akot-file-railway-bridge-akola: अकोट फाईल रेल्वे पुलाच्या नव्या बांधकामाला गती; ४ ते ५ महिन्यांत काम सुरू होण्याचे संकेत




ठळक मुद्दे

खासदार अनुप धोत्रे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन आढावा बैठक; पर्यायी वाहतूक, नागरिकांची गैरसोय टाळण्यासह समन्वयाच्या सूचना


अकोट फैल येथील जुन्या रेल्वे पुलाऐवजी नवीन पुलाच्या बांधकामासाठी बैठक

खासदार अनुप धोत्रे यांनी ऑनलाईन सहभाग घेत केला सविस्तर आढावा

पर्यायी वाहतूक मार्गाची व्यवस्था करण्याचे निर्देश

नागरिकांना कमीत कमी त्रास होईल याची काळजी घेण्याच्या सूचना

नगर रचना विभागाला स्थळ पाहणी व समन्वयाचे निर्देश

पुढील ४ ते ५ महिन्यांत प्रत्यक्ष काम सुरू होण्याची शक्यता



भारतीय अलंकार न्यूज 24

अकोला | नीलिमा शिंगणे जगड 

अकोला महानगरपालिका क्षेत्रातील उत्तर झोनमधील अकोट फैल येथे रेल्वे रुळावरील जुना पुल पाडून त्याठिकाणी नवीन पुलाचे बांधकाम करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला गती मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. या संदर्भात अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे यांच्या अध्यक्षतेखाली मनपा आयुक्तांच्या दालनात ऑनलाईन आढावा बैठक पार पडली.

बैठकीत महाराष्ट्र विधानसभेचे मुख्य प्रतोद तथा आमदार रणधीर सावरकर, महापौर शारदा रणजीत खेडकर, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल तसेच भाजप महानगराध्यक्ष जयंत मसने उपस्थित होते.

बैठकीदरम्यान खासदार अनुप धोत्रे यांनी ऑनलाईन सहभाग घेत पुलाच्या प्रस्तावित बांधकामाचा सविस्तर आढावा घेतला. नवीन पुलाचे काम सुरू होण्यापूर्वी आणि काम पूर्ण होईपर्यंत परिसरातील वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित विभागांनी तातडीने पाहणी करून निर्णय घ्यावा, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या. तसेच बांधकामामुळे स्थानिक नागरिकांना कोणताही अनावश्यक त्रास होणार नाही, याची विशेष दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी आमदार रणधीर सावरकर यांनी नगर रचना विभागामार्फत संपूर्ण स्थळाची पाहणी करून संबंधित रेल्वे व सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्याच्या सूचना दिल्या. या प्रकल्पासाठी विविध विभागांमध्ये समन्वय राखत कामाचा वेग वाढविण्यावर भर देण्यात आला.

बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांनी येत्या ४ ते ५ महिन्यांत पुलाच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त केली. बैठकीनंतर संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणीही केली.

या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रसाद पाटील, अभियंता राजेश राठोड, रेल्वे विभागाचे वरिष्ठ विभाग अभियंता (भुसावळ) प्रमोद कुमार, सहायक अभियंता (कन्स्ट्रक्शन) अरविंद रायबोले, सेक्टर एक्स्पर्ट देवेंद्र रायबोले तसेच मनपा मालमत्ता विभागाचे उपअभियंता संदीप गावंडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

नवीन पुलाच्या उभारणीमुळे अकोट फैल परिसरातील वाहतूक अधिक सुरक्षित, सुलभ आणि गतिमान होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून, नागरिकांनाही या प्रकल्पाची प्रतीक्षा लागली आहे.






टिप्पण्या