भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: शहरात भरदिवसा झालेल्या जीवघेण्या चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या काँग्रेसच्या नगरसेविका रफिया बी यांचे पती याकूब खान उर्फ याकूब पहिलवान यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून, पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
अकोला शहरातील रामदास पेठ परिसरात आज दुपारी 1 वाजताच्या सुमारास याकूब खान हे रेल्वे स्टेशन परिसरातील एका चहा टपरीवर चहा घेवून, जिजाऊ हॉल कडे जाणाऱ्या रस्त्याने निघाले होते. वाटेतच जिजाऊ हॉल समोर त्यांच्यावर एका हल्लेखोराने चाकू सारख्या धारधार शस्त्राने सपासप वार केले. या हल्ल्यात याकूब खान गंभीर जखमी झाले. हल्ल्यानंतर स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले. प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र उपचारास त्यांनी प्रतिसाद दिला नाही. यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले, असा घटनाक्रम समोर आला आहे.
दरम्यान, हल्ल्यानंतर आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना घटनास्थळ जवळ रामदास पेठ पोलीस स्टेशन कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने प्रसंगावधान राखत त्याचा पाठलाग करून आरोपीला ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून हल्ल्यामागील नेमके कारण, पूर्ववैमनस्याची पार्श्वभूमी तसेच इतर आरोपींचा सहभाग याबाबत सखोल तपास सुरू आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा