aniket-ingle-murder-case-akola : शेतीच्या वादातून अनिकेत इंगळेची निर्घृण हत्या; अवघ्या १२ तासांत ६ आरोपी पोलिसांच्या ताब्यात
ठळक मुद्दा
स्थानिक गुन्हे शाखा अकोला आणि बार्शिटाकळी पोलिसांची संयुक्त धडक कारवाई
नीलिमा शिंगणे जगड
भारतीय अलंकार न्यूज 24
अकोला : बार्शिटाकळी पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे निंबी येथे शेतीच्या वादातून एका तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) अकोला आणि बार्शिटाकळी पोलिसांनी संयुक्तरित्या अत्यंत वेगाने तपास करत अवघ्या १२ तासांच्या आत सहा आरोपींना ताब्यात घेण्यात मोठे यश मिळवले आहे.
कशामुळे घडली घटना?
दिनांक ३० जून २०२६ रोजी फिर्यादी प्रार्थना भास्कर इंगळे यांनी बार्शिटाकळी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, आरोपींनी संगनमत करून त्यांचा मुलगा अनिकेत भास्कर इंगळे (वय २७) याच्याशी शेतीच्या कारणावरून वाद घातला. वादानंतर आरोपींनी अनिकेतच्या डोळ्यात मिर्ची पावडर मिश्रित पाणी फेकले आणि त्यानंतर त्याच्या डोक्यावर हातोड्याने वार करून त्याची हत्या केली.
घटनेनंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करून आरोपींच्या शोधासाठी तातडीने तपास यंत्रणा सक्रिय केली.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर संयुक्त पथके सज्ज
या गंभीर घटनेची दखल घेत पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर आणि बार्शिटाकळीचे पोलीस निरीक्षक प्रविण धुमाळ यांना आरोपींना तातडीने अटक करण्याचे आदेश दिले.
यानंतर स्थानिक गुन्हे शाखा आणि बार्शिटाकळी पोलीस स्टेशनची संयुक्त पथके तयार करण्यात आली. या पथकांनी रात्रभर शोधमोहीम राबवत पातुर व बार्शिटाकळी तालुक्यातील विविध संशयित ठिकाणे, बस स्थानके, खाजगी प्रवासी वाहतूक केंद्रे तसेच संवेदनशील भागात शोधमोहीम सुरू केली.
पातुर परिसरातून दोन आरोपींना शिताफीने पकडले
तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी विशाल सुरेश करवते (वय २८) आणि अमोल सुरेश करवते (वय ३०), दोघेही रा. निंबी, ता. बार्शिटाकळी हे फरार होण्याच्या तयारीत असल्याची माहिती एलसीबी पथकाला मिळाली.
माहितीची खात्री करून पोलिसांनी तातडीने सापळा रचत दोन्ही आरोपींना पातुर परिसरातून घेराव घालून ताब्यात घेतले.
बार्शिटाकळी पोलिसांनी आणखी चार आरोपींना घेतले ताब्यात
तपासादरम्यान तांत्रिक माहिती व गुप्त माहितीद्वारे खालील चार आरोपींनाही पोलिसांनी ताब्यात घेतले :
● सुरेश हरिभाऊ करवते (वय ६०)
● रेखा सुरेश करवते (वय ५२)
● अस्मीता विनोद सुरवाडे (वय २५)
● मयुरी अमोल करवते (वय २३)
सर्व आरोपी हे निंबी, ता. बार्शिटाकळी, जि. अकोला येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ठळक मुद्दे
*शेतीच्या वादातून तरुणाची हत्या
*डोळ्यात मिरचीचे पाणी टाकून हातोड्याने हल्ला
*खुनानंतर आरोपी फरार होण्याच्या तयारीत
*पोलिसांची रात्रभर शोधमोहीम
*अवघ्या १२ तासांत सहा आरोपी ताब्यात
*एलसीबी व बार्शिटाकळी पोलिसांची संयुक्त यशस्वी कारवाई
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम यशस्वी
सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधिक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी मुर्तीजापुर विभाग वैशाली मुळे, पोलीस निरिक्षक नितीन लेव्हस्कर, स्थानिक गुन्हे शाखा अकोला पोलीस निरिक्षक प्रविण धुमाळ पो.स्टे. बार्शिटाकळी यांच्यासह निलेश देशमुख, गोपाल जाधव, बाळु पवार, शेख हसन, अब्दुल माजीद, महेंद्र मलीये, रवि खंडारे, किशोर सोनोने, वसिमोद्दीन, मंगेश इंगळे, खुशाल नेमाडे, स्वप्नील खेडकर, श्रीकांत पातोंड, राज चंदेल, भिमराव दिपके, आकाश मानकर, अभिषेक पाठक, सतिष पवार, रामकिसन डोईफोडे, देवानंद खरात, शेख फराज, विष्णु ढोरे, गोकुळ चव्हाण, मंगेश महाजन, अजय अंभोरे, मनीष घुगे, ईश्वर पातोंड, गोविंद सपकाळ, अमोल हाके, प्रविण मस्के, अनिकेत चव्हाण, सुमय्या परवीन, यशवंत नागे यांनी केली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा