Pandharpur: आजपासून मंदिरे खुली आहेत, असे समजून दर्शन घ्या-प्रकाश आंबेडकर

        दार उघड आता दार उघड

आजपासून मंदिरे खुली आहेत, असे समजून दर्शन घ्या-प्रकाश आंबेडकर


#विठ्ठलाच्या_दारी_बहुजनांचे_कैवारी


पंढरपूर: वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर राज्यातील मंदिरे भाविकांसाठी खुली करावी, या मागणीसाठी पंढरपूर येथे आज आंदोलन केले. यावेळी त्यांनी उपस्थित वारकऱ्यांना आणि नागरिकांना आजपासून मंदिरे खुली आहेत, असे समजून दर्शन घेण्याचे आवाहन केले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज पंढरपूरमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र, प्रकाश आंबेडकर यांनी पोलीस बंदोबस्त असला तरी आम्ही आंदोलन करणारच, अशी भूमिका घेतली होती. यानंतर पोलिसांनी प्रकाश आंबेडकर यांच्यासह वारकरी सेनेचे पदाधिकारी आणि वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी अशा ११ लोकांना मंदिरात सोडले.


या आंदोलनाला राज्यातील  अनेक वारकरी संघटनांचा पाठिंबा जाहीर झाला होता. मात्र, आंदोलनात सहभागी वारकऱ्यांची संख्या अत्यल्प दिसत होती.त्यामानाने वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते अधिक संख्येने सहभागी झालेले दिसत होते.




विठ्ठल मंदिर प्रवेश आंदोलनासाठी अनेक कार्यकर्ते पंढरपुरात रात्रीच दाखल झाले होते. परंतु वारकरी आणि वंचितच्या कार्यकर्त्यांना पंढरपूरमधील शिवाजी चौकात पोलिसांनी रोखले होते. तर प्रकाश आंबेडकर मोहोळ येथून आज पंढरपूरला पोहचले होते.


 “पंढरपूरमध्ये पोलीस बंदोबस्त असला तरी आम्ही आमचे आंदोलन करणार आहोत. आमच्या आंदोलनानंतर राज्यातील सर्व मंदिर खुली होतील. यापुढे मंदिर खुली करण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ येणार नाही. मी सरकारला मंदिर खुली करण्यासाठी पटवून सांगणार आहे.” यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी भाजपवरही सडकून टीका केली. भाजपने घंटानाद करण्यापेक्षा केंद्र सरकारला सांगावे आणि मंदिरे खुली करण्याचे आदेश देण्याची मागणी करावी."

ऍड.  प्रकाश आंबेडकर 


दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आंबेडकरांना त्यांच्या मागणीवर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्याचे आश्वासन देत आंदोलन न करण्याची विनंती केली केली होती.



याआधी प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला मंदिरे खुली करा अन्यथा पंढरपूरमध्ये आंदोलन करु असा इशारा दिला होता. “दारु, गुटख्याची दुकानं चालू असताना विठ्ठल मंदिर बंद का? असा प्रश्न विश्व वारकरी सेनेचे संस्थापक ह.भ.प. अरुण महाराज बुरघाटे आणि ह.भ.प. शेट्ये महाराज यांनी सरकारला विचारला होता. यावर राज्य सरकार प्रतिसाद देत नसल्याने ३१ ऑगस्टला समस्त वारकरी बांधवांनी मोठ्या संख्येने पंढरपूरला जमावे,” असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत हजारोंच्या संख्येने वारकरी,श्री विठ्ठल भक्त,नागरिक आणि वंचितचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.


टिप्पण्या