Irfan Khan:हरहुन्नरी इरफान गेला…

हरहुन्नरी इरफान गेला…

चाणक्य, चंद्रकांता,श्रीकांत,भारत एक खोज या दूरदर्शनवर गाजलेल्या धारावाहिक मधून दमदार अभिनयाने लोकांच्या मनावर पद्मश्री इरफान खानने राज्य केले.प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य  गाजविण्याचा सिलसिला त्याने अखेरच्या श्वासपर्यंत चालविला. बुधवार,२९ एप्रिल रोजी इरफानने जीवनाच्या रंगमंचावरून एक्झिट घेतली. दीर्घकाळापासून कॅन्सरशी झुंज देत असलेल्या इरफानचे  निधन झाले. त्याच्या मागे पत्नी आणि दोन मुले आहे.

मंगळवारी अचानक तब्येत बिघडल्यामुळे इरफानला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात आयसीयूमध्ये भरती करण्यात आले  होते. इरफान लवकर बरा व्हावा, यासाठी चाहते प्रार्थना करत असताना त्याच्या मृत्यूची बातमी आली आणि चाहते शोकसागरात बुडाले. बॉलिवूडमध्येही शोककळा पसरली. बुधवारी सकाळी इरफानच्या प्रवक्त्याने कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले होते. परंतु,यानंतर काहीच तासात इरफानच्या मृत्यूची बातमी आली.

काही दिवसांपूर्वी इरफानची आई सईदा बेगम यांचे जयपूरमध्ये निधन झाले होते.  लॉकडाऊन असल्यामुळे इरफान जयपूरमध्ये पोहोचू शकला नव्हता. २०१८ मध्ये इरफानने त्याच्या आजाराबद्दल चाहत्यांना सांगितले होते. इरफानला न्यूरो इंडोक्राइन ट्यूमर  आजार होता. इरफानच्या आजारावर लंडनमध्ये उपचार सुरु होते. दीर्घकाळ उपचार घेतल्यानंतर सप्टेंबर २०१९ मध्ये इरफान भारतात परतला होता. यानंतर त्याने ‘अंग्रेजी मीडियम’ या सिनेमाचे शूटींग सुुरू केले होते. नुकताच हा सिनेमा रिलीज झाला होता. हा त्याचा शेवटचा चित्रपट ठरला.

साहबजादे इरफान

इरफान खानला  साहबजादे इरफान खान म्हणूनही ओळखल्या जायचे. त्याचा जन्म जयपूर येथे ७ जानेवारी १९६७ साली झाला. आज  २९ एप्रिल २०२०रोजी मुंबई येथे त्याने अखेरचा श्वास घेतला. इरफान हा एक हिंदी आणि इंग्रजी चित्रपटांत, नाटकात तसेच दूरचित्रवाणीवर काम करणारा भारतीय अभिनेता होता. १९८८ - २०२० या काळात सलग त्याने रंगमंचाची सेवा केली.हिंदी, इंग्रजी या भाषेवर त्याचे प्रभुत्व होते.नेमसेक, पान सिंग तोमर, मकबूल, सलाम बॉंबे हे चित्रपट त्याच्या अभिनयाने गाजले. डर, चाणक्य, चंद्रकांता, भारत एक खोज या मालिकांमुळे त्याने घराघरात आपले वेगळे स्थान निर्माण केले होते.

एम.ए. करत असताना त्याला दिल्लीतील ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ची शिष्यवृत्ती मिळाली.नेमसेक, स्लमडॉग मिलेनियरर या इंग्रजी व पानसिंग तोमर, मकबूल या चित्रपटांतील कामामुळे तो प्रकाशझोतात आला होता.ॲसिड फॅक्टरी (इंग्रजी),एक डॉक्टर की मौत,ज्युरासिक वर्ल्ड (इंग्रजी), द अमेझिंग स्पायडरमॅन (इंग्रजी), द वॉंरियर (इंग्रजी), नेमसेक (इंग्रजी), पानसिंग तोमर, मकबूल, रोग ,रोड टु लडाख (लघुपट) ,लाईफ ऑफ पाय (इंग्रजी),लाईफ इन मेट्रो (इंग्रजी), सच अ लॉंग जर्नी (इंग्रजी), सलाम बॉंबे, स्लमडॉग मिलेनियर (इंग्रजी), हासिल या चित्रपटात त्याच्या अभिनयाचे वैशिष्ट्ये पाहायला मिळतात.

इरफानला २०११ मध्ये पद्मश्री पुरस्काराने  सन्मानित करण्यात आले होते. त्याआधी त्याला फिल्मफेअर  सर्वोत्तम खलनायक पुरस्कार - २००३ (हासिल), फिल्मफेअर सर्वोत्तम साहाय्यक अभिनेता पुरस्कार - २००७ (लाईफ इन मेट्रो)राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेता- २०१२ मध्ये पानसिंग तोमर चित्रपटाकरिता प्रदान करण्यात आला होता. अश्या या हरहुन्नरी अभिनेत्याला शतशः नमन आणि भावपूर्ण आदरांजली.


                             लेखक

          अधिवक्ता नीलिमा शिंगणे-जगड

                     अकोला (विदर्भप्रांत)

                       मोबा:9822732880



टीप:लेख आवडल्यास like, comment, share करावे.(share करताना लेखकाच्या नावासह share करावा)



टिप्पण्या