khamgaon-court-dowry-case: हुंडाबळी प्रकरणात चार आरोपींची निर्दोष मुक्तता; खामगाव सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

फिर्यादीच्या जबाबातील तफावत, महत्त्वाचे दस्तऐवज व मोबाईल जप्त न केल्याने संशयाचा फायदा; न्यायालयाने चारही आरोपींची निर्दोष मुक्तता केली.



ठळक मुद्दे 

हुंडाबळी प्रकरणातील चार आरोपींची निर्दोष मुक्तता.

खामगाव सत्र न्यायालयाचे जिल्हा व सत्र न्यायाधीश अमित प्र. कोकरे यांचा निर्णय.

फिर्यादीच्या जबाबातील तफावत न्यायालयाच्या निदर्शनास.

तपासात महत्त्वाचे दस्तऐवज व मोबाईल जप्त न केल्याची नोंद.

ठोस पुराव्याअभावी आरोपींना संशयाचा फायदा.

आरोपींच्या वतीने ॲड. चंद्रकांत एन. वानखडे (अकोला) यांनी प्रभावी बाजू मांडली.




नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : हुंडाबळी प्रकरणात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर सुरू असलेल्या खटल्यात खामगाव येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने चार आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. विद्यमान अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अमित प्र. कोकरे यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.



या प्रकरणात आरोपी एकनाथ प्रल्हाद पाखरे, रघुनाथ प्रल्हाद पाखरे, प्रमिला प्रल्हाद पाखरे आणि सुलोचना रतन रामचवरे यांच्याविरुद्ध तामगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

फिर्यादीनुसार, मृतक शितल हिचा विवाह आरोपी क्रमांक १ एकनाथ पाखरे यांच्यासोबत झाला होता. विवाहानंतर आरोपींनी ५० हजार रुपयांच्या हुंड्याची मागणी करत शारीरिक व मानसिक छळ केल्याचा आरोप होता. या छळाला कंटाळून लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यांत शितलने जीवन संपविले असा दावा फिर्यादीने केला होता.

या तक्रारीच्या आधारे तामगाव पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम ४९८-अ, ३०४-ब, ३०६ सहकलम ३४ अंतर्गत गुन्हा नोंदवून तपास पूर्ण केल्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.

खटल्यादरम्यान न्यायालयाने एकूण सहा साक्षीदारांची साक्ष नोंदवली. सुनावणीदरम्यान फिर्यादीच्या जबाबात आणि सादर करण्यात आलेल्या पुराव्यांमध्ये लक्षणीय तफावत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. तसेच तपास यंत्रणेने प्रकरणाशी संबंधित महत्त्वाचे दस्तऐवज तसेच मोबाईल फोन जप्त न केल्यामुळे आरोपींविरुद्ध ठोस आणि विश्वासार्ह पुरावा उभा राहिला नसल्याचे न्यायालयाने नमूद केले.

या सर्व बाबींचा विचार करून न्यायालयाने आरोपींविरुद्ध आरोप सिद्ध करण्यासाठी आवश्यक ठोस पुरावे उपलब्ध नसल्याचे स्पष्ट करत चारही आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.

या प्रकरणात आरोपींच्या वतीने ॲड. चंद्रकांत एन. वानखडे यांनी बाजू मांडली. त्यांना ॲड. कांचन शिंदे, ॲड. सुमेध डोंगरदिवे, ॲड. परवेज अरमानी, ॲड. प्रविण पोहरे, ॲड. सुनिता गवई, ॲड. असद खान आणि ॲड. कांचन नानीर यांनी सहकार्य केले.

टिप्पण्या