विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजास ‘वंदे मातरम्’ने सुरुवात
मुंबई, दि. 7 : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास आज सोमवारी सुरुवात झाली. विधानसभेच्या कामकाजाची सुरुवात सकाळी 11 वाजता तर विधानपरिषदेच्या कामकाजाची सुरुवात दुपारी 12 वाजता 'वंदे मातरम्' ने करण्यात आली.
विधानसभेत तालिका अध्यक्षांची नियुक्ती
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी विधानसभेत तालिका अध्यक्षांची नियुक्ती विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी आज केली. आमदार सर्वश्री बालाजी किणीकर, दौलत दरोडा, संग्राम थोपटे, कालिदास कोळंबकर यांची तालिका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
विधानपरिषदेत नवनिर्वाचित सदस्यांचा सभागृहाला परिचय
विधानपरिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवनिर्वाचित सदस्यांचा सभागृहाला परिचय करून दिला. सदस्य डॉ. नीलम दिवाकर गोऱ्हे, शशिकांत जयवंतराव शिंदे, रणजितसिंह विजयसिंह मोहिते-पाटील, रमेश काशिराम कराड, प्रवीण प्रभाकरराव दटके, अमोल रामकृष्ण मिटकरी, राजेश धोंडिराम राठोड या नवनिर्वाचित सदस्यांचा यात समावेश आहे.
विधानपरिषद तालिका सभापती जाहीर
विधानपरिषदेत डॉ. मनिषा कायंदे, सर्वश्री प्रसाद लाड, संजय दौंड, अमरनाथ राजूरकर यांची तालिका सभापती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी विधान परिषदेत यासंदर्भातील घोषणा केली.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांनी महाराष्ट्रासाठी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण आहे. संयमी अभ्यासक, जनसामान्यांतील लोकप्रिय नेता ही त्यांची ओळख होती, अशा शब्दात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांना आदरांजली वाहिली.
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेत शोकप्रस्ताव मांडण्याची मंजुरी दिल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांच्या निधनाबाबतचा शोकप्रस्ताव मांडला.
दोन पिढ्यांना जोडणारे, मार्गदर्शक नेतृत्व - उद्धव ठाकरे
माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर हे महाराष्ट्राच्या विकासात येागदान देणारे, दोन पिढ्यांना जोडणारे मार्गदर्शक नेतृत्व होते. त्यांच्या निधनाने हे नेतृत्व आपण कायमचे गमावले अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांना आदरांजली वाहिली. स्वातंत्र्यलढ्यात आणि महाराष्ट्राच्या उभारणीत माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांनी योगदान दिले. बाणेदार आणि ठाम विचारसरणीचे नेते अशी त्यांची ओळख होती. मराठवाड्याच्या विकासाला गती देण्यासाठी आग्रही असणाऱ्या पाटील-निलंगेकर यांनी मुख्यमंत्री म्हणून तडफेने काम केले.
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले, ते जुन्या काळातील उच्च विद्याविभूषित होते. हैद्राबाद मुक्ति संग्रामात योगदान दिलेल्या पाटील-निलंगेकर यांनी आपले जीवन जनसामान्यांसाठी वाहिले. लातूरमध्ये शिक्षणसंस्थेची स्थापना करुन शिक्षणगंगा या भागात आणली.
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांचे जीवन संघर्षमय होते. शेतीपासून आरोग्य क्रांती असा प्रवास करताना त्यांनी लोकन्यायालयाची सुरुवात केली. विद्यार्थीदशेत स्वातंत्र्यलढ्यात भाग घेऊन मराठवाडा मुक्ती संग्रामतही आपले योगदान दिले.
जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले, अनेक प्रश्नांविषयी आग्रहाने आपली भूमिका मांडणारे शिवाजीराव हे जनसामान्यांत वावरणारे नेते होते. प्रत्येक प्रश्नाचे ठोस उत्तर देणे, निर्णय घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्याची त्यांची पध्दत वाखाणण्यासारखी होती.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, शिवाजीराव पाटील-निलंगेकर हे एक उत्तम अभ्यासू, कुशल संघटक आणि लोकप्रिय नेते होते. महाराट्राच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान महत्वपूर्ण आहे.
विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, मराठवाड्याच्या विकासासाठी निलंगेकर यांनी मोठे योगदान दिले. मितभाषी, शांत, सुस्वभावी आणि संयमी असा त्यांचा स्वभाव होता.मराठवाडा विकासासाठी 42 कलमी, विदर्भ विकासासाठी 33 कलमी तर कोकण विकासासाठी 40 कलमी कार्यक्रम त्यांनी सर्वप्रथम राबविला. महसूल, जलसंपदा, आरोग्य, पशुसंवर्धन मंत्री म्हणून त्यांनी केलेले काम महत्वपूर्ण आहे.
शैक्षणिक, सामाजिक संस्थांशी निकटचा संबंध असणारे अनिल भैय्या राठोड यांची खरी ओळख सर्वसामान्यांसाठी काम करणारा नेता अशीच होती. अहमदनगरच्या विकासात योगदान दिलेल्या अनिल भैय्यांची खरी ओळख सामान्य कार्यकर्ता अशीच असल्याचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी सांगितले.
विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळ यांनी विधानसभेत शोकप्रस्ताव मांडण्याची मंजुरी दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री अनिल राठोड यांच्या निधनाबाबतचा शोकप्रस्ताव मांडला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, अनिल भैय्या यांनी लोकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी रस्त्यावर उतरुन काम केले. लोकांचे प्रश्न तडीस लावण्यासाठी वेळोवेळी आंदोलने केली. नगर जिल्ह्यातून 25 वर्षे आमदार म्हणून निवडून येत असले तरी सामान्य कार्यकर्ता अशी त्यांची ओळख होती. अनिल भैय्या यांच्या जाण्याने त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेचे मोठे नुकसान झाले आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी मंत्री अनिल भैय्या राठोड यांना आदरांजली वाहिली.
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, गरीब कुटुंबातून आलेले आणि राजकारणाचा कोणताही वारसा नसतानाही लोकप्रिय नेते म्हणून अनिल राठोड यांचे नाव घ्यावे लागेल. पाच वेळा विधानसभेचे प्रतिनिधीत्व करताना सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यावर त्यांनी कायम भर दिला.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले, सर्वसामान्यांना न्याय मिळावा यासाठी रस्त्यावर उतरुन काम करणारे नेते अशी अनिल राठोड यांची ओळख होती.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, अनिल राठोड यांचे वेगवेगळ्या सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेशी संबंध होते. सर्वसामान्यांना न्याय मिळावा हा त्यांचा प्रयत्न असायचा. आताच्या लॉकडाऊन काळात त्यांनी सर्वसामान्यांसाठी अन्नछत्र सुरु केले होते.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी सुधाकर परिचारक, हरिभाऊ जावळे, सदाशिवराव ठाकरे, रामकृष्ण पाटील, सितलदास हरचंदानी, सुनिल शिंदे, श्यामराव पाटील, अण्णासाहेब उढाण, सुरेश पाटील, रामरतन बापू राऊत, मधुकर कांबळे, श्रीमती चंद्रकांता गोयल यांच्या निधनाबाबतचा शोकप्रस्तावही मांडला.
प्रणबदांचे बहुआयामी व्यक्तीमत्व सर्वांसाठी मार्गदर्शक – अजित पवार
प्रणबदांनी राष्ट्रपतीपदाला न्याय दिलाच परंतु त्यांच्यावर सोपविलेली प्रत्येक जबाबदारी निष्ठेने पार पाडली. अर्थ, संरक्षण, परराष्ट्र अशी महत्वाची खाती सांभाळली. यातूनच त्यांची क्षमता सिद्ध होते. प्रणबदांचे व्यक्तीमत्व बहुआयामी आणि सर्वांसाठी मार्गदर्शक होते. अशा भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केल्या.
विधानपरिषदेत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील-निलंगेकर, माजी विधानपरिषद सदस्य सर्वश्री विजय मुडे, रामनाथ मोते, बलभीमराव देशमुख, युनुस हाजी जैनोद्दिन शेख, जयवंतराव ठाकरे तसेच कोरोना योद्ध्यांना व कोरोना काळात मृत्यु पावलेले नागरिक यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव मांडला. तो विधानपरिषदेत सहमत करण्यात आला.
माजी मुख्यमंत्री दिवंगत डॉ.शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांना श्रद्धांजली अर्पण करताना श्री.पवार म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री पद सांभाळलेल्या निलंगेकर साहेबांचे निधन आपल्या सर्वांसाठी मोठा धक्का आहे. विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे सदस्य, मंत्री, मुख्यमंत्री म्हणून त्यांनी राज्याच्या विकासासाठी दिलेले योगदान कायम लक्षात राहणारे आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात, मराठवाड्याच्या मुक्तीसंग्रामात त्यांनी योगदान दिले. त्यांचा स्वभाव संघर्षाचा होता. समाजासाठी लढणारे, संघर्ष करणारे नेतृत्व होते. राज्यातील सर्वसामान्य माणसाच्या जीवनात सुधारणा घडवून आणण्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष, त्यांनी केलेले काम नेहमीच स्मरणात राहील.
सभागृहाचे माजी सदस्य विजय मुडे यांचेही नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाने शिक्षण चळवळीत व सर्वसामान्यांसाठी कार्य करणारे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले, असे पवार म्हणाले. शैक्षणिक विकास, विद्यार्थी व शिक्षकांच्या प्रश्नावर ते लढत राहीले. समाजातील वंचित, उपेक्षित घटकांसाठी त्यांनी संघर्ष केला.
पवार म्हणाले, सभागृहाचे माजी सदस्य रामनाथ मोते यांच्या निधनाने साधी राहणी, उच्च विचारसरणी असलेले, शिक्षण आणि शिक्षक चळवळीतील एक लढाऊ नेतृत्व आपण गमावले आहे. सर्वसामान्यांपैकी व सामान्यांमध्ये रमणारे ते नेतृत्व होतं. मुंबईत लोकलने प्रवास करणाऱ्या आमदारांपैकी ते होते. ते शिक्षक नेते असल्याने अनेक विषयांचा त्यांचा अभ्यास होता. विधानपरिषदेतील त्यांची भाषणे अभ्यासपूर्ण असायची. त्यांच्या निधनाने राज्यातील शिक्षण व शिक्षक चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे.
सभागृहाचे माजी सदस्य बलभीमराव देशमुख यांच्याबद्दलही शोकभावना व्यक्त करताना श्री. पवार म्हणाले, उस्मानाबाद जिल्ह्यातल्या काटीसारख्या छोट्याशा गावात जन्म झालेल्या बी.एन. देशमुख साहेबांनी उच्च आणि सर्वोच्च अशा दोन्ही न्यायालयात वकीली केली. मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणूनही काम केले. ते विद्वान होते. व्यासंगी होते. कायद्याचे ज्ञान व सामाजिक प्रश्नांची जाण असलेले त्यांचे नेतृत्व होते. शेतकरी, कष्टकरी आणि कामगारांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ते सभागृहात आणि न्यायालयाच्या माध्यमातून ते लढत राहिले.
श्री.पवार म्हणाले, सभागृहाचे माजी सदस्य युनुस हाजी जैनोद्दिन शेख यांचे तीन महिन्यापूर्वी निधन झाले. त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात स्थानिक स्वराज्य संस्थेतून झाली. शेख यांच्या निधनाने सामान्य जनतेचे प्रश्न तळमळीने सोडविणारा नेता हरपला आहे.
सभागृहाचे माजी सदस्य जयवंतराव ठाकरे यांना भावपूर्ण श्रद्धाजंली अर्पण करताना श्री.पवार म्हणाले, त्यांच्या निधनाने अभ्यासू व्यक्तीमत्व हरवले. नाशिकमधील साहित्य चळवळीशी ते जोडले गेले होते. त्यांचे सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रात केलेले काम कायम स्मरणात राहील.
कोरोना योद्ध्यांना व नागरिकांना श्रद्धांजली
उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, सध्या राज्यात आणि देशात आपण सर्वजण कोरोनाच्या संकटाशी लढत आहोत. या लढाईत आपले, डॉक्टर्स, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, सफाई कर्मचारी, अंगणवाडी ताई, आशा ताई, पोलीस बांधव, शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांचे सर्व अधिकारी-कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते आणि राज्यातील जनता कोरोना विरुद्धच्या लढाईत आपले योगदान देत आहे. विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहातील सदस्य, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांतील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, लोकांचा जीव वाचविण्यासाठी मागील सहा-सात महिने कोरोना विरुद्ध लढा देत आहे.
कोरोना विरुद्धच्या या लढाईत अनेक कोरोना योद्ध्यांचा मृत्यु झाला आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईत मृत्युमुखी पडलेल्या योद्ध्यांना तसेच नागरिकांना श्रद्धाजंली अर्पण करतो. या सर्वांच्या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. आपल्या सर्वांच्या एकजुटीतून, सहकार्यातून कोरोनाविरुद्धची लढाई लवकरच जिंकू, असा विश्वासही उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी व्यक्त केला.
उपसभापती पदाच्या निवडणुकीची घोषणा
विधानपरिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक उद्या मंगळवार, 8 सप्टेंबर, रोजी होईल, अशी घोषणा सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी आज विधानपरिषदेत केली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा