cheque-bounce-case-sect-138: धनादेश अनादर प्रकरणात आरोपी महिला व्यावसायिकाची निर्दोष मुक्तता; ॲड शाकीर शेख यांचा प्रभावी युक्तिवाद
ठळक मुद्दा
कर्ज व्यवहाराचा ठोस पुरावा नसल्याने न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : तब्बल ₹4 लाखांच्या धनादेश अनादर (चेक बाऊन्स) प्रकरणात अकोला येथील अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी न्यायालयाने महिला व्यावसायिक संगिता विजय व्होरा यांची निर्दोष मुक्तता केली. फिर्यादी पक्षाला कथित आर्थिक व्यवहाराचा ठोस पुरावा सादर करण्यात अपयश आल्याने न्यायालयाने हा निर्णय दिला. न्यायालयात आरोपीची बाजू ॲड. शाकीर शेख यांनी ठामपणे मांडली.
फिर्यादी संतोष कमलकिशोर मंत्री यांनी न्यायालयात दावा केला होता की, त्यांनी 2016 मध्ये आरोपी संगिता व्होरा यांना ₹4 लाख रोख रक्कम व्याजाने दिली होती. त्याबदल्यात आरोपींनी ₹4 लाख 15 हजारांचा धनादेश दिला होता. मात्र संबंधित धनादेश बँकेत जमा केल्यानंतर “Payment Stopped by Drawer” या कारणाने तो अनादरित झाला. त्यानंतर कायदेशीर नोटीस देऊनही रक्कम न मिळाल्याने न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली होती.
दरम्यान, आरोपीचे वकील ॲड.शाकीर शेख यांनी युक्तिवाद करताना, हा धनादेश व्यवहारासाठी नसून सुरक्षा म्हणून दिला होता, असा दावा केला. तसेच फिर्यादींनी कथित ₹4 लाखांच्या व्यवहाराचा कोणताही लेखी पुरावा, पावती किंवा खात्याची नोंद सादर केली नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
न्यायालयाने निरीक्षण नोंदविताना म्हटले की, एवढी मोठी रोख रक्कम दिल्याचा कोणताही विश्वासार्ह दस्तऐवज उपलब्ध नाही. फिर्यादी स्वतः व्यवसायिक असूनही त्यांनी व्यवहाराची नोंद वहीत असल्याचे कबूल केले, मात्र ती वही न्यायालयात सादर केली नाही. तसेच संबंधित धनादेश 2016 पासून फिर्यादींकडे असल्याची कबुलीही त्यांनी दिली. त्यामुळे आरोपींचा “सिक्युरिटी चेक”चा बचाव संभाव्य वाटत असल्याचे न्यायालयाने नमूद केले.
या सर्व बाबींचा विचार करून न्यायालयाने फिर्यादींना कायदेशीर देणी सिद्ध करण्यात अपयश आल्याचे स्पष्ट केले आणि आरोपी संगिता व्होरा यांची निर्दोष मुक्तता केली.
ॲड. शाकीर शेखन्यायालयात आरोपीची बाजू ॲड.शाकीर शेख यांनी ठामपणे मांडली. ॲड.शेख यांना ॲड.सिराज खान आणि ॲड.गौरव निखाडे यांनी सहकार्य केले.
ठळक मुद्दे
₹4 लाखांच्या चेक बाऊन्स प्रकरणात आरोपी महिला निर्दोष
व्यवहाराचा कोणताही लेखी पुरावा न्यायालयात सादर नाही
“सिक्युरिटी चेक”चा आरोपींचा बचाव ग्राह्य
फिर्यादींकडील वही व आर्थिक नोंदी सादर न केल्याचा फटका
अकोला न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा