akola-balapur-crime-news-ps: बाळापूर येथे विद्यार्थिनीच्या मृत्यूनंतर संतापाची लाट ; आरोपी पोलीस कर्मचाऱ्याच्या अटकेसाठी रास्ता रोको
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील विद्यार्थिनीच्या मृत्यूनंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे. लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक शोषण केल्याचा आरोप असलेल्या पोलीस कर्मचारी पवन वडगावे याला तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी आजही नागरिक रस्त्यावर उतरले. पीडित मुलीवर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी अकोला नाक्यावर तब्बल एक तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
काही महिन्यांपूर्वी बाळापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचारी पवन वडगावे याने एका विद्यार्थिनीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे शारीरिक शोषण केल्याचा आरोप आहे. त्यानंतर आरोपीने लग्नास नकार दिल्याने संबंधित मुलीने जीवन यात्रा संपविण्याचा प्रयत्न केला होता.
उपचारादरम्यान मृत्यूशी झुंज देत असलेल्या या पीडित मुलीचा काल मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण बाळापूर शहरात संताप व्यक्त होत असून आरोपी अद्याप फरार असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. पीडित मुलीला न्याय मिळावा आणि आरोपी पोलीस कर्मचारी पवन वडगावे याला तात्काळ अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी सर्वपक्षीय मोर्चाही काढण्यात आला होता.
आज अंत्यसंस्कारापूर्वी संतप्त नागरिकांनी अकोला नाक्यावर एक तास रस्ता रोको आंदोलन करत प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान, खासदार अनुप धोत्रे यांनी आंदोलनस्थळी भेट देत या प्रकरणाचा पाठपुरावा मुख्यमंत्री स्तरावर केला जाईल, आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यात येईल, तसेच हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविण्यासाठी आणि सक्षम सरकारी वकिलाची नियुक्ती करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन दिले.
त्यानंतर पीडित मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
या प्रकरणी पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी दोन विशेष पथके तयार केली असून फरार आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडघन यांनी दिली. आरोपीला लवकरच अटक करून पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचे आश्वासनही पोलिसांकडून देण्यात आले आहे.
विद्यार्थिनीच्या मृत्यूनंतर या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. आता आरोपीला कधी अटक होते आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी तपास किती वेगाने पुढे सरकतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा