक लाइव्हनंतर अनेक चर्चांना उत आला होता. त्यानंतर आमटे कुटुंबांकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात शीतल आमटेंनी केलेले आरोप फेटाळून लावले होते.




डॉ. शीतल आमटे या विकास व भारती आमटे यांच्या कन्या होत्या. आमटे कुटुंबीयांचा समाजसेवेचा वारसा त्यांनी देखील जोपासला होता. २००३ मध्ये नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आनंदवनातच काम करण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता. शीतल आमटे या अपंगत्व विशेषज्ज्ञ होत्या.



टिप्पण्या