shikalkari-gang-theft-case-akl: अकोला शहरात घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यीय शिकलकरी टोळीचा पर्दाफाश; १० घरफोडीचे गुन्हे उघड
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : अकोला शहरातील बंद घरे, फ्लॅट आणि निवासी सोसायट्यांना लक्ष्य करून घरफोड्या करणाऱ्या आंतरराज्यीय शिकलकरी टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी या कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्या चौकशीत अकोला शहरातील तब्बल १० घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. तसेच आणखी १० ठिकाणी घरफोडी केल्याची माहिती समोर आली असून, त्या ठिकाणी आरोपींच्या हाती मुद्देमाल लागला नसल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
बंद घरे आणि सोसायट्या होत्या लक्ष्यावर
पोलीस स्टेशन खदान हद्दीत काही दिवसांपासून बंद घरे, फ्लॅट तसेच निवासी सोसायट्यांमध्ये कडी-कोंडे तोडून घरफोडी करण्याचे प्रकार घडत होते. या घटनांमध्ये सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम, कॅमेरा व अन्य मौल्यवान वस्तू चोरीला गेल्या होत्या.
या प्रकरणी खदान पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते.
एलसीबीकडून समांतर तपास
घरफोडीच्या घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांना आरोपींचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले.
त्यानुसार पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांना समांतर तपासाच्या सूचना दिल्या. सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तांत्रिक विश्लेषण तसेच गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला.
अकोल्यातील आरोपीला सापळा रचून अटक
तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गोविंदसिंग उर्फ गोलू बलबीरसिंग, वय ३३ वर्षे, रा. देवी खदान, अकोला याचा घरफोडीच्या घटनांशी संबंध असल्याचे निष्पन्न झाले.
एलसीबीच्या पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने खदान परिसरातील बंद घरे आणि बाहेरगावी गेलेल्या नागरिकांच्या घरांची रेकी केल्याची माहिती पोलिसांना दिली.
मध्य प्रदेशातील साथीदारही ताब्यात
गोविंदसिंग याने मध्य प्रदेशातील आपल्या साथीदाराला अकोल्यात बोलावून दोघांनी मिळून घरफोड्या केल्याची माहिती तपासात समोर आली.
त्यानंतर एलसीबी पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे देवंद्रसिंग प्रेमसिंग टाक, वय २९ वर्षे, रा. इनपुन पुनर्वास, तहसील पुनासा, जिल्हा खंडवा, मध्य प्रदेश याचा शोध घेतला. पथकाने मध्य प्रदेशात जाऊन त्याला त्याच्या राहत्या ठिकाणाहून ताब्यात घेतले.
१० घरफोडीचे गुन्हे उघडकीस
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी खदान परिसरात एकूण १० ठिकाणी घरफोडी करून मौल्यवान वस्तूंची चोरी केली. याशिवाय आणखी १० ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न,घरफोडी केली, मात्र त्या ठिकाणी आरोपींच्या हाती कोणताही मुद्देमाल लागला नसल्याचे तपासात समोर आले आहे.
या कारवाईमुळे अकोला शहरातील घरफोडीच्या १० गुन्ह्यांची उकल झाली असून, आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
आरोपी खदान पोलिसांच्या ताब्यात
ताब्यात घेतलेल्या दोन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी खदान पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आरोपींनी आणखी कोणत्या घटनांमध्ये सहभाग घेतला आहे, तसेच चोरीच्या मुद्देमालाबाबत पुढील तपास सुरू आहे.
कारवाईत सहभागी पोलीस अधिकारी व पथक
ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश देशमुख, पोलीस उपनिरीक्षक विष्णु बोडखे तसेच पोलीस अंमलदार शेख हसन, उमेश पराये, खुशाल नेमाडे, अब्दुल माजिद, फिरोज खान, एजाज अहमद, आकाश मानकर, मोहम्मद आमीर, अभिषेक पाठक, अमोल दिपके, श्रीकांत पातोंड, धिरज वानखेडे, राज चंदेल, चालक देवानंद खरात आणि प्रकाश लोखंडे यांनी केली.
ठळक मुद्दे
- आंतरराज्यीय शिकलकरी टोळीचा पर्दाफाश
- अकोला शहरातील १० घरफोडीचे गुन्हे उघड
- अकोला आणि मध्य प्रदेशातील दोन आरोपी ताब्यात
- बंद घरे, फ्लॅट आणि निवासी सोसायट्या होत्या लक्ष्यावर
- आरोपींकडून घरांची रेकी करून चोरी केल्याची माहिती
- आणखी १० ठिकाणी घरफोडी केल्याची माहिती तपासात समोर
- स्थानिक गुन्हे शाखेच्या तांत्रिक व गोपनीय तपासातून कारवाई
News Highlights
Akola Crime News, Akola House Breaking, Akola Police, Akola LCB, Local Crime Branch Akola, Akola Theft News, Shikalkari Gang Akola, Akola Police News, घरफोडी अकोला, अकोला गुन्हे शाखा, अकोला पोलीस, शिकलकरी गँग अकोला, अकोला क्राईम न्यूज
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा