gorakshan-road-accident-akl: अकोल्यात भीषण अपघात! अज्ञात वाहनाच्या धडकेत सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू
भारतीय अलंकार न्यूज 24
अकोला | नीलिमा शिंगणे जगड
अकोला शहरात अज्ञात वाहनाच्या धडकेत एका सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अरुण मेतकर असे मृत सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून, ते खदान पोलीस ठाण्यात कार्यरत होते. नेहमीप्रमाणे सकाळी फिरण्यासाठी घराबाहेर पडलेल्या मेतकर यांना गोरक्षण मार्गावरील इनकम टॅक्स चौकाजवळ अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी अरुण मेतकर हे दररोजच्या दिनक्रमानुसार आज मॉर्निंग वॉकसाठी निघाले होते. गोरक्षण मार्गावरील इनकम टॅक्स चौकाजवळ ते आले असताना भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता एवढी होती की, या अपघातात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
अपघात घडल्यानंतर संबंधित वाहनचालकाने माणुसकीला काळिमा फासत घटनास्थळी न थांबता वाहनासह पलायन केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविला.
दरम्यान, अपघातानंतर फरार झालेल्या अज्ञात वाहनचालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. अपघातस्थळ तसेच परिसरातील मार्गांवर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात असून, त्याआधारे वाहन आणि चालकाची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दररोजच्या मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या एका सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा अशा प्रकारे अपघाती मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहनचालकाचा शोध घेऊन त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
ठळक मुद्दे
* सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी अरुण मेतकर यांचा अपघातात मृत्यू.
* खदान पोलीस ठाण्यात होते कार्यरत.
* गोरक्षण मार्गावरील इनकम टॅक्स चौकाजवळ घटना.
* मॉर्निंग वॉकसाठी गेले असताना अज्ञात वाहनाची धडक.
* अपघातानंतर वाहनचालक वाहनासह फरार.
* सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरू.
भारतीय अलंकार न्यूज 24 (BAnews24)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा