Navratri2020:आगामी काळातील सण उत्सव घरीच साजरे करा - जिल्हाधिकारी पापळकर

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमिवर आगामी काळात येणारे सण उत्सव त्या त्या लोकांनी साजरे करतांना कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता लक्षात घेता शासनाने घालून दिलेले नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

Celebrate upcoming festivals at home - Collector Papalkar



अकोला,दि.९: आगामी काळात येऊ घातलेले दुर्गोत्सव, ईद ए मिलाद व धम्मचक्रप्रवर्तन दिन हे सर्व सण कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमिवर अत्यंत साधेपणाने, कमीत कमी उपस्थितीत; शक्यतो घरातल्या घरात आणि शासनाच्या नियमांचे पालन करुन साजरे करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज येथे केले.




आगामी काळात येऊ घातलेले दुर्गोत्सव, ईद ए मिलाद व धम्मचक्रप्रवर्तन दिन या सणांच्या पार्श्वभुमिवर आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात विविध सामाजिक कार्यकर्ते व दुर्गोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.


यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष प्रतिभा भोजने,जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरव कटीयार, पोलीस अधिक्षक जी. श्रीधर,  मनपा आयुक्त संजय कापडणीस,  अपर पोलीस अधिक्षक मोनिका राऊत, निवासी उप जिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार आदी उपस्थित होते.


यावेळी जिल्हाधिकारी पापळकर म्हणाले की,  कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमिवर आगामी काळात येणारे सण उत्सव त्या त्या लोकांनी साजरे करतांना कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता लक्षात घेता शासनाने घालून दिलेले नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. नुकताच आपल्या जिल्ह्यात बाधीत रुग्ण संख़्येचा आकडा वाढला होता. हा धोका पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी आपण साऱ्यांनीच खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यातही उत्सवाच्या काळात ही काळजी अधिक घ्यावी, कारण पुढे लगेचच दिवाळी सारखा मोठा सण ही येऊ घातला आहे. त्यामुळे आपण सर्वांनी काळजी घ्यावी. शासनाच्या नियमावलीचे पालन करावे, मास्कचा वापर करावा. परस्परांमध्ये अंतर राखावे व सॅनिटायझरचा वापर करा, साबणाने हात वारंवार धुवा, असे आवाहन त्यांनी केले.

व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा:आगामी काळातील सण उत्सव घरीच साजरे करा - जिल्हाधिकारी पापळकर


बैठकीच्या प्रारंभी निवासी उप जिल्हाधिकारी संजय खडसे यांनी  प्रास्ताविकात शासनाकडून दुर्गोत्सव साजरा करण्याबाबत प्राप्त नियमावलीचे वाचन करुन दाखवले. तसेच पोलीस अधिक्षक जी श्रीधर व मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनीही यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच मंडळाचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांनीही आपली मते व्यक्त केली.

टिप्पण्या