Online classes:बालवाडी ते बारावी ऑनलाईन वर्गाचे वेळा पत्रक जारी

बालवाडी ते बारावी ऑनलाईन वर्गाचे वेळा पत्रक जारी


भारतीय अलंकार

मुंबई: राज्यात कोरोना विषाणू संकटामुळे बिकट  परिस्थिती निर्माण झाली आहे. मागील काही महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येण्याऐवजी वाढतच आहे. राज्यातील कोरोना बाधितांची संख्या आता तीन लाखाच्यावर गेली आहे. कोरोना प्रसाराचा वाढता धोका लक्षात घेऊन राज्य सरकारने ऑनलाईन शैक्षणिक वर्षाला सुरूवात केली आहे. परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत ऑनलाईन पद्धतीने वर्ग घेतले जाणार, असे राज्य सरकारने यापूर्वीच घोषित केले.त्यानुसार आता  राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ऑनलाईन वर्गांचे वेळापत्रक ट्विट करून जाहीर केले आहे.याबाबतचा आदेश बुधवारीच शिक्षण विभागाने जारी केला.



कोरोनाचा फैलाव भयंकर होत असल्याने राज्य सरकारने १५ जून पासून शैक्षणिक वर्षाला सुरूवात केली. मात्र, स्थानिक परिस्थिती नुसार प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत. त्याचबरोबर अशा भागात ऑनलाईन पद्धतीनं शिकवणी वर्ग घेण्याचे नियोजन शिक्षण विभागाने केले आहे. आता बालवाडी ते बारावी पर्यंतच्या वर्गांचे वेळापत्रक वर्षा गायकवाड यांनी जाहीर केले.

असे आहे वेळापत्रक


१) पूर्व प्राथमिक (बालवाडी) : सोमवार ते शुक्रवार ऑनलाईन वर्ग होणार आहे. याचा कालावधी प्रत्येक दिवशी ३० मिनिटांचा असणार आहे. या वर्गांमध्ये पालकांशी संवाद करून विद्यार्थ्यांच्या अभ्यासाविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे.


२)पहिली व दुसरी : सोमवार ते शुक्रवारी या कालावधीत प्रत्येक दिवशी ३० मिनिटांचे दोन वर्ग घेण्यात येणार आहे. यामध्ये १५ मिनिट विद्यार्थ्यांच्या पालकांशी संवाद मार्गदर्शन असणार आहे. तर उर्वरित १५ मिनिट विद्यार्थ्यांना उपक्रमावर आधारित शिक्षण दिले जाणार आहे.


३) तिसरी ते आठवी : या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक दिवशी ४५ मिनिटांचे दोन वर्ग घेतली जाणार आहेत. यात विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण दिले जाणार आहे.


४) नववी ते बारावी : या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ४५ मिनिटांची चार सत्रे असणार आहेत. त्यातून त्यांना ऑनलाईन माध्यमातून शिक्षण दिले जाणार आहे.

……...

टिप्पण्या