दोन फॅक्टरीवर धडक कारवाई; तब्बल १२ लाखांचा तेलसाठा जप्त, परवाने पुढील आदेशापर्यंत निलंबित
BhartiyaAlankarNews24
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला | अकोला एमआयडीसी परिसरात सोयाबीन तेलाच्या विक्री व साठवणुकीमध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्याने अन्न व औषध प्रशासनाने दोन पेढींवर धडक कारवाई केली आहे. भेसळीच्या संशयावरून दोन्ही ठिकाणचा एकूण ७,०२६.८०० किलो तेलसाठा, अंदाजे ११ लाख ८२ हजार ६५० रुपये किमतीचा, जप्त करण्यात आला आहे.
दिनांक २६ ऑगस्ट २०२६ रोजी करण्यात आलेल्या या कारवाईदरम्यान दोन्ही ठिकाणी प्रयोगशाळा अद्ययावत नसणे, प्रयोगशाळेचे अहवाल उपलब्ध नसणे, सुटे तेल विक्री करणे तसेच परवान्याच्या अटींशी विसंगत स्वरूपात व्यवसाय केल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले.
मे. प्रभुदयाळ लक्ष्मीनारायणवर कारवाई
एमआयडीसी, अकोला येथील मे. प्रभुदयाळ लक्ष्मीनारायण या पेढीची तपासणी करण्यात आली. यावेळी Refined Soyabean Oil (Shakti) या उत्पादनाचा अन्न नमुना घेण्यात आला.
उर्वरित साठा भेसळीच्या संशयावरून जप्त करण्यात आला. या पेढीकडे Repacker Oil साठी परवाना असतानाही ट्रेडिंग करणे, सुटे तेल विक्री करणे, प्रयोगशाळा उपलब्ध नसणे तसेच प्रयोगशाळेचे अहवाल उपलब्ध नसणे यांसह इतर त्रुटी आढळून आल्या.
या कारवाईत ३,४२८.४०० किलो तेल, किंमत ६ लाख २१ हजार ३०० रुपये, जप्त करण्यात आले.
ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी किशोर बोरचाटे यांनी केली.
Bharatkumar and Brothers येथेही मोठा साठा जप्त
एमआयडीसी, अकोला येथील मे. Bharatkumar and Brothers या पेढीचीही तपासणी करण्यात आली. यावेळी Refined Soyabean Oil (Loose) चा अन्न नमुना घेण्यात आला.
उर्वरित तेलसाठा भेसळीच्या संशयावरून जप्त करण्यात आला. तपासणीदरम्यान प्रयोगशाळा अद्ययावत नसणे, सुटे तेल विक्री करणे, प्रयोगशाळेचे अहवाल उपलब्ध नसणे तसेच इतर गंभीर त्रुटी आढळून आल्या.
या कारवाईत ३,५९८.४०० किलो तेल, किंमत ५ लाख ६१ हजार ३५० रुपये, जप्त करण्यात आले.
ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी रवींद्र सोळंके यांनी केली.
दोन्ही पेढीचे परवाने तात्काळ निलंबित
विशेष म्हणजे, दोन्ही पेढ्या Repacker Oil साठी परवानाधारक आहेत. मात्र तपासणीदरम्यान आढळून आलेल्या गंभीर त्रुटींच्या आधारे अन्न व औषध प्रशासनाने दोन्ही पेढ्यांचे परवाने पुढील आदेशापर्यंत तात्काळ निलंबित (Forthwith Suspension) केले आहेत.
आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
अन्न व औषध प्रशासनाची ही कारवाई आयुक्त तुकाराम मुंढे, मुंबई तसेच सहआयुक्त सचिन केदारे, अमरावती यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईमुळे खाद्यतेलाच्या गुणवत्तेबाबत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली असून, नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष असल्याचे स्पष्ट झाले आहे.
एकूण जप्त साठा : ७,०२६.८०० किलो
एकूण अंदाजे किंमत : ११,८२,६५० रुपये
कारवाईची तारीख : २६ ऑगस्ट २०२६
दोन्ही परवाने : पुढील आदेशापर्यंत निलंबित
— देवानंद वीर
सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, अकोला
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा