- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
दिनविशेष
छत्रपती शिवरायांच्या माध्यमातुन निर्माण झालेल्या छत्रपतीपदाने खऱ्या अर्थाने इथल्या रयतेला स्थैर्य दिले. आपले राज्य, आपली व्यवस्था ज्यामध्ये एका अभिषिक्त राजाच्या छत्रछायेखाली आपल्याला सर्व प्रकारच्या न्याय, सुरक्षितता आणि कल्याणाची हमी मिळु शकेल हा विश्वास इथल्या रयतेच्या मनात छत्रपती पदामुळे निर्माण झाला.
ते केवळ पद राहिले नाही, तर लोकांच्या जगण्याचा आधार बनले. जुलमी व्यवस्था संपुन लोककल्याणकारी व्यवस्था अंमलात आल्याचे ते प्रतीक होते.
छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ऐतिहासिक महत्व.
थोरल्या महाराजांच्या अकाली जाण्याने लोकांचा आधार हरवला. परत एकदा जुलमी व्यवस्थेचे सावट येऊन आपण पारतंत्र्यात जातो की काय अशी भीती रयतेच्या मनात निर्माण झाली. मात्र शंभुराजांनी १६ जानेवारी १६८१ या दिवशी आपला राज्याभिषेक करुन घेतला. खचलेल्या रयतेला आधार दिला. थोरल्या महाराजांच्या काळातील व्यवस्था पुढेही कायम राहील याची हमी दिली.
खऱ्या अर्थाने शंभुराजांनी लोकांना परत एकदा उभे केले. त्यांच्यात इतका स्वाभिमान भरला की शंभुराजांच्या जाण्यानंतरही इथली रयत त्या स्वाभिमानावर अविरत झुंजत राहिली. औरंगजेबासारख्या बलाढ्य बादशहाला त्यांनी इथल्याच मातीत संपवले.
श्रीशंभुराज्याभिषेक सोहळा
थोरल्या महाराजांच्या मृत्युनंतरच्या अस्थिर वातावरणात झालेल्या मंचकरोहणात शंभुराजे व त्यांच्या सहकारी मंत्र्याधिकाऱ्यांना त्यातुन तितके समाधान व शास्त्रार्थाच्या दृष्टीने निर्दोषत्व वाटले नाही. त्यामुळे शंभुराजांवर विधियुक्त राज्याभिषेक करवुन राजसिंहासानाची प्रतिष्ठा राखावी असा विचार झाला. त्यानुसार शंभुराजांनी आपला राज्याभिषेक करण्याचा निर्णय घेतला.
१४, १५ व १६ जानेवारी १६८१ (रौद्रनाम संवत्सरातील माघ शुद्ध ७, शके १६०२) यादिवशी शंभुराजांचा विधियुक्त राज्याभिषेक झाला व ते स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले.
राज्याभिषेक प्रसंगी पुर्वीच्या कैद्यांना मुक्त करण्याचा रिवाज असल्याने शंभुराजांनी कैद्यांना मुक्त केले. प्रधान मंडळातील अण्णाजी दत्तो, निळोपंत, बाळाजी आवजी, जनार्धनपंत आदींच्या समावेशाने प्रधान मंडळ नेमुन त्यांना कारभार सांगितला गेला.
संभाजी राजांच्या प्रधान मंडळाची रचना
सिंहासनाधीश्वर श्रीमंत छत्रपती – संभाजीराजे शिवाजीराजे भोसले (सेनाधीशांचे सेनाधीश – सर्वोच्च अधिकार असलेले )
श्री सखी राज्ञी जयति – छत्रपती येसुबाई संभाजीराजे भोसले (संभाजीराजांच्या गैरहजेरीत राजव्यवस्थेच्या कारभारी)
सरसेनापती – हंबीरराव मोहिते
कुलएख्तीयार (सर्वोच्च प्रधान) – कवी कलश
पेशवे – निळो मोरेश्वर पिंगळे
मुख्य न्यायाधीश – प्रल्हाद निराजी
दानाध्यक्ष – मोरेश्वर पंडितराव
चिटणीस – बाळाजी आवजी
सुरनीस – आबाजी सोनदेव
डबीर – जनार्दनपंत
मुजुमदार – अण्णाजी दत्तो
वाकेनवीस – दत्ताजीपंत
छत्रपती संभाजी महाराजांची नाणी
शिवरायांप्रमाणेच शंभुराजांनीही आपल्या राज्याभिषेक प्रसंगी स्वतःच्या नावे नाणी पाडली. सदर नाण्याच्या पुढच्या बाजुवर “श्री राजा शंभूछत्रपती” ही अक्षरे कोरलेली असुन मागच्या बाजुवर “छत्रपती” हे अक्षर कोरलेले आहे.
राज्याभिषेकानंतर शंभुराजांची कर्तबगारी
आपला राज्याभिषेक झाल्यानंतर शंभुराजांनी लगेच १५ व्या दिवशी बुऱ्हाणपुरवर छापा टाकला आणि १ करोड होनांची दौलत स्वराज्यात आणली. त्यानंतर त्यांनी मोगल, इंग्रज, पोर्तुगीज आणि सिद्दी या शत्रुंना नामोहरम करीत पुढील केवळ आठच वर्षात शिवरायांनी उभारलेले स्वराज्य दुप्पट केले. सैन्यही दुपटीपेक्षा अधिक वाढविले. स्वराज्याच्या खजिन्यात तिपटीपेक्षा अधिक वाढ केली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा