भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: चालत्या गाडीतून उतरण्याच्या नादात तोल जाऊन गाडीखाली ओढल्या जाणाऱ्या २४ वर्षीय प्रवाशाला अकोला रेल्वे पोलिसांनी प्रसंगावधान राखत सुखरूप वाचविल्याची घटना समोर आली आहे. रात्री सुमारे ९.३० वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर घडलेल्या या घटनेत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश नागरे यांनी तत्काळ धाव घेऊन तरुणाचा जीव वाचविला.
नागपूरहून मुंबईकडे जाणारी गाडी क्र. १२१०६ विदर्भ एक्सप्रेस प्लॅटफॉर्मवर येत असताना भानू प्रसाद अंगत प्रसाद लोधी वय २४, मजूर, रा. चारगाव, ता. भिमरखेडा, जि. कटनी, मध्य प्रदेश याने गाडीचा वेग पूर्ण कमी होण्यापूर्वीच विरुद्ध दिशेने प्लॅटफॉर्मवर उडी मारली. हातात बॅगा आणि व्हिडिओ कॉलवर संभाषण सुरू असल्याने त्याचा तोल गेला आणि तो प्लॅटफॉर्म व फुटबोर्डमधील अरुंद फटीत अडकला.
ही घटना दिसताच राजेश नागरे यांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेऊन तरुणाला गाडीखालून बाहेर ओढले. यावेळी महिला हवालदार दुर्गा रामटेके व पोलीस शिपाई भूषण हेही प्लॅटफॉर्मवर कर्तव्यावर उपस्थित होते.
लातूरला जाण्याची घाई नडली
चौकशीत तरुणाने सांगितले की, तो नागपूरहून विदर्भ एक्सप्रेसने अकोल्यात आला होता. प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर उभ्या असलेल्या काकीनाडा–कर्नूल टाऊन एक्सप्रेसने त्याला लातूरला जायचे होते. गाडी सुटण्याची वेळ जवळ आल्याने घाईत त्याने हे धाडस केले.
गाडी पुन्हा मिळेल, जीव नाही
“प्रवाशांनी चालत्या गाडीतून उतरणे किंवा चढणे टाळावे. घाईपेक्षा सुरक्षितता महत्त्वाची आहे. गाडी पुन्हा मिळू शकते, पण गेलेला जीव परत मिळत नाही. अकोला रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे एका तरुणाचा जीव वाचला, ही अभिमानाची बाब आहे.”
- अमोल दोंड, पोलीस निरीक्षक, रेल्वे पोलीस स्टेशन, अकोला
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा