सराईत आरोपी असल्याचा पोलिसांचा दावा; बचाव पक्षाने पोलिसांची कारवाई व तपास प्रक्रियेवर उपस्थित केले प्रश्न
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
वाशिम : तब्बल ३८.३०४ किलो गांजा बाळगून विक्री केल्याच्या आरोपावरून २१ मे २०२६ पासून वाशिम जिल्हा कारागृहात बंदिस्त असलेल्या (सराईत गुन्हेगार) शेख राजिक शेख मोहम्मद (रा. सेलू बाजार, ता. मंगरुळपीर) याला मंगरुळपीर येथील सत्र न्यायालयाने गुरुवार ८, ऑक्टोबर रोजी एक लाख रुपयांच्या जामीनावर सोडण्याचा आदेश दिला.
या प्रकरणात न्यायालयामध्ये आरोपीच्या वतीने ज्येष्ठ फौजदारी वकील ॲड. नजीब शेख यांनी बाजू मांडली.
माहितीच्या आधारे पोलिसांची कारवाई
प्राप्त माहितीनुसार, वाशिम स्थानिक गुन्हे शाखेत सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले योगेश रामदास धोत्रे यांना माहितीदारामार्फत शेख राजिक हा मंगरुळपीर येथील मंगलधाम हुडको परिसरात सुखदेव फुलारे यांच्या घरी भाड्याने राहत असून, तो गांजा बाळगून विक्री करीत असल्याची माहिती मिळाली.
या माहितीची स्टेशन डायरीमध्ये नोंद करण्यात आली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक, वाशिम यांना माहिती देऊन आवश्यक परवानगी घेण्यात आली. सरकारी पंच व वजन काट्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले.
पोलिसांच्या कारवाईदरम्यान शेख राजिक हा घटनास्थळी आढळून आला. त्याच्याकडून ३८.३०४ किलो गांजा जप्त करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल
सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश धोत्रे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंगरुळपीर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ०४०७/२०२६ दाखल करण्यात आला. आरोपीविरुद्ध NDPS कायद्यातील कलम ८(c) व २०(b)(ii)(C) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.
पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आणि त्यानंतर तो वाशिम जिल्हा कारागृहात बंदिस्त होता.
बचाव पक्षाचा पोलिसांच्या कारवाईवर आक्षेप
दरम्यान, आरोपी शेख राजिक याने सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला. त्याच्या वतीने युक्तिवाद करताना ॲड. नजीब शेख यांनी पोलिसांची कारवाई कायदेशीर प्रक्रियेनुसार झालेली नसल्याचा दावा केला.
तसेच, अंतिम अहवालातील बाबींचा संदर्भ देत तपास यंत्रणेने आवश्यक प्रक्रिया योग्य पद्धतीने पार पाडली नसल्याने आरोपी जामिनास पात्र असल्याचा युक्तिवाद बचाव पक्षाने केला.
पोलिसांचा जामिनाला जोरदार विरोध
दरम्यान, सरकारी पक्षाने जामीन अर्जाला जोरदार विरोध केला. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वी दोन वेळा अमली पदार्थ बाळगल्याच्या आरोपावरून त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती, असा दावा पोलिसांच्या बाजूने करण्यात आला.
तसेच, यापूर्वीच्या न्यायालयीन आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोपही करण्यात आला. आरोपीला जामीन मिळाल्यास तो पुन्हा अशाच प्रकारच्या गुन्ह्यात सहभागी होण्याची शक्यता असल्याचे सांगत पोलिसांनी जामीन नाकारण्याची मागणी केली.
न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून दिला जामीन
सत्र न्यायालयाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर आरोपी शेख राजिक शेख मोहम्मद याला एक लाख रुपयांच्या जामीनावर सोडण्याचा आदेश पारित केला.
या प्रकरणात आरोपीच्या वतीने ॲड. नजीब शेख यांनी युक्तिवाद केला. त्यांना ॲड. सोहराबोद्दीन आणि ॲड. शिबा मलिक यांनी सहकार्य केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा