Ganesh festival2020:गणपती बाप्पा घरी आले...आनंदाने घर भरले... या शुभ मुहूर्तावर करा गणेश स्थापना

गणपती बाप्पा घरी आले...आनंदाने घर भरले... या शुभ मुहूर्तावर करा गणेश स्थापना

गणपती बाप्पा आपण घरोघरी स्थापित करून या वर्षीच्या महामारीस कायमचे नष्ट करण्याचे बाप्पास साकडे घालूया व सर्वविघ्न निवारण करण्यासाठी घरोघरी गणपती बसवू या!



भारतीय अलंकार

अकोला: श्री गणेश चतुर्थी  अबाल वृद्धांचा आवडीचा उत्सव. दाही दिशांना जणू उत्साह,जल्लोष,आनंद असे वातावरण या दिवसात असते. यंदाचा गणेशोत्सव अगदी साधेपणाने सर्वत्र साजरा होणार आहे. कोरोना विषाणूचे विघ्न जगावर आले आहे. या विघ्नाला विघ्नहर्ता दूर करून,नक्कीच आनंदी वातावरण प्रदान करणार आहे.


गणेश चतुर्थी सण पूर्वापार भारतात साजरा करण्यात येतो. स्वातंत्र्यपूर्व काळात हा सण घरगुती स्वरूपात साजरा करीत होते.मात्र,ब्रिटिशांचा अत्याचार सामान्य लोकांवर वाढतच होता. देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचे असेल तर,लोकांना एकत्र आणणे गरजेचे होते. यासाठी लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी समाज जागृतीसाठी आणि एकोपा टिकून राहण्यासाठी गणेश चतुर्थी व शिवजयंती हे उत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरे करण्यास सुरुवात केली. या उत्सवात लोकांना आपले विचार सभास्थानी मांडता येत होते. आजही गणेशोत्सव निम्मित समाज जागृतीचे कार्य युवा पिढी करताना दिसतात. 


पुण्यात आजही गणेशोत्सव खूप मोठया प्रमाणात साजरा केला जातो. पुणे फेस्टिव्हल विख्यात आहे. पुण्याच्या केसरी वाड्यात व मंडईत सार्वजनिक गणेशात्सव साजरा करण्यात पूर्वापार साजरा करण्यात येतो. दगडूशेठ हलवाइ गणपती तर जगप्रसिद्ध आहे. तसेच पेशव्यांनी स्थापिलेला कसबा गणपतीचा उत्सवही फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. 


गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत हा उत्सव सार्वजनिक रितीने मंडळांतर्फे साजरा करण्यात येतो. मात्र, यावर्षी कोरोनामुळे सार्वजनिक गणपती उत्सवावर शासनाने बरेच निर्बंध घातले आहे.घरगुती स्वरूपातही घरोघरी गणेशमूर्तीची स्थापना केली जाते. विद्येची देवता असणाऱ्या गणेशाचे चिमुकल्याना मोठे आकर्षण असते. 


 श्री गणेश स्थापना


श्री गणेशाची मूर्ती आणून ती पूर्व-पश्चिम किंवा उत्तरेकडे तोंड करून स्थापिली 'जाते.  गणेशाच्या पूजेकरिता दूर्वा, रक्तचंदन, सुगंधी फुले, तुळस (फक्त स्थापने दिवशी घ्यावी.), केवडा, शमी, शेंदूर तसेच एकवीस प्रकारची पत्री(पाने), बुक्का व पंचामृतासह ५ फळे व पूजेचे सर्व साहित्य घ्यावे. ब्राह्मण या वेळी मंत्र म्हणून पार्थिव मूर्तीला जागेपण आणतात.

षोडशोपचार पूजा केल्यानंतर महाभिषेक केला जातो. नंतर टाळ, मृदंग, झांज, टाळ व टाळ्या वाजवून देवांच्या आरत्या म्हणतात. या वेळी अथर्वशीर्ष व मंत्रपुष्पांजली म्हटली जाते. एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो. सकाळ संध्याकाळ गणेशाची पूजा करून आरती केली जाते. गणेशमूर्तीची आरास व सजावट ऐपतीप्रमाणे करतात.



गणेश मूर्ती घरी आणताना

गणेशमूर्ती आणताना ती रुमालाने झाकून आणली जाते. मूर्ती घरी आणताना घराच्या दाराबाहेर तांदूळ व पाणी ओवाळून बाहेर टाकतात. मूर्ती आणणाऱ्याच्या पायावर पाणी घालतात. सुवासिनी मूर्तीचे औक्षण करतात. नंतर 'गणपती बाप्पा मोरया' म्हणत गणपती घरात आणतात.पाटावर तांदूळ पसरून त्यावर गणपती ठेवतात. प्रथम सुपारीची व त्यानंतर गणपतीच्या मूर्तीची प्रतिस्थापना करण्यात येते. आरतीच्या नंतर पेरू, केळी व खिरापतीचे वाटप करतात.सार्वजनिक गणपतीच्या ठिकाणी वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम होऊन दहा दिवस उत्सव साजरा करण्यात येतो.


गणपती विसर्जन - अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते.  आपापल्या घरच्या रीतीप्रमाणे दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस किंवा दहा दिवस गणपती असतो. विसर्जनापूर्वी गणपतीची उत्तरपूजा करण्यात येते.

गणपती उठवताना मूर्तीच्या जागी पाण्याची लोटी, तांब्या भरून ठेवावा.'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' अशा जयघोषात विसर्जनाची मिरवणूक निघते. विसर्जनापूर्वी आरती करतात. गणपती जवळ ठेवलेला श्रीफळ(नारळ) विसर्जनाच्या वेळी फोडावा. विसर्जनानंतर गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला' ,'गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या',अश्या जयघोषात आपली लाडक्या गणपती बाप्पाला निरोप दिला जातो.


श्री गणेश मुर्ती स्थापना मुहूर्त

दि.२२-८-२०२०,शनिवार रोजी श्री गणेश पार्थिव मृण्मयी मुर्ती स्थापनेचे विशेष मुहूर्त-सकाळी ८ ते ९, दुपारी ११ ते १२,दुपारी २ते५, संध्या.६ ते ८ पर्यंत आपल्या कुलाचाराप्रमाणे श्री गणेश मूर्तीची स्थापना करावी. या वेळेत मूर्ती स्थापना केल्यास भक्तांचे विशेष मनोरथ पुर्ण होतात तसेच घराची,कुळाची प्रतिष्ठा वाढून सर्व योजलेले कार्य निर्विघ्नपणे सिध्दीस जाते! व पुर्ण वर्ष भरभराटीचे जाऊन मुलामुलींना विद्येत यश प्राप्त होते व घरात मंगलमय वातावरणाची निर्मिती होते, तसेच रिध्दीसिध्दीच्या गणेशासहीत आगमनाने धनधान्य,समृध्दी प्राप्त होते व गंडांतरांचे निवारण होते या दहा दिवसांच्या ऊत्सवा दरम्यान श्री गणेशयाग,गणेशपुराण,सहस्त्र आवर्तने ही आयोजने गुरूजींकरवी केल्या जाते. या  अनुष्ठानांद्वारे विशेष फलप्राप्ती होते. गणपतीला प्रसन्न करण्यासाठी मोदक,लाल फुल, दुर्वा, शमी, आघाडा, केना अर्पण करून मनातील ईच्छा पुर्ण होण्यासाठी गणेशाला प्रार्थना केल्या जाते. असा हा गणेशोत्सव प्रत्येकाच्या कुळाचारानूसार १,३,५,७,१०दिवसांचा साजरा केल्या जातो, अशी माहिती अकोला पुरोहित संघाचे अध्यक्ष अमोल चिंचाळे,गुरूजी यांनी दिली.

                                      

टिप्पण्या