Hingoli congress:हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटी द्वारा आयोजित राज्यस्तरीय मुक्त काव्य स्पर्धेमध्ये गोपालखेडच्या अनिकेत यांना पारितोषिक

हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटी द्वारा आयोजित राज्यस्तरीय मुक्त काव्य स्पर्धेमध्ये गोपालखेडच्या अनिकेत  यांना पारितोषिक

अकोला: भारताचे माजी प्रधानमंत्री, भारतरत्न स्व.राजीव गांधी यांच्या 76 व्या जयंती निमित्त हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय मुक्त काव्य स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ कार्यक्रम 4 सप्टेंबर रोजी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितित ऑनलाईन पार पडला. स्पर्धेमध्ये गोपालखेडच्या अनिकेत  यांना पारितोषिक प्राप्त झाले.


राज्यभरातून मराठी व हिंदी भाषेतून या स्पर्धेसाठी दाखल झालेल्या शेकडो कवितांमधून अंतिम दहा कवितांमध्ये गोपालखेड तालुका जिल्हा अकोला येथील  युवाकवी निवेदक अनिकेत जयंतराव देशमुख यांच्या 'राजीव' या कवितेची निवड झाली होती. 



या ऑनलाईन पार पडलेल्या कार्यक्रमामध्ये सर्व प्रमुख मान्यवरांच्या समोर राजीव गांधी यांच्या जीवन चरित्रावर आधारित 'राजीव' ही कविता त्यांनी सादर केली. 



या स्पर्धेमधील एकूण चार पारितोषिकांपैकी त्यांच्या 'राजीव' या कवितेला 'भारतातील प्रसिद्ध शायर दिवंगत राहत इंदोरी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिले जाणारे विशेष पारितोषिक रोख रक्कम १००००/ रुपये स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र हे पारितोषिक मिळाले. 



शिक्षक दिनाच्या निमित्ताने मिळालेली ही खूप अनमोल भेट आणि खूप आनंददायी गोष्ट असल्याचे आणि त्याचबरोबर सर्वात मोठा आनंद म्हणजे ज्या प्रमुख आदरणीय सन्माननीय मान्यवरांच्या उपस्थितीत हा ऑनलाईन पारितोषिक वितरण सोहळा पार पडला त्या सर्वांसमोर मला काव्यसादरीकरणाची संधी मिळाली हे माझ्यासाठी अविस्मरणीय असल्याचे त्यांनी  सांगितले.




या ऑनलाईन कार्यक्रमाचे उद्घाटन बाळासाहेब थोरात(प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री महाराष्ट्र राज्य) यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड (शालेय शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री हिंगोली जिल्हा) होत्या.  खा.राजीव सातव (खासदार राज्यसभा तथा प्रभारी गुजरात राज्य काँग्रेस) माजी खासदार हुसेन दलवाई, समन्वयक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव अमर खानापुरे, माजी आमदार डॉ.संतोष टारफे, संजय बोंढारे जिल्हाध्यक्ष काँग्रेस, ऍड. दीपक राठोड युवक काँग्रेस प्रदेश सचिव व स्पर्धेचे चारही निरीक्षक व परीक्षक कवी अरूण म्हात्रे मुंबई,  कवयित्री अंजली कुलकर्णी, सुप्रसिद्ध कवयित्री प्रिया धारुरकर औरंगाबाद, व काँग्रेसचे नेते सचिन सावंत कार्यक्रमाला उपस्थित होते.




अनिकेत देशमुख यांना याआधीही अनेक राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले आहे. कमी वयामधेच त्यांनी आपल्या लेखणीचा ठसा उमटविला आहे. या गौरवास्पद कामगिरी बद्दल सर्व मित्र परिवाराकडून गावकऱ्यांकडून व पंचक्रोशी मधून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.


टिप्पण्या