अकोला शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला


अकोला शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला

आरोग्य यंत्रणा अलर्ट

पोलीस बंदोबस्त वाढविला

रुग्णाचे बैदपुरातील घर केले सील

         जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर 
  https://youtu.be/_LMnNe-QhjE

 अकोला : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूने अखेर मंगळवारी अकोल्यातही शिरकाव केला. अकोला जिल्ह्यातील एका रुग्णाला कोरोना विषाणूची बाधा झाली असून, त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा माहिती कार्यालयाकडून देण्यात आली. या रुग्णाचा पॉझिटिव्ह अहवाल मंगळवारी सायंकाळी प्राप्त झाल्याचे जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले.
एकीकडे राज्यात सर्वत्र कोरोनाचे रुग्ण आढळून येत असताना, अकोला जिल्ह्यात मात्र आतापर्यंत एकही रुग्ण आढळला नव्हता.  मंगळवारी एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली.मात्र, नागरिकांनी घाबरून न जाता अधिक काळजी घ्यावी,असे प्रशासनाने सांगितले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत जिल्ह्यात १२३ संदिग्ध रुग्ण दाखल झाले असून, त्यापैकी ८५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अजुनही ३७ अहवाल प्रलंबित असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे.

रुग्णाची पत्नी मात्र ‘निगेटिव्ह’

ज्या रुग्णाची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे त्या रुग्णाची नजिकच्या काळातील कोणत्याही प्रवासाची नोंद नाही. या रुग्णासोबत त्याच्या पत्नीचेही नमुने पाठविण्यात आले होते. त्याच्या पत्नीचे अहवाल मात्र निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली. या रुग्णाला तीन वर्षांपासून दम्याचा विकार असल्याची वैद्यकीय नोंद आहे,असेही सूत्रांनी सांगितले.


तीन किमी परिघातील भाग ‘सिल’

जिल्ह्यातला पहिला कोरोना पॉझीटिव्ह रुग्ण हा अकोला शहरातला आढळला आहे. हा रुग्ण ज्या भागातील आहे त्या बैदपूरा या भागाला केंद्रबिंदू मानून तीन किमी परिघातील परिसर  तसेच दोन किमीचा बफर झोन असा पाच किमी परिसर ‘सिल’ करुन त्यातील तीन किमी परिसरात प्रत्येक व्यक्तीची आरोग्य तपासणी करण्यात येईल. हा संपूर्ण भाग बंद ठेवण्यात येईल. बाहेरुन कुणालाही या भागात प्रवेश दिला जाणार नाही वा या भागातून कुणीही बाहेर जाऊ शकणार नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली. यासंदर्भात स्वतंत्र आदेश जिल्हाप्रशासनाने निर्गमित केले. या भागाला सिलबंद राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त ही तैनात असेल, पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त राखून या भागातील लोक बाहेर व बाहेरील लोक या भागात येणार नाहीत यासंदर्भात कलम १४४ नुसार संचारबंदीची अंमलबजावणी करावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी पोलिसांना दिले आहेत.
हा भाग केला सील
१) चांदेकर भवन ते सिटी कोतवाली 2) चांदेकर भवन ते फतेह अली चौक 3 ) फतेह अली चौक ते दाऊद भाई कादर भाई पेट्रोल पंप ते अमरसिंग ठाकुर औषधी दुकान 4 ) तेलीपूरा ते टिळक रोड ते सिटी कोतवाली.

टिप्पण्या