महागाईच्या मुद्द्यावर केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी; वाजीफदार पेट्रोल पंपावर आंदोलनभारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या सातत्याने वाढत असलेल्या दरांमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले असून वाढत्या महागाईने जनतेचे कंबरडे मोडले आहे. इंधन दरवाढीचा थेट परिणाम वाहतूक, अन्नधान्य, भाजीपाला तसेच दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंवर होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर महानगर काँग्रेस कमिटी अकोला व अकोला तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शुक्रवारी २९ मे रोजी अकोला शहरातील वाजीफदार पेट्रोल पंप येथे केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणांविरोधात भव्य आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनाचे नेतृत्व अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांनी केले. यावेळी केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवर जोरदार टीका करत “जनतेवरचा अन्याय सहन केला जाणार नाही” असा इशारा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
आंदोलनादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी “महागाई बंद करा”, “जनतेचा पैसा परत द्या”, “पेट्रोल-डिझेल दरवाढ मागे घ्या”, “मेलोडी खावो सब भुल जाओ” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे सामान्य कुटुंबांचे मासिक बजेट कोलमडत असून घरगुती गॅसच्या दरवाढीमुळे महिलांनाही मोठा आर्थिक फटका बसत असल्याचे आंदोलकांनी सांगितले.
यावेळी बोलताना आमदार साजिद खान पठाण यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत सांगितले की, इंधनावरील वाढत्या करांमुळे महागाईचा भडका उडाला आहे. सामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, लघुउद्योजक व मध्यमवर्गीय कुटुंबे आर्थिक अडचणीत सापडली असून सरकारने तातडीने पेट्रोल-डिझेल व गॅस दर कमी करावेत, अशी मागणी त्यांनी केली.
महानगर काँग्रेस अध्यक्ष महेंद्र गवई यांनी देखील केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करत जनतेच्या प्रश्नांवर काँग्रेस रस्त्यावर उतरल्याचे स्पष्ट केले. वाढती बेरोजगारी, महागाई आणि इंधन दरवाढ यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये असंतोष वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले.
या आंदोलनात जिल्हा ग्रामीण काँग्रेस अध्यक्ष प्रकाश तायडे, नगरसेवक आजाद खान, नगरसेविका सुवर्णरेखा जाधव, मोईन मोंटु खान, मो. इरफान, विजय देशमुख, प्रशांत गावंडे, मोहम्मद एजाज, मोहम्मद वसिम, संदेश वानखडे, सुनील वानखडे, मोहम्मद जाकीर, इजहार उल्ला, उल्हास किस, शेख अर्शद, अशोक विजय देशमुख, शीला वावळ, शरीफ शाह, दिवाण प्रमोद ओक, कपिल पाटील, शहा, वर्षा चंद्रशेखर, आबिदा अहमद, अली शाहरुख, एस. के. रेश्मा, सलमान खान, ताबिदा, अरबीना, उजमा खान, महंमद जफर, मिलिंद विश्वनाथ नकाशे, विनोद डोंगरे, विनोद सहारे, शिवा राऊत, मोहम्मद मुदस्सिर, धन राऊत, रोशनी रवी, जय गणवीर, अमित सुधीर डोंगरे, प्रमोद डोंगरे, प्रदीप डोंगरे, जगन्नाथ लोगे, खिजर खान यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनामुळे काही काळ परिसरात राजकीय वातावरण तापले होते. पोलिस बंदोबस्तात आंदोलन शांततेत पार पडले. आगामी काळात महागाईविरोधात आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा