मंदिर, चर्च, मशीद, गुरुद्वारा धार्मिक स्थळांमध्ये भाविकांचे एकत्रिकरण टाळावे

मंदिर, चर्च, मशीद, गुरुद्वारा धार्मिक स्थळांमध्ये भाविकांचे एकत्रिकरण टाळावे
भाविकांना घरबसल्या दर्शनाची सुविधा
अकोला: कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी जिल्ह्यातील विविध भागात प्रार्थनास्थळांमध्ये धार्मिक कार्यक्रम, प्रार्थना, दर्शन आदींसाठी लोकांचे एकत्रिकरण टाळणे हे सर्वांच्या हिताचे असेल, त्यामुळे हे एकत्रिकरण टाळावे व तसे लोकांना आवाहन  मंदिर ट्रस्टी, धर्मगुरु, मौलवी यांनी आपल्यास्तरावरुन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज  बुधवार 18 मार्च रोजी केले.
येथील लोकशाही सभागृहात अकोला शहरातील विविध मंदिर,मशिद, गुरुद्वारा, चर्च, जैन मंदिरांचे प्रमुख पुजारी, गुरु, ट्रस्टी, धर्मगुरु,मौलवींची आज बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीस प्रशासनाच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, प्रांताधिकारी  निलेश अपार,   उपजिल्हाधिकारी रोहयो बाबासाहेब गाढवे,तहसिलदार विजय लोखंडे   आदी उपस्थित होते.
प्रथम दुपारी मौलवींची बैठक झाली, त्यास मौलवी मकसूद खान,  मुफ्ती गुफार गाजी, एम.ए. राशिद,  मुफ्ती अशफाक, हाजी मेहमूद खान, इसराईल खान, मोह अफसर अली,  मोह एजाज आदी उपस्थित होते. त्यानंतर  झालेल्या बैठकीस दिगंबर जैन मंदिरचे संदीप उनवणे, रविंद्र उन्होने, संजय यवळणकर, रविंद्र डोंगरे, प्रदीप गडेकर, महेंद्र खेतान, सतिष गोएन्का, प्रमोद अग्रवाल,समिप इदाते तसेच चर्च, गुरुद्वारा, राज राजेश्वर मंदिर, राणी सतिदेवी मंदिर,  तसेच शहरातील विविध मंदिरांचे विश्वस्त उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी  उपस्थितांना सांगितले की, कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंध करण्यासाठी लोकांचे कोणत्याही कारणाने होणारे एकत्रिकरण टाळणे हा उत्तम उपाय आहे. त्यादृष्टीने प्रार्थना, धार्मिक कार्यक्रमानिमित्त प्रार्थनास्थळांमध्ये नागरिकांचे बहुसंख्येने होणारे एकत्रिकरण टाळावे, या संदर्भात सर्व मंदिर, मशिद, गुरुद्वारा, चर्च वा अन्य कोणत्याही धार्मिक स्थळाच्या विश्वस्तांनी  निर्णय घेऊन लोकांना आवाहन करावे. त्याद्वारे आपण आपले शहर आणि शहरातील नागरिक सुरक्षित ठेवू शकू, असा विश्वासही जिल्हाधिकारी पापळकर यांनी व्यक्त केला. निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी प्रास्ताविक व आभार प्रदर्शन केले. यावेळी आलेल्या प्रतिनिधींनी आपले म्हणणेही व्यक्त केले.
लाईव्ह स्ट्रिमिंगचा पर्याय स्विकारणार
मंदिर वा अन्य प्रार्थनास्थळांमध्ये भाविकांची गर्दी टाळण्यासाठी लाईव्ह स्ट्रिमिंगद्वारे दर्शन सुविधा देण्याचा पर्याय यावेळी समोर आला. ॲलायन्स चर्चचे डॉ. पी.डी. इंगळे, आशिष बिजोरीकर  यांनी यावेळी सांगितले की त्यांच्या इस्टर पर्यंतच्या नियोजित प्रार्थनांचे लाईव्ह स्ट्रिमिंग चा पर्याय स्विकारुन  त्याद्वारे लोकांना प्रार्थनेत सहभागी करुन घेणार आहेत. याच प्रमाणे अन्य मंदिर व प्रार्थना स्थळांनीही या पर्यायाबाबत सकारात्मकता दर्शविली.
आज कुणीही दाखल नाही
दरम्यान आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत जिल्ह्यात एकही संशयित रुग्ण आढळून आला नाही. अथवा विदेशातून कोणीही आले नाहीत. कालपर्यंत विदेशातून आलेल्या एकूण ४६  प्रवाशांपैकी ४३ जणांचा संपर्क करण्यात आला होता. ३५ जण गृह विलगीकरण (होम क्वारंटाईन) आहेत. तसेच उर्वरित प्रवाशांपैकी चौघे हे अमरावती येथे आहेत.  दोन प्रवासी नागपूर येथे आहे  ते अद्याप अकोला जिल्ह्यात आलेले नाहीत तर अन्य दोघे हे पुन्हा दुबई येथे परत निघून गेले. तर उर्वरित तिघांशी संपर्क सुरु आहे.
‘त्या’ तिघांनी वा त्यांच्या नातेवाईकांनी तात्काळ संपर्क करावा
विदेशातून आलेल्या ४६ पैकी ४३ जणांचा तपास झाला आहे. मात्र तिघांचा अद्याप तपास लागलेला नाही. या तिघांनी वा त्यांच्या नातेवाईकांनी तात्काळ जिल्हा प्रशासनाशी वा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
बाहेरगावाहून येणाऱ्यांनी काळजी घ्यावी
जिल्ह्यात बाहेरगावाहून उदा. मुंबई, पुणे इ. ठिकाणाहून आलेल्या व्यक्तिंनी आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी. तब्येतीत थोडेही बदल झाल्यास तात्काळ जिल्हा रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संपर्क साधावा व डॉक्टरांकडून तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
बसस्थानकांवर प्रवाशांसाठी सॅनिटायझर्स उपलब्ध
 दरम्यान बसस्थानकांवर येणाऱ्या व जाणाऱ्या प्रवाशांना हात धुण्यासाठी सॅनिटायझर्स उपलब्ध करण्यात आले होते. प्रवासी बस मध्ये बसण्याआधी व उतरल्यावर हात धुतांना दिसत होते.
मनोरंजन केंद्र बंद ठेवण्याचे निर्देश
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी साथरोग अधिनियम १८९७ मधील खंड २,३ व ४ मधील तरतूदीनुसार करोना विषाणूचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायोजनेचा एक भाग म्हणून अकोला जिल्ह्यातील मनोरंजन केंद्र जसे व्हिडीओ सेंटर, व्हिडीओ पार्लर,  पुल गेम,  व्हिडीओ सिनेमा आदी पुढील आदेश होईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेशआज जारी केले आहेत. या आदेशाचा भंग केल्यास भारतीय दंड संहिता, (१८६० चा ४५ ) च्या कलम १८८ अन्वये कारवाई करण्यात येईल,असा इशाराही दिला आहे.

टिप्पण्या