shivani-murder-case-midc-akl: शिवणी खून प्रकरणात एलसीबीची धडाकेबाज कारवाई; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना घेतले ताब्यात
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : शिवणी परिसरात जुन्या वादातून झालेल्या मारहाणीत २२ वर्षीय युवकाचा धारदार चाकूने वार करून खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. या प्रकरणात अकोला स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि एमआयडीसी पोलिसांनी संयुक्तपणे धडाकेबाज कारवाई करत फरार होण्याच्या तयारीत असलेल्या तीन आरोपींना अवघ्या दोन तासांत ताब्यात घेतले.
दिनांक २९ सप्टेंबर २०२६ रोजी किसान नगर, शिवणी येथील उजेफखान नझीरखान (वय २०) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, क्रांतीनगर, शिवणी येथे राहणाऱ्या काही व्यक्तींनी जुन्या वादाच्या कारणावरून त्यांच्यासह त्यांच्या भावासोबत वाद घालत मारहाण केली. याचवेळी त्यांचा मामेभाऊ सैय्यद फैजान सैय्यद रफीक (वय २२, रा. किसान नगर, शिवणी) याच्यावर धारदार चाकूने वार करण्यात आले.
गंभीर जखमी झालेल्या फैजान याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सात पथके रवाना
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर तसेच एमआयडीसी पोलिस ठाण्याचे ठाणेदार सपोनि विजय जाधव यांना आरोपींना तातडीने अटक करण्याचे आदेश दिले.
यानंतर पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांनी सहकारी अधिकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन आरोपींबाबत माहिती संकलित केली. आरोपींच्या शोधासाठी एलसीबीची पाच आणि एमआयडीसी पोलिसांची दोन अशी एकूण सात पथके तयार करण्यात आली.
तांत्रिक विश्लेषणातून मिळाली आरोपींची माहिती
दरम्यान, पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण तसेच गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला. आरोपी शिवणी रेल्वे स्टेशन परिसरात असून तेथून फरार होण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
माहिती मिळताच एलसीबी आणि एमआयडीसी पोलिसांच्या पथकांनी रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून अवघ्या दोन तासांत तिघांना ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत—
- अक्षय उर्फ अजय गजानन कंकाळ (वय २३), रा. क्रांतीनगर, शिवणी, अकोला
- आदित्य उर्फ रावण शरद वानखेडे (वय २०), रा. क्रांतीनगर, शिवणी, अकोला
- संतोष गजानन काशीदे (वय ४३), रा. न्यू भीमनगर, शिवणी, अकोला
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींची चौकशी केली असता त्यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून मृतकाचा खून केल्याचे सांगितल्याचे नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, या घटनेतील आणखी एक आरोपी सत्यम उर्फ गोलू सुरेश गवई (वय २५, रा. क्रांतीनगर, शिवणी) हा मारहाणीत जखमी झाल्याने त्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पुढील तपास एमआयडीसी पोलिसांकडे
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास एमआयडीसी पोलिसांकडून सुरू आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी आणि शहर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर, तसेच सपोनि निलेश देशमुख, सपोनि गोपाल जाधव, पोउपनि माजीद पठाण, पोउपनि विष्णु बोडखे, पोउपनि अनिल चव्हाण यांच्यासह एलसीबी व एमआयडीसी पोलिसांच्या पथकातील अधिकारी व अंमलदार सहभागी झाले.
ठळक मुद्दे :
- शिवणीतील जुन्या वादातून २२ वर्षीय युवकाचा खून
- धारदार चाकूने वार केल्याचा आरोप
- एलसीबी व एमआयडीसी पोलिसांची संयुक्त कारवाई
- आरोपींच्या शोधासाठी एकूण ७ पथके
- तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा शोध
- शिवणी रेल्वे स्टेशन परिसरातून तिघांना ताब्यात
- फरार होण्याच्या तयारीत असताना कारवाई
- आणखी एक आरोपी उपचारादरम्यान पोलिसांच्या ताब्यात
- पुढील तपास एमआयडीसी पोलिसांकडून सुरू
News Highlights
Akola, Shivani, AkolaCrime, ShivaniMurderCase, AkolaPolice, LCBAkola, MIDCPolice, CrimeNews, AkolaNews, BreakingNews, MaharashtraCrime, PoliceAction, BAnews24,
bhartiya alankar news 24, भारतीय अलंकार न्यूज 24, अकोला,शिवणी हत्याकांड, शिवणी खून प्रकरण
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा