Asha Swayamsevak: आशा स्वयंसेविकेस दरमहा २ हजार आणि गट प्रवर्तकांना ३ हजार लवकरच मिळणार मोबदला; २८ सप्टेंबरचे आंदोलन स्थगित होणार! will get Rs 2,000 per month and group promoters will get Rs 3,000 soon; September 28 agitation to be postponed!

आशा स्वयंसेविकेस दरमहा २ हजार आणि गट प्रवर्तकांना ३ हजार लवकरच मिळणार मोबदला; २८ सप्टेंबरचे आंदोलन स्थगित होणार!


                                     filephoto

Asha Swayamsevak will get Rs 2,000 per month and group promoters will get Rs 3,000 soon;  September 28 agitation to be postponed!




मुंबई दि. २५: राज्यात सध्या कोरानाचे संकट असून, अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून या लढाईत आशा सेविका  व गट प्रवर्तक देखील  काम करत आहेत. त्याचमुळे या आशा सेविकांना व गट प्रवर्तक यांना आता ठाकरे सरकारने  दिलासा दिला. राज्यातील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक हे आरोग्य विभागाचा कणा असून कोरोना विरोधातील लढ्यात त्यांची भूमिका मोलाची असल्याने २८ सप्टेंबर पासून प्रस्तावित असलेले कामबंद आंदोलन त्यांनी स्थगित करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना पाठवलेल्या पत्राद्वारे केले आहे.


 लवकरच मोबदला मिळणार 


मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्रात पुढे म्हटले आहे की, आशा स्वयंसेविकांना आणि गट प्रवर्तकांना प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यातील मंजुरीनुसार सेवांवर आधारित मोबदला मिळतो. त्यासोबत आशा स्वयंसेविकांच्या कामाची दखल घेऊन राज्य शासनाने आशा स्वयंसेविकेस दरमहा २ हजार आणि गट प्रवर्तकांना दरमहा ३ हजार  राज्य शासनाच्या निधीतून मोबदला देण्याचा निर्णय घेतला आहे. तसा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.  या निधीची तरतूद पुरवणी मागण्यांमध्ये करण्यात आली आहे. या शासन निर्णयानुसार लवकरच त्यांना सर्व  मोबदला मिळणार आहे.


केंद्र शासनाकडे मागणी


याबरोबरच प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यात गटप्रवर्तकांचा जो मोबदला कमी करण्यात आला आहे त्या मोबदल्याची मागणी  नव्याने केंद्र शासनाकडे करण्यात येत आहे.


माझे कुटुंब- माझी जबाबदारी अभियानात काम करताना जोपर्यंत कोविड झालेल्या रुग्णांचे लवकर निदान होत नाही तोपर्यंत कोविड विरोधातील लढाई आपण पूर्णपणे जिंकणार नाही. आपल्या मदतीनेच राज्यात “माझे कुटुंब- माझी जबाबदारी” हे अभियान  राबविण्यास सुरुवात झाली आहे.  याकरिता आपणास केंद्र शासनाने दरमहा मंजूर केलेल्या  १ हजार रुपयांव्यतिरिक्त दररोज १५० रुपये इतका मोबदला अदा करण्यात येणार आहे.  तसेच याकामी सोबतीला मदतीसाठी एक स्वयंसेवकदेखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. आपल्या आरोग्याची काळजी घेताना आपणास सॅनिटायझर, मास्क, हॅन्डग्लोज, सारखे संरक्षण साहित्य उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी पत्रात नमूद केले आहे.


मोहिमेतील माहिती संकलित करण्यासाठी व ती भरणे सोयीचे व्हावे यासाठी ॲप तयार करण्यात आले आहे. ॲपमध्ये माहिती भरताना काही अडचणी आल्यास उपलब्ध करून देण्यात आलेल्या प्रपत्रात लेखी स्वरूपात माहिती भरण्याची मुभा देखील आपणास दिली आहे असे ही मुख्यमंत्र्यांनी आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तकांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.


कोरोना नियंत्रणात आशा स्वयंसेविकांचा अमूल्य वाटा


राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यात आशा स्वयंसेविका योजनेची अंमलबजावणी सुरु असून राज्यात ग्रामीण आणि शहरी भागात मिळून ६६ हजारांहून अधिक आशा स्वयंसेविका तर ४ हजार गटप्रवर्तक काम करत आहेत. आशा स्वयंसेविका योजनेमुळे राज्यातील नवजात बालकांचे मृत्यू, बालमृत्यू व माता मृत्यू कमी करण्यात मोलाची मदत मिळाली आहे. कोविड १९ या साथीच्या आजारावर नियंत्रण मिळवतांना देखील त्यांची खुप मदत होत आहे. आशा स्वयंसेविकांनी कोविड प्रादुर्भावाच्या काळात प्रत्येक घराला भेट देऊन,कुटुंबातील सदस्यांची आरोग्य तपासणी करून नियंत्रण मिळवण्यात अमूल्य वाटा उचलला आहे असेही मुख्यमंत्री या पत्रात आवर्जून म्हणतात.


राज्यात सध्या कोरानाचे संकट असून, अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून या लढाईत आशा सेविका देखील  काम करत आहेत. त्याचमुळे या आशा सेविकांना ठाकरे सरकारने त्यांना दिलासा दिला होता. राज्य मंत्रिमंडळाच्या  झालेल्या बैठकीत त्यांच्या  मानधनात वाढ करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेण्यात आला होता . आशा स्वयंसेविकांना दरमहा कमाल रुपये २ हजार पर्यंत तर गट प्रवर्तकांना ३ हजार रुपये राज्य शासनाच्या निधीतून देण्यात येणार असल्याचा निर्णय घेतला होता. यासाठी १७० कोटी रुपये खर्चास मान्यता देण्यात आली होती. १ जुलै पासून ही वाढ लागू करण्यात येणार होती.

दरम्यान, कोरोना संकटकाळात राज्य सरकारकडून आशा सेविकांनाही मदतीला घेण्यात आले आहे. त्यामुळे आशा सेविकांना देण्यात येणारा मोबदला वाढवण्यात यावा, अशी मागणी केली जात होती. या मागणीवर जून मध्ये निर्णय घेण्यात आला होता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठक  निर्णय झाला होता. यानंतर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आशा सेविकांना वाढीव मानधनाची माहिती समाज माध्यमातून दिली होती. 


खेड्यापाड्यात जाऊन कोरोनाची साथ आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न या आशा सेविका करत आहेत. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, सर्वेक्षण, रुग्णांची प्राथमिक तपासणी करण्यापर्यंत सर्वच कामे या स्वयंसेविका करतात. या काळात जिवाची पर्वा न करता त्या रस्त्या रस्त्यावर गावागावांतून त्या फिरत असून, कोरोनाविषाणू संक्रमण रोखण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. शिवाय  महिला आरोग्य, प्रसूती, लसीकरण, शालेय पोषण आहारासंबंधी माहिती संकलन हे काम सुद्धा करतात, 


अमित ठाकरें यांचा पुढाकार 


२२ जून रोजी मनसे नेते अमित ठाकरे यांनी ‘आशा’ स्वयंसेविकांचा मासिक मोबदला वाढवून द्यावा, अशी मागणी करणारे पत्र उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना लिहिले होते. तसेच ‘आशा’ स्वयंसेविकांचा मासिक मोबदला वाढवण्याच्या मागणीसाठी त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट सुध्दा घेतली होती.



टिप्पण्या