hyderabad-jaipur-express-akl: हैदराबाद-जयपूर एक्स्प्रेसमध्ये बॅग चोरणारा आरोपी जेरबंद; दिव्यांग दाम्पत्यास दिलासा, आरपीएफ, जीआरपीची 'सुपरफास्ट' कारवाई



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: हैदराबाद-जयपूर एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या एका दिव्यांग दाम्पत्याची चोरीला गेलेली बॅग अवघ्या काही तासांत हस्तगत करत आरपीएफ, दमरे आणि जीआरपी, अकोला यांनी सुपरफास्ट कारवाई केली आहे. या कारवाईत सराईत चोराला अटक करून ५,१०० रुपये किमतीचा मुद्देमाल आणि अत्यंत महत्त्वाची मूळ कागदपत्रे फिर्यादीस परत करण्यात आली आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, २५ जुलै रोजी १७०७९ हैदराबाद-जयपूर एक्स्प्रेस वाशीम स्थानकावर आली असता, दमरे आरपीएफचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सलीम खान आणि हवालदार सुनील कुमार हे गस्तीवर होते. त्यावेळी एक व्यक्ती हिरव्या रंगाची संशयास्पद ट्रॉली बॅग घेऊन घाईघाईने खाली उतरताना त्यांना दिसली. आरपीएफच्या पथकाने त्याला थांबवून विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपले नाव संदीप बबन वानखडे (वय ३५, रा. वाशीम) असे सांगितले. गेल्या ४ ते ५ वर्षांपासून तो धावत्या ट्रेनमध्ये चोऱ्या आणि खिसाकापूची कामे करत असल्याची कबुली त्याने दिली. तसेच या चोरीमध्ये जळगाव येथील 'फारूक' नावाचा त्याचा साथीदारही सामील असल्याची माहिती त्याने दिली.



महिला प्रवाशाची बॅग लंपास

याच हैदराबाद-जयपूर एक्स्प्रेसने फिर्यादी शीतल पटेल (वय ३१, रा. धमनोद, जि. धार, म.प्र.) या आपले पती विजय पटेल यांच्यासह खंडवा येथे प्रवास करीत होत्या. पहाटे ५.०० वाजेच्या सुमारास अकोला-वाशीम दरम्यान त्यांची ट्रॉली बॅग अज्ञात चोरट्याने लांबवली. अकोला स्थानकाजवळ आपली बॅग चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले होते. या बॅगेत शैक्षणिक व नोकरीसंदर्भातील महत्त्वाची कागदपत्रे, कॉस्मेटिक साहित्य व इतर ऐवज होता. फिर्यादीचे पती हे डीआरडीओ (DRDO) मध्ये तंत्रज्ञ (Technician) पदावर कार्यरत असल्याने ही कागदपत्रे अत्यंत महत्त्वाची होती.




६०% दिव्यांग दाम्पत्यास तात्काळ मदत

विशेष बाब म्हणजे, फिर्यादी पटेल दाम्पत्य हे ६०% दिव्यांग आहे. बॅगेत नोकरीसाठी आवश्यक मूळ कागदपत्रे असल्याने जीआरपीने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १०६(३) अन्वये कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून जप्त केलेली बॅग तात्काळ फिर्यादीच्या स्वाधीन करण्यात आली. त्यानंतर अकोला रेल्वे स्थानकावरून पुढील खंडवा प्रवासासाठी महिला पोलीस हवालदार दुर्गा रामटेके यांनी या दिव्यांग दाम्पत्याला सुरक्षितपणे रेल्वेत बसवून सहकार्य केले.




गुन्हा दाखल; सह-आरोपीचा शोध सुरू

या प्रकरणी जीआरपी अकोला पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ३०५(c) अन्वये गुन्हा क्र. ०२३२/२०२६ दाखल करण्यात आला आहे. पसार झालेल्या 'फारूक' या सह-आरोपीचा पोलीस सध्या शोध घेत आहेत.




दाम्पत्याकडून कौतुक व आभार

आरपीएफ दमरे आणि जीआरपी अकोला यांच्या या तात्काळ, संवेदनशील आणि तत्पर कारवाईमुळे रेल्वे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रवाशांचा व सामान्य जनतेचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. तात्काळ मिळालेली मदती आणि चोरी गेलेली महत्त्वाची कागदपत्रे तातडीने मिळवून दिल्याबद्दल फिर्यादी दिव्यांग दाम्पत्याने पोलिसांचे मनःपूर्वक कौतुक करत आभार मानले.

टिप्पण्या