Kojagiri2020:कोजागिरी पौर्णिमा;आज साजरी करायची की उद्या असा प्रश्न पडला असेल ना; तर पूजा मुहूर्त,आध्यत्मिक, आयुर्वेदिक, सामाजिक महत्व काय जाणून घ्या…

                  दिन विशेष

✍️अधिवक्ता नीलिमा शिंगणे-जगड



कोजागरी पौर्णिमा हा उत्सव संपूर्ण भारतात साजरा केला जातो. प्रत्येकाच्या जीवनात या उत्सवाचे एक वेगळे स्थान आहे. अध्यात्मिक,आयुर्वेदीकच नव्हेतर  सामाजिक महत्व देखील या सणाला प्राप्त झालेले आहे. आश्‍विन पौर्णिमेला ‘कोजागरी पौर्णिमा’, ‘नवान्न पौर्णिमा’, ‘शरद पौर्णिमा’ असे विविध नावाने हा सण साजरा केला जातो. 


आश्‍विन पौर्णिमेला उत्तररात्री लक्ष्मीदेवी ‘को जागर्ति’ म्हणजे ‘कोण जागत आहे ?’, असे विचारते; म्हणून या पौर्णिमेला ‘कोजागरी पौर्णिमा’ असे म्हणतात. यादिवशी रात्री श्रीलक्ष्मीदेवी आणि इंद्र देवाची पूजा केली जाते. मध्यरात्री माँ लक्ष्मीदेवी  चंद्र मंडलातून पृथ्वीतलावर येवून जो जागा आहे, त्याला धनधान्य आणि समृद्धी प्रदान करते, अशी मान्यता आहे. लक्ष्मीदेवी  या रात्री आकाशातुन भ्रमण करते आणि  जागरण करणाऱ्यावर प्रसन्न होते. त्यामुळे त्याच्यावर लक्ष्मीचा वरदहस्त कायम राहातो. म्हणुन देखील या दिवशी जागरण करण्याची प्रथा पडली आहे. आश्‍विन पौर्णिमेला शेतकरी निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नवीन धान्याची पूजा करून त्याचा नैवेद्य दाखवतात. म्हणून या पौर्णिमेला ‘नवान्न पौर्णिमा’ असे काही प्रदेशात म्हणतात. तर आश्‍विन पौर्णिमा शरदऋतूत येते; म्हणून या पौर्णिमेला ‘शरद पौर्णिमा’ असे देखील म्हणतात.



पुर्ण वर्षभरात फक्त याच दिवशी चन्द्र आपल्या सोळा कलांनी परिपुर्ण असल्याने या रात्रीचे हिंदु धर्मात खुप महत्व आहे. या रात्री कोजागरी व्रत आणि कौमुदी व्रत करतात. याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने व्रजमंडळात महा रासोत्सव आयोजित केला होता, असे श्रीमद्भागवतात उल्लेख आहे. अन्य एका कथेनूसार लंकाधीपती रावण या अश्वीन पौर्णिमेच्या रात्री चंद्राची किरणे आरश्याच्या सहाय्याने आपल्या नाभिव्दारे ग्रहण करीत असे. त्यामुळे त्याला पुन्हा पुन्हा तारूण्य प्राप्त होते,असे सांगण्यात येते.





आयुर्वेद व कोजागिरी


कोजागरी पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या अत्यंत जवळ  असतो. चंद्राची प्रकाश किरणे संपूर्ण जीवसृष्टीकरिता  लाभदायक असते. या रात्री औषधींचे सेवन केल्यास त्याचा हमखास गुण येतो. पौर्णिमेच्या रात्री दूध आटवून विशिष्ट भावना दिली जाते. हे  दूध दमा, अस्थमा असलेल्या रोग्यांसाठी फार लाभदायक असते ,असे आयुर्वेदात सांगितले आहे. रात्री दुधात चंद्राचे दर्शन घेतल्याने चंद्राच्या किरणांच्या माध्यमातून अमृतप्राप्ती होते. याचे कारण ‘आश्‍विन पौर्णिमा’ अश्‍विनी नक्षत्रात चंद्र असतांना होते. अश्‍विनी नक्षत्राची देवता ‘अश्‍विनीकुमार’ आहे. अश्‍विनीकुमार सर्व देवतांचे चिकित्सक (वैद्य) आहेत. अश्‍विनीकुमारांच्या आराधनेमुळे असाध्य रोग बरे होतात. यामुळे वर्षातील इतर पौर्णिमांच्या तुलनेत आश्‍विन पौर्णिमेला चंद्रदर्शनाने त्रास होत नाही. अनेक वैद्य यादिवशी मोफत औषधीयुक्त दूध वितरित करतात.



 दमा औषधीचे वितरण


अकोल्यात स्व. रजनीबाई रामगोपाल तोष्णीवाल चॅरिटेबल ट्रस्ट व मृत्यूंजय आयुर्वेद यांच्या सौजन्याने दरवर्षी कोजागिरी पौर्णिमेला दमाचे औषध वितरित करण्यात येते. यावर्षी गुरवार २९, शुक्रवार ३० व  शनिवार ३१ ऑक्टोंबर  असे तीन दिवस कोजागिरी पौर्णिमा निमित्त दमा रुग्णाना आयुर्वेदिक औषधांचे मोफत वितरण करण्यात येत आहे.


कोजागिरी पौर्मिणेला दमा औषध घेण्याला विशेष महत्व असल्याने याचा लाभ दमा आजाराने ग्रस्त असलेल्यांना मिळावा या हेतुने सामाजिक भावनेतून गिरीश तोष्णीवाल दरवर्षी कोजागिरी पौर्णीमेला  दमा आजाराने त्रस्त असलेल्यांना निशुल्क औषधाचे वितरण करतात. शहरातील व बाहेरगावातील दमाग्रस्त आयुर्वैदिक औषध घेतात. या उपक्रमाला मोठा प्रतिसाद लाभतो.   


 

 

पूजेचा मुहूर्त

कोजागरी पौर्णिमा हा उत्सव आश्विन पौर्णिमा या तिथीला साजरा केल्या जाते. यावर्षी कोजागरी पौर्णिमा आज शुक्रवार ३० ऑक्टोबर रोजी आहे. शुक्रवार, ३० रोजी  सायंकाळी ५.४६ नंतर ‘कोजागरी पौर्णिमा’ चालू होते. ‘अधिक आश्‍विन मास’ असल्याने निज आश्‍विन पौर्णिमेला ‘कोजागरी पौर्णिमा’ आहे.



३० ला की ३१ तारखेला कोजागिरी साजरी करावी

ज्योतिष शास्त्रानुसार सूर्योदयाच्या वेळी जी तिथी असते ती ग्राह्य धरली जाते. तसेच हिंदु पंचांगानुसार आश्‍विन मासात येत असलेल्या पौर्णिमेच्या मध्यरात्री कोजागरी पौर्णिमा साजरी करतात. यावर्षी ३०.१०.२०२० या दिवशी सायंकाळी ५.४६ पासून ३१.१०.२०२० या रात्री ८.१९ वाजेपर्यंत पौर्णिमा तिथी आहे. ३०.१०.२०२० या दिवशी मध्यरात्रीला पौर्णिमा असल्याने कोजागरी पौर्णिमा साजरी केली जाणार आहे.


