जिल्हा प्रशासन, पोलिसांनी आताअधिक सतर्क राहून लॉकडाऊननियमांचे काटेकोर पालन करावे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

जिल्हा प्रशासन, पोलिसांनी आता
अधिक सतर्क राहून लॉकडाऊन
नियमांचे काटेकोर पालन करावे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
पालिकांनी पावसाळ्यापूर्वीची महत्वाची कामेही संपवावी

मुंबई दि १९: लॉकडाऊन जाहीर करून सर्व बंद करणे सोपे आहे पण आता आपण काही भागात जेव्हा मर्यादित प्रमाणात हालचालींना परवानगी देतो आहे तेव्हा आपल्यावरची जबाबदारी आणखी वाढते हे लक्षात ठेऊन प्रत्येक जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, पोलीस अधिकारी यांनी पुढील काळात अजिबात गाफील न राहता काम  करावे अशा स्पष्ट सुचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्स बैठकीद्वारे राज्यातील प्रशासनाला दिल्या.


सोमवार २० एप्रिलपासून जो भाग कंटेनमेंट क्षेत्र नाही अशा ठिकाणी विशेषत: पालिका क्षेत्राच्या बाहेर  स्थानिक प्रशासनाने संपूर्ण आढावा घेऊन मर्यादित प्रमाणात उद्योग, व्यवसाय सुरु करण्यासंदर्भात सुधारित देण्यात आल्या आहेत. त्याविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, कोणत्याही परिस्थितीत कामगारांची निवास व्यवस्था त्याच परिसरात होत असेल आणि कामगारांची वाहतूक होणार नसेल तर तसे उद्योगांनी लिहून देणे गरजेचे आहे. एमयडीसीने यासाठी त्यांच्या पोर्टलावर नोंदणीची व्यवस्था केली आहे त्यानुसार  जिल्हाधिकारी आणि उद्योग विभागाचे अधिकारी यांनी व्यवस्थित छाननी करून मान्यता द्यायची आहे. 

मान्सूनपूर्व कामांकडेही लक्ष द्या 

कोरोनाची लढाई सुरु होऊन ६ आठवडे होत आहेत. आता लवकरच उन्हाळा संपेल आणि पावसाळ्याचे वेध लागतील. विशेर्ष्ट: पुण्या मुंबईसारखे महानगर आणि इतर शहरांमध्ये यादृष्टीने मोठ्या प्रमाणावर पाणी साचणे, पूर परिस्थिती उद्भवेल अशा ठिकाणी कामे हाती घेऊन संपवावी, आवश्यक ती बांधकामे, दुरुस्त्या करणे गरजेचे आहे तेही करावे

पुढील ३ महिने सावध राहून काम करा 

आरोग्य मंत्रालयाने महारष्ट्र कोरोनाचा जो मुकाबला करीत आहे त्याचे कौतुक केले आहे, आपणही सर्व मार्गाने साथीवर  मिळविण्याचा प्रयत्न करतोय. कुठल्याही परिस्थितीत आपल्याला रेड झोन ऑरेंज झोन आणि ग्रीन झोन मध्ये आणायचे आहेत. त्याचवेळेस नवे हॉटस्पॉट निर्माण होऊ नये हेही पहायचे आहे. एप्रिल शेवटचा आठवडा आणि मे महिन्याचा मध्य हा या साथीचा प्रादुर्भाव वाढतो किंवा कमी होतो हे पाहण्याचा कालावधी आहे. ही लढाई आत्ता तर कुठे सुरु झाली आहे त्यामुळे पुढील ३ महिने आपल्याला गाफील न राहता काम करावे लागणार आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले. 


पुढील खरीप हंगामाची कामे, वृक्षारोपण, तेंदूपत्ता, जंगलातील लाकूड विषयक, मस्त्यव्यवसाय, मनरेगा अशी व इतर शेती विषयक कामे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देतात ती पुरेशी सामाजिक अंतराची काळजी घेऊन सुरु राहिली पाहिजे असेही ते म्हणाले.

कोरोना व्यतिरिक्त रुग्णांची काळजीही महत्वाची

केवळ कोरोना एके कोरना करताना इतर आजारांच्या रुग्णांची काळजीही घ्यायला पाहिजे यावर भर देऊन मुख्यमंत्री म्हणाले की आपापल्या जिल्ह्यात खासगी डॉक्टर्स, व इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांची सेवा घेऊन जिल्ह्यातल्या नागरिकांना आरोग्य सेवा मिळतील, वेळेवर लसीकरण, बाळंतपण, डायलेसीस, महत्वाच्या शस्त्रक्रिया होतील हे पहा

केवळ व्हेंटीलेटरवर भर न देता सर्व कोविड रुग्णालयांत ऑक्सिजन पुरेसा मिळेल हे पहा. कारण व्हेंटीलेटर हा शेवटचा पर्याय आहे.

७५ हजार जलद चाचणी किट्स

याप्रसंगी बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वैद्यकीय कर्मचारी, पोलीस यांचे आरोग्यही चांगले राहील आणि त्यांना कुठलीही विषाणू बाधा होणार नाही याकडे लक्ष दिले पाहिजे, रुग्णालय स्वच्छता, साफ सफाई, महत्वाची आहे असे सांगून ते म्हणाले की, सर्वाचे मानसिक स्वास्थ्य उत्तम राहणे पण गरजेचे आहे. पदव्युत्तर शिक्षण घेणारे डॉक्टर्स सेवा घेणे, चाचण्यांची संख्या वाढवणे , व्हेंटीलेटरवरील रूग्णाला विशेषज्ञ डॉक्टरने तपासणे, जलद चाचणी कीट यावरही त्यांनी सुचना केल्या.७५ हजार जलद चाचणी किट्स येऊन दाखल झाल्या असून विशेषत: रेड झोन मध्ये तपासण्या सुरु केल्या जातील असेही ते म्हणाले.        

झोन म्हणजे काय ?

यावेळी झोन्स विषयी थोडक्यात माहिती अपर मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी दिली. रेड झोन म्हणजे ज्यात सातत्याने पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत असा  झोन . यात आऊटब्रेक आणि क्लस्टर असे दोन भाग पडतात. आउटब्रेकमध्ये १५ पेक्षा जास्त रुग्ण असतात तर क्लस्टरमध्ये १५ पेक्षा कमी रुग्ण असतात.

ऑरेंज झोन म्हणजे ज्यात गेल्या १४ दिवसांत एक्टीव्ह रुग्ण आढळलेला नाही असा भाग आणि ग्रीन झोन म्हणजे असा ऑरेंज झोन ज्यात त्याच्या  पुढील १४ दिवस एकही रुग्ण आढळत नाही. 

मुख्य सचिव अजोय मेहता यांनी या बैठकीचे संचालन केले तसेच जिल्हाधिकाऱ्याना सुचना दिल्या. बैठकीस पोलीस महासंचालक सुबोध कुमार जायस्वाल, पोलीस आयुक्त परम बीर सिंग हेही उपस्थित होते.

टिप्पण्या