akola-news-neet-exam-student: उच्च शिक्षणाचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : नीट पेपरफुटी प्रकरणानंतर विद्यार्थ्यांवरील शैक्षणिक आणि आर्थिक ताणाचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच अकोल्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. उच्च शिक्षणाचे स्वप्न पाहणाऱ्या वीस वर्षीय एका विद्यार्थिनीने आर्थिक अडचणींमुळे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.



प्राप्त प्राथमिक माहिती नुसार, भूमिका धबडघाव ही द्वितीय वर्षाची जीएनएम नर्सिंगची विद्यार्थिनी होती. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही तिने शिक्षणाची वाट निवडली होती. घरची परिस्थिती हलाखीची असतानाही मुलीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी तिचे आई-वडील अहोरात्र मेहनत घेत होते. भूमिकाची आई लोकांच्या घरी धुणीभांडी करते. तर वडील जठारपेठ मधील एका आपर्टमेंट मध्ये चौकीदार म्हणून काम करतात. याच इमारती मधील एका खोलीत हे कुटुंब वास्तव्यास आहे. घरी कुणी नसताना या खोलीतच भूमिका हिने जीवन यात्रा संपविली असल्याचे कळते. 


भूमिकाने नीटची परीक्षा दिली होती आणि पुन्हा परीक्षा देऊन डॉक्टर होण्याचे स्वप्न तिच्या डोळ्यांत होते. मात्र घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे तिने ते स्वप्न बाजूला ठेवत नर्सिंग शिक्षणाचा मार्ग स्वीकारला. सुरुवातीला महाविद्यालयाकडून कमी फी सांगण्यात आली होती, मात्र नंतर शुल्कात वाढ होत गेल्याचा आरोप वडिल श्याम धबडघाव  यांनी केला आहे.


आपल्या शिक्षणाचा आणि लहान भावाच्या भवितव्याचा आर्थिक भार आई-वडिलांवर पडत असल्याची चिंता भूमिकाला सतावत होती, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. घरच्या परिस्थितीची जाणीव आणि शिक्षणासाठीचा वाढता खर्च यामुळे ती मानसिक तणावात होती, असा दावा तिच्या वडिलांनी केला आहे.


या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा वाढता खर्च हा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. शिक्षण हे हक्काचे असताना आर्थिक अडचणींमुळे एखाद्या विद्यार्थ्याचे स्वप्न आणि आयुष्य दोन्ही संपुष्टात येणे ही समाजासाठी चिंतेची बाब असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.


टिप्पण्या