 


उत्सव  कसा साजरा करावा



देशातील विविध भागात कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्याची वेगवेगळ्या प्रथा आणि परंपरा आहे.काही प्रदेशात नवान्न म्हणजे नवीन पिकवलेल्या धान्याने बनविलेले जेवण करतात. श्री लक्ष्मी आणि ऐरावतावर बसलेला इंद्र यांची रात्री पूजा करतात. पूजा झाल्यावर पोहे आणि नारळाचे पाणी देव आणि पितर यांना समर्पून नंतर नैवेद्य म्हणून ग्रहण करतात आणि मग आपल्याकडे आलेल्या सर्वांना देतात. तर बहुतांशी भागात शरद ऋतू मधल्या या पौर्णिमेच्या स्वच्छ चांदण्यात दूध आटवून चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवतात आणि नंतर नैवेद्य म्हणून ते दूध ग्रहण करतात. चंद्राच्या प्रकाशात एक प्रकारची आयुर्वेदिक शक्ती आहे. त्यामुळे हे दूध आरोग्यदायी आहे. लक्ष्मी आणि इंद्र यांच्या पूजेत पोहे आणि नारळाचे पाणी वापरतात. पोहे हे आनंद देणारे, तर नारळाचे पाणी हे शितलता प्रदान करणारे आहे. त्यामुळे हे दोन घटक वापरून जीव स्वतःकडे आनंद आणि शितलता यांच्या लहरी आकर्षित करत असतो. चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवतात; कारण या दिवशी दुधात चंद्राचे प्रतिबिंब पाहिल्याने त्यातून प्रक्षेपित होणारे चंद्रतत्त्व आपल्याला मिळते. या दुधात स्थूल आणि सूक्ष्म रूपांतून चंद्राचे रूप अन् तत्त्व आकर्षित झालेले असते. या रात्री जागरण करतात. करमणुकीसाठी निरनिराळे बैठे खेळ खेळतात. हातगा, भोंडला, भुलाबाई-भूलोजी उत्सव साजरा करण्याची प्रथा यामुळेच पूर्वापार पडली आहे. दुसर्‍या दिवशी सकाळी पूजेचे पारणे करतात.




महाराष्ट्रासह इतर प्रांतात कोजागिरी उत्सव



महाराष्ट्रात जसा हा उत्सव साजरा केला जातो तसा पश्चिम बंगाल आणि ओडिशा राज्यात अत्यधिक खुशी आणि उत्साहात कोजागिरी पौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येतो. हा उत्सव ‘बंगाल लक्ष्मी पूजा’ किंवा ‘कोजागरी पूर्णिमा’ या नावाने लोकप्रिय आहे. बंगाल मध्ये कोजागरा पूजा म्हणतात. बिहार आणि बुंदेलखंड मधील काही भागात हा सण  उत्साहात साजरा करण्यात येतो. पूजा करण्याची पद्धत आपापल्या प्रथा परंपरेनुसार करण्यात असते. नर्केल भाजा, तालर फोल, नारू, खिचड़ी और मिठाई देवी लक्ष्मीला अर्पण करण्यात येते. रात्री  मंत्र, कीर्तन, भजन, जप करून जागरण केल्या जाते. देवीच्या स्वागता साठी घराघरात को मातीचे दीपक लावून परिसर झगमग केल्या जाते. या दिवशी उपवास पण करतात. पूर्ण दिवस भोजन आणि पेयजलचा उपयोग करीत नाहीत.  अनुष्ठानला पूर्ण करण्यासाठी ,नारळ पाणी आणि पूर्ण साबूत तांदूळ श्री लक्ष्मीदेवीला  अर्पण केल्यानंतर उपवास सोडतात. असा हा कोजागिरी उत्सव संपूर्ण भारतात विविध पद्धतीने साजरा केला जातो.पण उत्साह मात्र सर्वत्र सारखाच असतो. या उत्सवामुळे विविध जाती धर्माचे लोक जागरण निम्मित आयोजित विविध कार्यक्रमात एकत्रित येत असल्याने भारताची राष्ट्रीय एकात्मतेची भावना खऱ्या अर्थाने जपल्या जाते,एवढे मात्र निश्चित. म्हणून या उत्सवाला सामाजिक महत्त्व प्राप्त झालेले आहे.



(संदर्भ:धार्मिक ग्रंथ व पुस्तके, छायाचित्रे: सर्व संग्रहित)

टिप्पण्या