डॉ.बाबासाहेबांच्या संकल्पनेतील राजकीय प्रशिक्षण विद्यालय 'अर्थात अकोला पॅटर्न'.
भारतरत्न डॉ. भीमराव आंंबेडकर जयंती निमित्त
अनेकांनी यापूर्वी आपापल्या पद्धतीने भारिप बहुजन महासंघाची चळवळ, ऍड.बाळासाहेब आंबेडकर व अकोला पॅटर्नची मांडणी केली आहे. परंतु मी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरच्या स्वप्नातील राजकीय पक्ष व त्यांनी सुरु केलेल्या राजकीय प्रशिक्षण केंद्राशी जोडून, भारिप, भारिप बहुजन महासंघ आणि वंचित बहुजन आघाडी कशी समर्पक आहे, ही मांडणी करणार आहे.हे दोन दुवे प्रथमच अश्या पद्धतीने जोडले जाणार आहेत.बाबासाहेबांच्या संकल्पनेतील राजकिय पक्ष आणि राजकीय प्रशिक्षण विद्यालय समजून घेताना बाळासाहेब आंबेडकरांचा 'अकोला पॅटर्न' हा कश्या पद्धतीने बाबासाहेबांच्या संकल्पनेतील प्रत्यक्ष राजकीय प्रशिक्षण विद्यालय ठरलाय हे आपण समजून घेऊया.
आपण सर्वजण जाणतो की, बाबासाहेब ’रिपब्लीकन पक्ष’ नावाचा पक्ष स्थापन करणार होते.त्यासाठी ३० सप्टेबर १९५६ रोजी शेडुल्ड कास्ट फ़ेडरेशन च्या कार्यकारणीची बैठक बाबासाहेबांच्या दिल्ली निवासस्थानी बोलविण्यात आली होती. बैठकीत ’शेडुल्ड कास्ट फ़ेडरेशनचे’विसर्जन करून 'रिपब्लिकन पार्टी ऑफ़ इंडीया’ स्थापनेचा निर्णय घेण्यात आला होता.तत्पूर्वी बाबासाहेबांनी हे देखील हेरलं होते की देशातील लोकशाहीला परिणामकारक चालना देणे गरजेचे आहे.देशाला लोकशाही पद्धती नवीन असल्याने राजकीय प्रशिक्षण असलेले कार्यकर्ते घडविणे गरजेचे आहे.त्या प्रमाणे नियोजित रिपब्लिकन पक्षात तरुणांची भरती होत रहावी आणि राजकारणात प्रत्यक्ष सहभाग घेणारांसाठी एक प्रशिक्षण विद्यालय असावे. करिता मुंबई मध्ये ’प्रशिक्षण विधालय’ सुरु करण्याचे बाबासाहेबांनी ठरविले होते.ज्यांना विधीमंडळात कामकाज करण्याची महत्वाकांक्षा आहे, त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था या विद्यालयात करावयाची होती.त्या प्रशिक्षण विधालयाचे मुख्याध्यापक पदासाठी त्यांना सक्षम व्यक्ती हवी होती.उत्तम व्याख्याता,विषयात पारंगत असलेला आणि आकर्षक व्यक्तीमत्व असलेला व्यक्ती त्यांना मुख्याध्यापक हवा होता.त्या साठी सिध्दार्थ विधालयाचे ग्रंथपाल रेगे यांचे सहाय्याने हे प्रशिक्षण विधालय स्थापन करुन चालविण्याचा त्यांचा मानस होता.ह्या विधालयाचा लौकीक हा तेथील शिक्षकांच्या प्रतिभा आणि वक्तॄत्व सामर्थ्यावर अवलंबुन असेल, असे बाबासाहेबांना वाटत होते.१ जुलै १९५६ ते मार्च १९५७ पर्यंत रेगे यांच्या देखरेखी खाली ते प्रशिक्षण विधालय कार्यरत होते.बाबासाहेबांच्या अकाली जाण्याने हे राजकीय प्रशिक्षण केंद्र पोरके होवुन कायमचे बंद पडले.प्रशिक्षण केंद्राची संकल्पना मांड्णा-या बाबासाहेबांना कधीच ह्या प्रशिक्षण केंद्राला भेट देता आली नाही, हे देखील त्या केंद्राचे दृभाग्य होते.
बाबासाहेबांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष त्यांच्या हयातीत आणि त्यांच्या मार्गदर्शनात उभा होवु शकला नाही.बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणा नंतरच्या निवडणुकीत शेडुल्ड कास्ट फ़ेडरेशन वर अनेक आमदार खासदार निवडुन आले.तत्कालीन नेतुत्वाने जसे ३० सप्टेबर १९५६ च्या शेकाफ़े बर्खास्ती आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ़ इंडीया स्थापनेच्या ठरावाला मुठमाती दिली.तशीच ती ह्या प्रशिक्षण केंद्राला सुद्धा दिली गेली.बाबासाहेबांच्या संकल्पनेतील राजकिय प्रशिक्षण विद्यालय त्यांचे हयातीत सुरु होऊन अवघ्या नऊ महिन्यात बंद पडले.बाबासाहेबांच्या दूरदृष्टीने स्थापन झालेले राजकीय प्रशिक्षण केंद्राला संजीवनी देवुन कार्यरत करता आले असते.त्यातून देशाला ख-या अर्थाने लोकशाही बळकट करणारे साधन मिळाले असते.शिवाय राज्यकारभाराला योग्य वळण लावणारे निष्णात, विद्वान, कर्तूत्ववान आमदार, खासदारांचा विधीमंडळ, लोकसभा, राज्यसभेला लाभ झाला असता.सोबतच बाबासाहेबांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्षाला देखील सक्षम नेते आणि कार्यकर्ते मिळाले असते.असे एखादे प्रशिक्षण केंद्र उभे झाले तर रिपब्लिकन चळवळ आणि पक्षाला उज्वल भवितव्य देणारे उमदे तरूण नेते, कार्यकर्ते निर्माण होवु शकतात.असे सातत्याने मांडणी केली जाते.ती उणीव काही अंशी अकोला जिल्हाने भरून काढली आहे.दिग्विजयी नेते डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या ’ शासनकर्ती जमात’ होण्याच्या स्वप्नाला प्रत्यक्षात उतरवित आहे.बाबासाहेबांच्या स्वप्नातील राजकीय प्रशिक्षण केंद्र अकोला जिल्हा बनलाय.अनेक नेते, पदाधिकारी घडविण्याचे कार्य अकोला पॅटर्नच्या माध्यमातून उभे झालेले आपण पाहतोय.ज्यातून सर्वहारा समूहाला सत्तेचा वाटा तर मिळालाच सोबतच सामान्य कार्यकर्ते कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसतांना सत्तेतील मोठया पदावर पोहचु शकले.
अकोला पॅटर्न समजून घेताना आपण अकोला जिल्ह्यातील बाळासाहेब आंबेडकर ह्यांचे राजकीय क्षितिजावरील कारकीर्द सुरु होण्या पूर्वीची अर्थात १९८४ पुर्वीची आंबेडकरी चळवळ व बाळासाहेबांचे आगमना नंतर त्या चळवळीने राज्यात घडविलेला मोठा राजकीय व सामाजिक बदल समजून घेवुया.अकोल्यातील आंबेडकरी चळवळीचे १९५२ ते १९८४ सिंहावलोकन केले असता ह्या काळात आंबेडकरी चळवळ विशेष प्रभावी होती असे दिसते.अकोला जिल्हा चळवळीचा बालेकिल्लाच होता. कलापथके,गीतकार, शाहीर, जलसे, धंडारी,भजनी मंडळानी जागृतीचा वणवा सतत पेटत ठेवला होता.१९४२ साली परमपुज्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे शेडूल्ड कास्ट फेडरेशन स्थापन केले.त्याकाळी व-हाड प्रांतिक शेडूल्ड कास्ट फेडरेशनची पहिली परिषद ९ आणि १० डिसेंबर १९४५ ला अकोलयात संपन्न झाली. डॉ बाबासाहेब आंबेडकर परिषदेचे अध्यक्ष म्हणून अकोल्यात आले होते.शेडूल्ड कास्ट फेडरेशन ने अकोला लोकसभा निवडणूकीत १९५२ साली व बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाना नंतर १९५७ च्या निवडणूकीत दुसऱ्या आणि तिस-या क्रमांकाची मते घेतली होती.अकोला जिल्हा बाबासाहेबांच्या आदेशाचे काटेकोर पालन करणारा जिल्हा आहे. .१९०१ सालच्या जनगणनेत अकोला - वाशीम संयुक्त जिल्ह्यात बौद्ध धर्मीय म्हणून शून्य नोंद होती.१९५६ साली बाबासाहेबांच्या बौद्ध धम्म स्विकाराच्या आवाहना नुसार १००% बौद्ध धम्म स्वीकारणारा जिल्हा अकोलाच आहे.धम्म स्वीकाराच्या नंतर १९६१ च्या जनगणनेत दोन लाख बेचाळीस हजार चारशे चौसष्ट बौद्ध धर्मीयांची संख्या नोंदविण्यात आली होती.एवढी प्रचंड आंबेडकरी निष्ठा असलेला जिल्हा म्हणून अकोल्याचा लौकिक होता.१९५६ साली बोधीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाले.एकूणच आंबेडकरी चळवळीवर त्याचे दुरगामी परिणाम झाले.अकोला जिल्हा देखील त्याला अपवाद राहिला नाही. रिपब्लीकन पक्षाची स्थापना ३ ऑक्टोबर १९५७ झाली.रिपब्लीकन पक्षाच्या प्रेसेडीयमची बैठक देखील अकोल्यात संपन्न झाली होती.१९५७ च्या निवडणूकीत रिपब्लीकन पक्षाला लोकसभेत ५ जागा व विधानसभेत १३ जागांवर विजय मिळाला होता.१९६४ ला पक्ष फुटला त्या मुळे गायकवाड - गवई यांचा एक आणि खोब्रागडे यांचा दुसरा गट निर्माण झाला .गटबाजी मुळे अकोल्यातील कार्यकर्ते देखील विभागले आणि ताकदवान पक्ष कमकुवत बनला. १९७१ आणि १९७७ च्या निवडणूकीत अकोला लोकसभेत कोणत्याही आंबेडकरी गटाचा अधिकृत उमेदवार नव्हता.विधानसभेत मात्र रिपाइं उमेदवारांना दुस-या, तिस-या क्रमांकाची मते मिळत होती. गटबाजी होती मतदार मात्र कायम होता.त्या काळी भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, शेकाफे कार्य जिल्ह्यात मोठ्या गतीने सुरु होते.भय्यासाहेब आंबेडकरांनी देखील पाच वेळा ह्या जिल्ह्याचा दौरा केला होता.अश्या वातावरणात बाळासाहेबांचे अकोल्यात पहिल्यांदा आगमन झाले ते १४ ऑगस्ट १९८० रोजी. अकोल्यातील रेल्वे स्टेशन नजीकच्या सर्किट हाऊस येथे ते उतरले होते. नगर परिषदेत आयोजित बाळासाहेबांचा कार्यक्रम काही कारणास्तव रद्द झाला होता.ही बातमी अकोल्यातील तत्कालीन नेतृत्व दिनबंधू गुरुजी, केरुबुवा गायकवाड ह्यांचे कार्यकर्ते लंकेश्वर गुरुजी, गुणवंतराव पाटील,पी. आर.महाजन,शत्रुघन मुंडे, कृष्णराव मोहोड, यादवराव पाटील ह्यांना समजली.बाबासाहेबांचे नातू सभा न होता परत जाणे ही आपल्या जिल्ह्यासाठी नामुष्कीची बाब आहे, हे हेरून त्या सर्व कार्यकर्त्यानी दुपारी बाळासाहेबांची भेट घेतली. सभेसाठी वेळ देण्याची मागणी केली.साहेबांचा होकार घेऊन रात्री ८ वाजता अकोट फैल येथे सभा ठरविण्यात आली.तत्पूर्वी सायंकाळी सहा वाजता भीम नगर येथे तत्कालीन जुने पुढारी शंकरराव खंडारे ह्यांचे घरी बाळासाहेबाना नेण्यात आले.साक्षात बाबासाहेबांचे नातू भिम नगर मोहोल्यात आल्याने बाळासाहेबांना पहायला तोब्बा गर्दी झाली.प्रत्येकाला ह्या तरण्याबांड आंबेडकरां मध्ये बाबासाहेबच दिसत होते.भारावलेली जनता डोळे भरून हे प्रतिरूप पाहत होते.त्यांच्या पाया पडत होती, त्यांना स्पर्श करत होती, त्यांच्या पायाची माती कपाळावर लावत होती.सर्व आसमंत भारवला होता.ह्या प्रचंड गर्दीत पहिली सभाच भीमनगर मध्ये पार पडली.अर्थात त्या नंतर रात्री ८ वाजताची नियोजित सभा भारतीय बौद्ध वाचनालय अकोट फैल येथे प्रचंड गर्दीत संपन्न झाली.या दोन सभा नंतर बाळासाहेबांशी जुळलेल्या कार्यकर्त्यानी लगेच दोन महिन्यात बाळासाहेबांची सभा ११ ऑक्टोबर १९८० रोजी अकोट येथील खरेदी विक्री संघाच्या पटांगणावर आयोजित केली.त्यालाही प्रचंड प्रतिसाद मिळाला.त्या मुळे वातावरण निर्मिती झाली.भारावलेले कार्यकर्ते संपूर्ण ताकदीने कामाला लागले. त्याकाळी कार्यकर्त्या कडे पैसा, साधने, मोटर वाहने किंवा साधा लाऊडस्पिकरची सोय नव्हती.केवळ चळवळ मोठी झाली पाहिजे ह्या ध्यासाने खेडोपाडी, वस्त्यांमध्ये सायकलवर फिरत कार्यकर्त्यानी अकोला जिल्हा बांधायला सुरुवात केली.अश्या पद्धतीने बाळासाहेब आंबेडकरांना अकोला जिल्ह्याने नेता स्वीकारून कामाला सुरुवात केली. एखाद्या जिल्ह्याने स्वतःचा नेता निवडून एकदिलाने त्यांचे नेतृत्वात काम करायला सुरु करण्याचे हे दुर्मिळ उदाहरण आहे.
अकोला जिल्ह्यास जातीय दंगली व अत्याचाराचा मोठा इतिहास आहे.त्यात प्रामुख्याने मराठा विरुद्ध बौद्ध असा संघर्ष होत असे. त्यात धाकली येथील गवई बंधूचे डोळे काढण्याचे प्रकरण, सुकळी नंदापूर येथील सामाजिक बहिष्कार, मुंडगाव लोहारी, कान्हेरी,देगांव, देऊळगांव, चान्नी चतारी, कोठारी,कळंबा, बोरगाव, पळसो बढे दंगल, मिरवणुकीवर हल्ले अश्या दंगलीच्या नोंदी होत्या.हा रक्तरंजित इतिहास देखील बाळासाहेबां मुळे कायमचा बदलला.त्याकाळी जे समुह एकमेकांशी संघर्ष करीत होते ते पक्ष म्हणून एकत्र आणण्यास यश आल्याने अकोला जिल्ह्यातील दंगली जवळ जवळ हद्दपार करण्यात यश आले. ही अकोल्यातील चळवळीची महत्वाची सामाजिक उपलब्धी आहे.
'अकोला पॅटर्न' नेमका आहे तरी काय ? असा प्रश्न अनेकांना असतो. त्याचे उत्तर सोपे आहे, सर्व वंचित जाती समूहांना एकत्र करून एकमेकाला मते देऊन सत्ता हस्तगत करणे.ही अकोला पॅटर्नची सोपी व्याख्या आहे.बाळासाहेब आंबेडकरांचा 'अकोला पॅटर्न' सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय व्यवस्थेने अनेक वर्षे वंचित ठेवलेल्या जातीसमूहांना संघटित करणारा आहे. ' भीक नको सत्तेची, सत्ता हवी हक्काची, ' हा स्वाभिमानी विचार बहुजन समाजात पेरणी करणारा ठरला."नही भी होगी संख्या भारी फिर भी मिलेगी भागीदारी" हे सूत्र बाळासाहेब आंबेडकरांनी पुढे आणलं.त्यातून बहुजनांमध्ये ठाम विश्वास निर्माण केला. लोकशाही व्यवस्थेत सत्तेमध्ये सर्व समाज घटकांना योग्य न्याय मिळावा, सत्तेचा लाभ सर्व समाज घटकांना व्हावा. त्यातून सामाजिक न्याय,सत्तेचे सार्वत्रीकरणाची बांधणी सुरु झाली.निर्णायक सत्तेचे स्वरूप बहुजनांना अनुकूल व्हावे आणि समाजातील अन्याय व विषमतेचा प्रतिकार करणे शक्य व्हावे, हा मुद्दा बाळासाहेबांनी प्रभावीपणे मांडला.बौद्ध समाजाची एकगठ्ठा मते अल्पमतात असलेल्या समूहाला देणे आणि त्याच बरोबर बौद्ध समूहाला इतर सर्व बहुजन समाजाची मते ट्रान्सफर होणे हा राजकीय चमत्कार घडविला.त्यातून प्रस्थापित, घराणेशाही कडून राजकीय सत्ता हिसकावून बहुजन वर्गाकडे आणता येते, हे महाराष्ट्राच्या राजकारणात बाळासाहेब आंबेडकर यांनी 'अकोला पॅटर्न'च्या माध्यमातून दाखवून दिले आहे.
बाळासाहे बांनी १९८४ साली आपल्या राजकीय जीवनाला प्रारंभ केला.त्याआधी ते भारतीय बौद्ध महासभा व सम्यक समाज आंदोलन मार्फत सामाजिक कार्यात अग्रेसर होते.त्याला आता ३६ वर्षे पूर्ण झाली आहेत. १९८४ मध्ये तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांची हत्या झाल्याने ८४च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला देशपातळीवर व राज्यपातळीवर सहानुभूती होती. इंदिरा गांधींच्या हत्येच्या सहानुभूतीने काँग्रेसविरोधातील अनेक दिग्गज पराभूत झाले होते. याच ८४च्या लोकसभा निवडणुकीत बाळासाहेब आंबेडकर यांनी ईशान्य मुंबई व अकोला या दोन लोकसभा मतदारसंघांतून निवडणूक लढविली होती. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात साहेबांना ४९ हजार ७५८ मते मिळाली होती, तर अकोला लोकसभेत मधूसुदन वैराळे यांच्या विरोधात निवडणूक लढवून १,६५,६६४ मते मिळवली होती .वैराळे यांना १,७८,८७४ मते मिळाल्याने १३,२१० इतक्या अल्प मतांनी वैराळे विजयी झाले होते.अकोला मतदारसंघात अत्यंत कमी मतांनी पराभूत झाल्याने ह्या मतदार संघातील स्पार्क त्यांनी ओळखला आणि अकोला ह्या खुल्या लोकसभा मतदार संघाची आगामी राजकारणासाठी निवड केली.
दरम्यान १९८७ साली नांदेड लोकसभेची पोटनिवडणुक लागली.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवाजी पाटील निलंगेकर मुलीच्या गुणवाढ प्रकरणात पदावरून पायउतार झाले होते. त्या वेळी शंकरराव चव्हाण यांची मुख्यमंत्री म्हणून वर्णी लागली.शंकरराव चव्हाण यांच्या खासदारकीच्या राजीनाम्याने ८७ मध्ये नांदेडची पोटनिवडणुक जाहीर झाली होती.कॉंग्रेस कडून अशोक चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली होती.तर भारिपच्या वतीने बाळासाहेब उभे होते.नांदेड पोटनिवडणुकीत बाळासाहेबांच्या प्रचाराला जॉर्ज फर्नांडिस आले होते .या निवडणूकीत सात उमेदवार उभे होते. परंतु खरी लढत झाली ती अशोक चव्हाण आणि बाळासाहेब यांच्यात. अशोक चव्हाण यांना २,८३,०१९ तर बाळासाहेबांना १,७१,००१ इतकी मते मिळाली. ह्या संघर्षमय लढतीत बाळासाहेबांचा पराभव झाला. प्रचाराची साधने,पैसा,राजकीय पाठबळ नसताना मुख्यमंत्र्याचे मुलाच्या विरोधात पावणेदोन लाख मते घेणे हा मोठा राजकीय चमत्कार होता. मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी अनेक मतपेट्या वाजंरा नदीच्या पात्रात बुडविल्या होत्या, असे आजही नांदेड मध्ये जुने कार्यकर्ते बोलतात.
बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली १९८९ मध्ये लोकसभा निवडणुकीत भारिपला ६ लाख २ हजार १७४ मते मिळाली होती. यात अकोला लोकसभा मतदारसंघात साहेबांना ३ लाख ३२ हजार २४२ मते मिळाली होती. उर्वरित मतदान इतर लोकसभा मतदारसंघांत झाले होते.आताच्या शिवसेना नेत्या डॉ. नीलम गो-हे यांनी भारिपच्या वतीने ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती.त्यांना १ लाख ९ हजार २५३ मते मिळाली होती. प्रत्येक निवडणूकीत भारीपच्या मतांमध्ये वाढ होत होती.
१९९० साली बाळासाहेब राज्यसभेवर खासदार होते. त्याकाळी भारिप हा पक्ष स्वतंत्र होता.१५ फेब्रुवारी १९९३ रोजी बहुजन महासंघाची स्थापना झाली होती.अकोला पॅटर्न चा पहिला प्रयोग यशस्वी झाला तो फेब्रुवारी १९९२ साली.भारतीय रिपब्लीकन पक्ष आणि बहुजन समाज महासंघाच्या वतीने संयुक्तपणे लढविण्यात आली होती.अकोला जिल्हा परिषद वर १९६२ पासून प्रस्थापित काँग्रेसचे बडे नेते व त्यांचे नातेवाईकांची मक्तेदारी होती.त्याकाळात काँग्रेसच्या नेत्यांच्या किंवा त्यांनी नेमलेल्या प्रशासका मार्फत जिल्हा परिषद चालवली जात होती.विशिष्ठ घराणे सोडले तर इतर कुणाला ह्या सत्तास्थानां मध्ये शिरकाव नव्हता.राखीव जागेवर देखील कामावरचे घरगडी किंवा सालदार निवडून आणून सत्ता ताब्यात ठेवली जाई, त्याला कुणाचाही निर्बंध नव्हता.
अकोल्यात धोत्रे, कोरपे, भुईभार, सपकाळ व धाबेकर ही त्या काळची प्रस्थापित घराणी.एकमेकांचे नातेवाईक असलेल्या ह्या कुटुंबांनी जिल्ह्यातील सर्व सत्ता आपापल्या कुटुंबात वाटून घेतली होती.घराणेशाही आणि मक्तेदारीच्या ह्या सत्तेला पहिला सुरुंग लागला १९९२ सालच्या निवडणुकीत. 'अकोला पॅटर्न' ने जिल्हा परिषद निवडणुकीत हादरा दिला.भारतीय रिपब्लीकन पक्ष आणि बहुजन समाज महासंघाचे ६० पैकी १५ उमेदवार जिल्हा परिषदेत विजयी झाले.२० उमेदवार १०० ते २०० मतांनी पराभूत झाले होते.ह्या निवडणुकीत भाजप सेनेचे सर्व उमेदवार पराभूत झाले होते, त्यापैकी अनेकांच्या अनामत रकमा देखील जप्त झाल्या होत्या. दोन माजी आमदारांना निवडणुकीत आस्मान दाखविण्यात आले होते. एक आमदार भारतीय रिपब्लीकन पक्ष आणि बहुजन समाज महासंघाच्या आदिवासी उमेद्वारा विरोधात राजकीय बनाव करून विजयी झाले होते.अकोला जिल्हा काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष भारतीय रिपब्लीकन पक्ष आणि बहुजन समाज महासंघाच्या मुसलीम उमेद्वारांमुळे तिस-या क्रमांकावर फेकले गेले होते.अनेक करोडोपती उमेदवारां विरोधात शेतकरी, कष्टकरी, मजूर उमेदवार असताना देखील कोट्याधीश उमेदवारांना दारुण पराभव स्विकारावा लागला होता.
अकोला जिल्ह्याच्या १३ पंचायत समितीच्या निवडणुकीत फेब्रुवारी १९९२ मध्ये १२० उमेद्वारां पैकी ३० उमेदवार भारतीय रिपब्लीकन पक्ष आणि बहुजन समाज महासंघाचे निवडून आले होते.४८ उमेदवार अत्यल्प मतांनी पराभूत झाले होते. अकोला व बार्शीटाकळी ह्या दोन अत्यंत प्रतिष्ठेच्या पंचायत समित्या धनदांडग्याच्या व कुटुंबशाहीतील प्रस्थापिता कडून हिसकावून घेण्यात आल्या.बार्शीटाकळी पंचायत समितीत बौद्ध तर अकोला पंचायत समिती मध्ये धनगर समाजाचे सभापती विजयी झाले.मूर्तिजापूर पंचायत समितीत टाकोनकर समाजाचे बबन डाबेराव हे पक्षाचे सहकार्याने सभापती झाले तर दर्यापूर पंचायत समिती मध्ये कोळी समाजाचे वासुदेवराव खेडकर सभापती झाले.बाळापूर व कारंजा पंचायत समिती मध्ये एक एक सदस्य कमी पडल्याने पक्षाला सभापती पदाने हुलकावणी दिली.विशेष म्हणजे अकोला जिल्हा परिषदेत निवडून आलेल्या १५ पैकी ५ सदस्य हे त्यांच्या तालुक्याचे बाहेर निवडणूक लढून विजयी झाले होते.त्यापैकी चारजण बौद्ध होते आणि ते खुल्या प्रवर्गातून निवडून आले होते.हा 'अकोला पॅटर्न'चा उदय होता.
बाळासाहेब आंबेडकर यांचा अकोला पॅटर्न हा एवढा जबरदस्त ठरला कि पुढे अगदी स्थानिक स्वराज्य संस्थेपासून ते विधानसभा, लोकसभेपर्यंत आपले अस्तित्व निर्माण केले.बहुजन सत्तेच्या अकोला पॅटर्न अनेक दालने काबीज केली. २१ मार्च १९९३ साली शेगांव येथील राज्यस्तरीय अधिवेशनात भारिप व बहुजन महासंघ विलीन झाला.१९९३ मध्ये नांदेड मधील किनवट येथून पोटनिवडणुकीत आदिवासी समाजातील भिमराव केराम यांना विधानसभेत आमदार म्हणून निवडून आणले. १९९५ मध्ये विधानसभेच्या निवडणुकीत मखराम पवार आमदार म्हणून निवडून आले तसेच इतर उमेदवारांना लक्षणीय मते मिळाली होती. १९९८ आणि १९९९ मध्ये लोकसभेत बाळासाहेब आंबेडकर खासदार म्हणून संसदेत गेले. १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब यांचे तीन आमदार निवडून आले.याच काळात कॉंग्रेसच्या सरकार मध्ये भारिप बहुजन महासंघाला दोन कॅबिनेट व एक राज्यमंत्री पद होते.२००४, २००९ आणि २०१४ मध्ये भारिप बहुजन महासंघाचे आमदार निवडून आले.२०१२ साली अकोल्याचे महापौर पदावर बौद्ध समाजाची महिला विजयी झाली.अनेक पंचायत समित्यावर सत्ता आली.त्यात भारतीय बौद्ध महासभेच्या आयोजनातील अकोल्यातील धम्मचक्रप्रवर्तन दिन सोहळा आणि भव्य मिरवणुकीचा देखील मोठा वाटा आहे.
१९९२ च्या पहिल्याच दणक्याने अकोला जिल्हा परिषदेत प्रस्थापित, धनदांडगे व कुटुंबशाहीच्या पाट्या पुसण्यात यश आले.सर्वसामान्य आणि वंचित बहुजन समाजाला पहिल्यादा स्थानिक स्वराज्य संस्थेत प्रवेश मिळाला.पुढे भारिप बहुजन महासंघाचे कोळी,माळी,बौद्ध,तेली, मुस्लिम, कुणबी व बौद्ध हे जिल्हा परिषद अध्यक्ष बनलेत.विशेष म्हणजे राज्य मंत्री दर्जा असलेल्या जिल्हा परिषद अध्यक्षपद खुल्या प्रवर्गाकरिता राखीव असताना पुष्पाताई इंगळे आणि प्रतिभाताई भोजने ह्या जिल्हा परिषद अध्यक्षा बनल्या आहेत.ही किमया अकोला जिल्हा परिषद सोडली तर संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही पहायला मिळत नाही.राखीव जागा असल्या शिवाय बौद्ध पदाधिकारी होऊ शकत नाही, महिला तर अजिबातच होऊ शकत नाही असा जणू अलिखित नियमच ! तो नियम देखील भारिप बहुजन महासंघाने अकोल्यात मोडून काढला.खुल्या प्रवर्गात दोनवेळा बौद्ध महिला जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून निवडून आणल्या. सामान्य गृहिणी आणि सर्वसामान्य कुटुंबातील वंचित, दुर्लक्षित घटकांना आपली नावे जिल्हा पातळीवर कोरण्यात यश प्राप्त झाले आहे. बाळासाहेब आंबेडकर यांनी सर्व जाती-धर्मांतील लोकांना एकत्र केले.अनेक वर्षे सत्तेपासून वंचित राहिलेल्या छोट्या-मोठय़ा समूहाचे सरपंच, सभापती व जिल्हा परिषद अध्यक्ष,महापौर, आमदार,मंत्री हे केवळ बाळासाहेब आंबेडकर व अकोला पॅटर्नमुळेच बनू शकले.
अकोला पॅटर्नमध्ये वेगवेगळ्य़ा जाती-धर्माचे नेते सत्तेतून मोठे झाले.काहीनी अति महत्त्वाकांक्षेसाठी पक्ष सोडला.इतर पक्षात मध्ये गेलेले हे नेते राजकीयदृष्ट्या संपलेत.आज हे नेते कुठे आहेत? त्याचा शोध घ्यावा लागतो.अकोल्यात पक्षाची राजकीय ताकद कायम आहे.
असाच राजकीय पक्ष बाबासाहेबांना अपेक्षित होता. ज्यात सर्व जाती समूहाचा सहभाग असेल आणि त्याची मार्गदर्शक तत्वे ही स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव असतील.त्याचाच अंगीकार भारिप बहुजन महासंघ - वंचित बहुजन आघाडीने केला आहे. १ जानेवारी २०१९ रोजी स्थापन झालेल्या आणि २४ मार्च २०१९ रोजी निवडणूक आयोगा कडे नोंदणी झालेल्या वंचित बहुजन आघाडीने तर भारतीय घटनेचा सरनामा हाच पक्षाचा जाहीरनामा घोषित केला आहे.
अकोल्यातील कार्यकर्ते हे ग्राम पंचायत, नगर पालिका, कृषी उत्पन्न बाजार समित्या, खरेदी विक्री अश्या सर्व निवडणुका लढतात. त्यातून जिल्हा परिषद, महापालिका, विधानसभा उमेदवार म्हणून पुढं येतात. किंवा पक्षाने दिलेला उमेदवार निवडून आणायला आपले कसब पणाला लावतात.पक्षासाठी जीवाचे रान करतात.भारिप बहुजन महासंघ - वंचित बहुजन आघाडीने असे हजारो जनप्रतिनिधी घडविले आहेत.बाबासाहेबांना असेच प्रशिक्षित नेते आणि कार्यकर्ते घडवायचे होते. आणि म्हणूनच अकोला पॅटर्न हे बाबासाहेबांच्या स्वप्नातील राजकीय प्रशिक्षण महाविद्यालय बनले आहे.
लेखक
राजेंद्र पातोडे
प्रदेश प्रवक्ता,
वंचित बहुजन आघाडी.
9422160101
-------///--------/-//////--------/////-----////
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा