msedcl-tower-chowk-akola-: टॉवर चौकात हाय व्होल्टेज थरार! विजेच्या पोलवर चढलेल्या तरुणाला धाडसी तरुणांनी वाचवले

महावितरणच्या जनमित्रांची अवघ्या एका मिनिटात वीजपुरवठा बंद करण्याची तत्परता; स्थानिक तरुणाच्या धाडसामुळेही संभाव्य दुर्घटना टळली



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : शहरातील टॉवर चौक परिसरात मंगळवारी (दि. 29 सप्टेंबर) रात्री सुमारे 9.50 वाजता विजेच्या पोलवर चढलेल्या तरुणामुळे एकच खळबळ उडाली. 11 के.व्ही. अकोला टाऊन फिडरच्या विद्युत वाहिनीच्या परिसरात ही घटना घडली. संबंधित तरुण विद्युत वाहिनीच्या संपर्कात येण्याची शक्यता निर्माण झाल्याने परिस्थिती अत्यंत धोकादायक बनली होती.


मिळालेल्या माहितीनुसार, 132 के.व्ही. गोऱक्षण रोड येथून निघणाऱ्या 11 के.व्ही. अकोला टाऊन फिडरच्या वाहिनीच्या परिसरात, एसबीआय बँकेजवळ टॉवर चौकासमोर एक व्यक्ती पोलवर चढत असल्याची माहिती फ्यूज कॉल सेंटर-1 येथे दूरध्वनीद्वारे मिळाली. या व्यक्तीचा विद्युत वाहिनीशी संपर्क होण्याची शक्यता असल्याने मोठा विद्युत अपघात होण्याचा धोका निर्माण झाला होता.


अवघ्या एका मिनिटात वीजपुरवठा बंद


घटनेची माहिती मिळताच फ्यूज कॉल सेंटर-1 येथे कार्यरत जनमित्र रितेश गवई, उमेश जाटाळे, हेमंत नागोसे आणि श्री. चिंचोडकर यांनी तातडीने हालचाली सुरू केल्या. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी अवघ्या एका मिनिटाच्या आत 11 के.व्ही. अकोला टाऊन फिडरचा वीजपुरवठा बंद केला.


त्यामुळे पोलवर चढलेल्या व्यक्तीचा विद्युत वाहिनीशी संपर्क होऊन होणारा संभाव्य जीवघेणा अपघात टाळण्यात यश आले.


टॉवर चौकात नागरिकांची मोठी गर्दी


दरम्यान, या घटनेची माहिती परिसरात पसरताच टॉवर चौकात नागरिकांची मोठी गर्दी झाली. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, आकाश धुर्वे (रा. अकोट) हा तरुण विजेच्या तारांच्या परिसरात धोकादायक स्थितीत होता. त्यामुळे उपस्थित नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.


वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर एका स्थानिक तरुणाने ज्याचे नाव सोहेल खान आहे, सोहेलने धाडस दाखवत संबंधित तरुणाला सुरक्षितपणे खाली आणण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नादरम्यान दोघांचा तोल जाऊन ते खाली पडले. सुदैवाने खाली हार फुलांचे दुकाने होती, दुकानाच्या उभारलेल्या छतावर पडल्याने या घटनेत कोणालाही गंभीर दुखापत झाल्याचे समोर आले नाही. यावेळी नागरिकांनी सोहेल खानचे कौतुक करीत त्याच्या गळ्यात पुष्पहार घालून जल्लोष केला.


पोलिसांकडून तरुणाला ताब्यात


घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाइन्स पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आकाश धुर्वे याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणल्याची माहिती आहे. दरम्यान, या प्रकारासंदर्भात महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.


जनमित्रांच्या सतर्कतेमुळे संभाव्य दुर्घटना टळली


या घटनेत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेले प्रसंगावधान, तत्पर निर्णयक्षमता आणि सुरक्षिततेबाबतची जागरूकता महत्त्वाची ठरली. माहिती मिळाल्यानंतर अवघ्या एका मिनिटात वीजपुरवठा बंद केल्याने संभाव्य जीवघेणा विद्युत अपघात टाळता आला.


महावितरणच्या अकोला शहरी विभागानेही संबंधित जनमित्रांच्या तत्पर कार्यवाहीचे कौतुक केले आहे.


ठळक मुद्दे


घटना : टॉवर चौक, अकोला


वेळ : 29 सप्टेंबर 2026 रोजी रात्री सुमारे 9.50 वाजता


वाहिनी : 11 के.व्ही. अकोला टाऊन फिडर


परिसर : एसबीआय बँकेजवळ, टॉवर चौक


माहिती मिळताच अवघ्या एका मिनिटात वीजपुरवठा बंद


जनमित्रांच्या तत्परतेमुळे संभाव्य विद्युत दुर्घटना टळली


सिव्हिल लाइन्स पोलिसांकडून संबंधित तरुणाला ताब्यात


स्थानिक तरुणानेही धाडस दाखवत बचावाचा प्रयत्न केला


सुदैवाने गंभीर जीवितहानी टळली



महावितरणच्या जनमित्रांची तत्परता आणि नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे टॉवर चौकातील हा ‘हाय व्होल्टेज ड्रामा’ अखेर सुखरूप संपला.


टिप्पण्या