Orphan:'ओसाड गावात' बाग फुलविणारे श्रमजीवी पालवे दाम्पत्य

अनाथांचिया सुखास्तव झटले । तेचि आवडले देव, धर्मा।।

'ओसाड गावात' बाग फुलविणारे श्रमजीवी पालवे दाम्पत्य

-शुभम बायस्कार 
भंगलेल्या मानवी मूर्ति। यांच्या सेवेतची ईश्वरभक्ती । आर्तास दिल्यावाचूनी शांती। मांगता मुक्ती मिळे कैसी ।। जीवनातूनी जे जे उठले त्यासी सह्रदयत पाहिजे भेटले। अनाथांचिया सुखास्तव झटले । तेचि आवडले देव, धर्मा 

वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या या ओवी नंदूबाबा पालवे यांचे काम पहिल्यावर आठविल्या शिवाय राहणार नाहीत. 'पेटभर खानाभी देतेहो, प्यार भी देतो हो, तो बेटा घर भी दे दो..या एका वाक्यातून आणि अखंड परिश्रमातून सेवा संकल्पचा भव्य निवासी प्रकल्प आज पळसखेळ सपकाळ (जि.बुलडाणा) इथे आपल्याला उभा झालेला पहायला मिळतो. सेवा संकल्पच्या परिवारात अनाथ, मनोरुग्ण, बेसहारा, एचआयव्ही बाधित तसेच प्रकल्पाचे मिळून असे १०५ जण राहतात. नंदूबाबा आणि आरतीताई पालवे हे त्यांचे कुटुबप्रमुख. सकाळपासून सुरू होणारी सेवा संकल्पची दिनचर्या ही सायंकाळपर्यन्त सुरू राहतो. घरात एका मनोरुग्णाचा सांभाळ होऊ शकत नाही म्हणून आम्ही त्याला वाळीत टाकतो. पण इथे शेकडो मनोरुग्णांचे सडलेले अवयव, जखमा, विष्ठा पालवे दाम्पत्य स्वच्छ करतो. त्यांचा संपूर्ण सांभाळ करतो. हे पाहून निश्चतच मन सुन्न झाल्याशिवाय राहत नाही. मनोरुग्ण हेही समाजाचाच घटक. मात्र आम्ही त्यांना नाकारातो. आणि पालवे दाम्पत्य त्याला आपल्या घरात आश्रय देतात. नुकतोच त्यांच्याशी भेटून विविध विषयांवर चर्चा केली. खुप ऊर्जा मिळाली सेवा संकल्पमधून.

थोडेसे सेवा संकल्पविषयी..
बुलडाणा जिल्ह्याच्या महसूल दप्तरी अजूनही 'पळसखेड सपकाळ' या गावाची 'ओसाळ गाव' म्हणून नोंद आहे. त्यावरूनच प्रा.निशिकांत ढवळे यांनी सेवा संकल्पचे नंदकुमार पालवे (नंदूबाबा) व आरती पालवे याचा प्रवास शब्दबद्ध करताना 'ओसाड गावचे रविहाशी' या पुस्तकाला नाव दिल. मात्र पालवे दाम्पत्याने या ओसाड प्रदेशावर शेकडो मनोरुग्णांची, बेसहारा लोकांची सेवा, सुश्रुषा करुण हा परिसर केव्हाचा सुजलाम सुफलाम केला. सेवा संकल्पचा आणि माझा सुरूवातीच्या काळापासून परिचय. मीही याच परिवारातील घटक. नंदूबाबाने रस्त्यावर राहणाऱ्या बेसहारा रुग्णाना जेवन देण्याचा उपक्रम सुरु केला. त्यानंतर बरीच लोक जुळली. चिखलिमध्ये हा उपक्रम चालत असायचा. अखंडितपणे हे काम सुरू होत. एकदिवस 'पेटभर खानाभी देतेहो, प्यार भी देतो हो तो बेटा घर भी दे दो..' असे वाक्य एका रुग्णाकडून आल्यावर सेवा संकल्पचा निवासी प्रकल्प बाबांनी सुरू करण्याचे ठरविले. 
त्यानुसार प्रचंड संघर्षातून, निरंतर मेहनतीतून पळसखेळ सपकाळ (जि.बुलडाणा) येथे अनाथ, बेसहारा, मनोरुग्णांचा निवासी प्रकल्प २०१२ पासून सुरू झाला. दहा बाय दहाच्या खोलितून सुरू झालेला प्रवास आता एक महत्वाच्या टप्यावर आलेला आहे. लोकसभागातून येथील काम चालतो. प्रकल्पावर एकूण १०५ जण राहतात. 

गांधीविचार श्रेष्ठ 
शालेय काळापासून विविध उपक्रमात पालवे हे पुढे असायचे. असे असले तरी बंडखोरही तितकेच. हा बंडखोरपणा कुठला तर राष्ट्रगीत योग्यप्रकारे म्हटले नाही, राष्ट्रीय कार्यक्रमात सिव्हील यूनिफॉर्म घालून आले म्हणून थेट लढाई करण्यात ते पटाइत. मग प्रश्न असा उपस्थित होतो की गांधी हे अहिंसेचे पुजारी आणि त्यांना माननारे पालवे हे हिसंक कसे? हा प्रश्न मी त्यांना केला तेव्हा ते म्हणाले, गांधीजींनी हरिजनांना संगीतले होते की, आजपर्यंत जो आम्ही तुमच्यावर अन्याय केला आहे त्याकरिता तुम्ही माझ्या उजव्या गालावरित मारली तरी मी दूसरा गाल पुढे करेल. तरीही तुमच्यावर झालेल्या अन्यायाची परतफेड होणार नाही असे स्पष्ठ केले होते. पण त्यांच्या या वाक्याचा विपर्यास करण्यात आला. गांधीनी 'करो या मरोचा नारा दिला होता. आणि मरणारा तर काही तरी करुणच मरातो हेही खर. असे म्हणून त्यांनी या प्रश्नाला साजेस उत्तर दिलं.

१२ मनोरुग्ण झाले बरे
प्रकल्पावरील आतापर्यन्त १२ रुग्ण हे बरे झाले. ज्या समाजाने, आप्तेष्ठानी त्यांना नाकरले त्यांनाही आता त्यांनीच नाकारत प्रकल्पावर राहायचा निर्णय घेतला. हे १२ जन नंदुबाबा आणि आरतीताई यांना प्रकल्पाचे काम करण्यास मदत करतात. सायंकाळी येथे 'इतनी शक्ती हमे दे ना दाता' ही प्रार्थना होतो. मनोरुग्णांना ही भाषा कळत नाही. मात्र सारे तल्लीन होऊन एकसुरात टाळ्या वाजवतात.  त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य उमटणारे तरंग आणि हवा हे पालवे दांपत्याच्या श्रमजीवी पणाचं आणि त्यांच्या कष्टाचं चीज असल्याचं मनाला सांगत होत. दादा सांगताना म्हणाले, मनोरुग्णांची संख्या समाजात वाढण की धोक्याची घंटा आहे. ते समाजाचे घटक असून सुद्धा समाज त्यांना नाकारतो म्हणूनच आमच्यासारख्यांना त्यांना कुशीत घ्यावे लागतो. समाजसेवेचे ढोंग करणारे ढोंगी समाजात वाढत असताना, पालवे दाम्पत्यांनी समाजसेवेचा खरा आयाम समाजात प्रस्थापित केला. अशाच लोकांना समाजाने आता सर्वांगीण बळ देण्याची गरज आहे. कोरोनाची पार्श्वभूमी संपल्यावर आपण बुलढाणा जिल्ह्यात गेले तर या प्रकल्पाला निश्चितच भेट द्यावी.

ज्यांनी विरोध केला, त्यांनीच स्वीकारलं
नंदू पालवे हे लहानपणापासून अभ्यासात हुशार. पालवे कुटुंबियांचा पूर्व इतिहास पाहिला तर घरात वारकरी संप्रदायाचे वातावरण. त्यांच्या आजोबांना ज्ञानेश्वरी, तुकारामांची गाथा मुखोद्गत. त्यांचे चारही भाऊ उच्चपदस्थ अधिकारी पदावर कार्यरत आहेत. आपल्याला असा प्रकल्प सुरू करायचा आहे ही संकल्पना त्यांनी कुटुंबीयांमध्ये बोलून दाखवली. त्यावेळी तू वेडा झालास का असं म्हणून घरच्यांनी नाकारलं. अभ्यास कर मोठा हो चांगली नोकरी कर असं घरच्यांनी सांगितलं. मात्र पालवे हे आपल्या विचारावर ठाम राहिले. आणि त्यातूनच सेवा संकल्प आकारास आलं. निवासी प्रकल्प सुरु करायचा आहे, जमीन हवी आहे अशी मागणी त्यांनी घरच्यांना केली. मात्र त्यांनी त्याला विरोध दर्शवला पण तुम्ही गेल्यावर माझ्या नावे  जी जमीन येईल त्यावर मी हाच प्रकल्प सुरू करेल, असं म्हणून त्यांनी आपलं काम अविरत अविश्रांत सुरू ठेवलं. त्यांच्या या या विचाराशी नंतर एकरूप होत त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना सेवा संकल्प प्रकल्प सुरू करण्याची परवानगी दिली. आणि आज सेवा संकल्पचा भव्य प्रकल्प त्यांच्याच शेतात सुरू आहे.

(लेखक पत्रकार आहेत)

टिप्पण्या