unemployment: या पुढे आम्ही बांगलादेशात कामांच्या शोधात जावे का? भारतीय तरुणांनो विचार करा...

                   युवाराष्ट्र


येत्या काळात पाश्चात्य राष्ट्रे, दुबई, सिंगापूरसह बांगलादेशात ही भारतीय तरुणांना कामासाठी जावे लागल्यास आश्चर्य वाटू नये. याचे पातक झाडून साऱ्या भारतीय राजकारण्यांवर असेल.

                                     file image



✍ डॉ निलेश पाटील

साठ टक्के पेक्षा अधिक जनसंख्या शेतीवर अवलंबून असणाऱ्या व मोठ्या संख्येने युवा जनसंख्येचा देश असलेल्या भारतासमोर आज प्रचलीत धोरणांमुळे हातांना काम व कामाला उचीत दाम मिळण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. याच आव्हानांमुळे देशात देशांतर्गत व देशाबाहेरही मोठे स्थलांतर घडल्याचे आपण पाहिले आहे. कोरोना मुळे स्थलांतरीत लोकांच्या प्रचंड रांगांच्या रांगा मिळेल त्या वाटेने गावाकडे व विमानेच्या विमाने विविध देशांतून माणसे परतल्याचे आपण पाहिलंय.


                                       file photo

कोरोनापश्चातच्या  जगात भारतासाठी उत्पादन आणि सेवा क्षेत्रात तसे पहायला गेलो तर प्रचंड संधी होत्या. मरगळलेल्या आणि हताश जगात आपले आर्थिक नेतृत्व सक्षमतेने पुढे आणण्याच्या संधी भारता समोर होत्या. तशा त्या आजही आहेत. जगभरात उत्पादन आणि पुरवठ्याच्या काही बाजू याच काळात सांभाळण्याची व जागतीक बाजारपेठेत आघाडी घेण्याची एक संधी भारताकडे चालून आली होती. कोरोनोत्तर जगात या आघाडीचा फायदा तर मिळेलच पण जागतिक गुंतवणुकदार चीनऐवजी भारत हेच आपले उत्पादन केंद्र असावे, यासाठी पुढे येतील. 



पण त्यासाठी काही तातडीचे प्रलंबित धोरणात्मक बदलही करावे लागतील. अजुनही भारत गुंतवणूक सुलभता असलेला देश नाही. कालबाह्य समाजवादी कायदे, बाबुशाही आणि लालफीत, विविध परवाने देतांना होणारे भ्रष्टाचार यामुळे गुंतवणुकदार भारत हे लक्ष्य ठेवण्यात काचकुच करत होते. हे चित्र बदलायचे असेल, देशांतर्गत उद्योगांनाही मोठ्या प्रमाणावर उभारी द्यायची असेल तर उदारीकरणाच्या कक्षा वाढवाव्या लागतील. यामुळे अर्थव्यवस्था लवकरच उभारी घेऊन झपाट्याने वाटचाल तर करेलच पण बेरोजगारीच्या गेली सहा वर्ष भेडसावणा-या समस्येलाही दूर करता येईल.


शेती, पशुपालन या उद्योगांना उदारीकरनापासून वंचित ठेवण्यात आले आहे ते आता थांबवावे लागेल. शेतमालाच्या बाजारपेठा खुल्या कराव्या लागतील. या क्षेत्रातील कालबाह्य कायदेही रद्दबातल करावे लागतील. शेती आणि पशुपालन उद्योगात मोठी झेप घेण्याची क्षमता आहे. ती एक्स्प्लोइट करावी लागेल. त्यासाठी सर्वस्वी नवे धोरण याच काळात आखावे लागेल.



करोना हे संकट आहे हे खरे आहे पण उद्यमी, साहसी, कल्पक लोकांसाठी आणि देशांसाठी करोना ही एक प्रचंड मोठी संधीसुद्धा आहे. आपण भारतीय या संधीचा लाभ घेतो की तिची माती करतो हे या नेतूत्वाने तर ठरवायचे आहेच सोबतच सामान्य नागरिकांनीही ठरवायचे आहे. चिंता करत बसल्याने संकट हटत नाही. पुरेपुर काळजी घेऊन आमच्या उत्पादन क्षमता आम्ही कशा पणाला लावतो यावर आमचे राष्ट्रीय चारित्र्य ठरणार आहे.


जगभरात व्यवसाय सुलभता व मानवांच्या प्रतिभांना उच्च स्थान असलेल्या देशांमध्ये भारतीय बुद्धिमत्ता संधीच्या शोधात 6 दशके जात आहे.आज अगदी आपला शेजारी असलेला बांगलादेश गेल्या दहा, बारा वर्षांपासून शेती व औद्योगीक क्षेत्रांत सुलभतेची धोरणे आणण्याची फळे चाखायला लागला आहे. तंत्रज्ञान,उत्पादन व बाजारपेठा या बाबतीत उदार होत चाललेला बांगलादेश दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत भारताच्या पुढे निघत असल्याचे दिसत आहे.



अशा काळात युवा जनसंख्या चांगली शेती व पोषक हवामान असलेला भारत मात्र आपल्या नागरिकांच्या श्रम,बुद्धी,गुंतवणूक व प्रतिभांना मोकळीक व संधी देण्याऐवजी त्यांना सरकारी लालफितशाहित अडकवून ठेवण्यात धन्यता मानत असल्याचे दिसत आहेत.चीन सारखा शेजारी या पूर्वीच बंधनाची धोरणे सोडून मुक्त व्यवस्थेने फार पुढे निघून गेला असतांनाच आज बांगलादेश च्या रूपाने दुसरा शेजारीही पुढे जात आहे. 


आपल्याकडे मात्र राजकारणच जोरात आहे. परिस्थितीच्या रेट्यामुळे का होईना थोड्याफार मोकळीकतेकडे केंद्र सरकार वाटचाल करीत असतांना रशिया,चीन सह जगातून उच्चाटीत झालेला कम्युनिस्ट आर्थिक विचार,आर.एस.एस.चा प्रतिगामी विचार व त्यावर कडी म्हणून काय काँग्रेस चे पोरकट नेतृत्वही सर्जकशक्तीला लालफितशाहीच्या बाहेर निघू देण्यास तयार नाही.



अशा परिस्थितीत येत्या काळात पाश्चात्य राष्ट्रे, दुबई,सिंगापूरसह बांगलादेशात ही भारतीय तरुणांना कामासाठी जावे लागल्यास आश्चर्य वाटू नये.याचे पातक झाडून साऱ्या भारतीय राजकारण्यांवर असेल. तरुणांनी राजकीय पक्षांच्या हातचे बाहुले न बनता डोळसपणे जागतिक संधीचा,जागतीक आर्थीक परिवेशाचा अभ्यास करून धोरणकर्त्यांवर दबाव वाढवावा तरच उद्या काही असेल. कर्जबाजारी सरकारांच्या भरवश्यावर सर्जकशक्ती व युवाशक्तीला  भविष्य नाही,एवढे मात्र निश्चित.



(लेखक शेतकरी संघटना युवा आघाडीचे विदर्भ प्रमुख व युवाराष्ट्र संघटनेचे अध्यक्ष  आहेत.)

टिप्पण्या